*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम लेख*
*आली गौराई अंगणी*
‘रुणझुणत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा’ गाणं गुणगुणतच आपण मोठं झालो हे आता आठवते.गौराई येते ती अशीच आनंदात, उत्साहात! त्या माहेरवाशिणीचं किती कौतुक करू असं वाटतं!
लहानपणी निसर्गाच्या सान्निध्यात फुले, पत्री गोळा करताना खूप आनंद उत्साह असे.माझ्या माहेरी गौर बसवायची पद्धत नव्हती, तरी मी माझ्या मैत्रीण सह त्यांच्या आनंदात सहभागी होत असे.
सासरच्या घरी आल्यावर मात्र गौरी गणपतीचा आनंद खूप मिळाला सांगली ला कृष्णा नदीच्या जवळच आमचे घर असल्याने गौर आणायला मी सासुबाईं बरोबर नदीवर गेले होते. त्यांनी मला गौरी ची सगळी तयारी करायला शिकवले. आम्ही
वाड्यातील शेजारणीं बरोबर नटून थटून नदीवर जाऊन गौरी घेऊन आलो. छोटासा गडू, त्यावर ठेवायला ताटली, गौरीची पानं,(तेरड्याची पाने) हळद कुंकू, फुलं सर्व घेऊन पाणवठ्यावर गेलो. तिथे गडूत थोडसं पाणी, त्यावरच्या ताटलीत पाच खडे ठेवून त्याची पूजा केली. हळद कुंकू,वस्त्र, फुल वाहिले. तिथून येताना तोंडात जवळ घेऊन तसंच यायचं, मागं वळून पहायचं नाही, असे काही काही रितीभाती चे नियम मला शिकायला मिळाले. घरी आलं की दारातच ती पाण्याची चूळ बाहेर टाकायची. आणि त्या गौरीला ओवाळून पायावर दूध-पाणी घालून घरात घेतलं जाई. घरात आलं की प्रत्येक खोलीत गौरीसह जायचं. तिथे जाऊन ‘इथे काय आहे? या प्रश्नाला’ उदंड आहे!’ असं उत्तर द्यायचं! अशी ही सोन्याच्या पावली येणारी गौर गणपतीच्या जवळ आणून बसवायची!ते झाल्यानंतर गौरी आणणारीची
ओटी भरायची हे सर्व छान साजरे केले जायचे. नवीन साड्या, दाग दागिने घालून मिरवत मिरवत नवीन सुनेकडून गौर आणण्याचा आनंद काही वेगळाच असे.
गौरी आणल्या की रात्री गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य असे. दुसऱ्या दिवशी गौरी जेवणाची तयारी आधीच केली जाई. गौरी जेवणाच्या दिवशी बायकांची धावपळ असे.एकमेकीकडे पाठशिवणी दिल्यासारख्या सवाष्ण म्हणून बायका जात असत. ते सर्व एकमेकीच्या सोईने केले जाई. एकदाचे गौरी जेवण झाले की संध्याकाळच्या हळदी कुंकवाची तयारी करायची. संध्याकाळी आसपासच्या घरातून हळदी कुंकू घेऊन यायचे आणि आपल्या घरी बायका ना हळदीकुंकवासाठी बोलवायचे.
अशी धावपळ असायची, पण त्यातही खूप मोठा आनंद मिळत असे. कदाचित संस्काराचा परिणाम असेल पण हे सर्व आवडत होते. काळाबरोबर आता थोडे बदल करायलाच हवेत. आपल्या पुढच्या पिढीला नोकरी, व्यवसाय यातून वेळ काढून सर्व करणे अवघड जाते तरीही त्या हौसेने जमेल तितके करतात याचे कौतुक वाटते.
एकदा का गौरी जेवणाचा दिवस झाला की, गौरी-गणपती जाणार म्हणून मनाला हुरहुर लागत असे. गौरी गणपतीचे पाच-सहा दिवस इतके धामधुमीत उत्साहात जात की खरोखरच घरी पाहुणे आल्यासारखे वाटे. त्या पाहुण्यांना निरोप देताना मनापासून वाईट वाटे. नेहमीप्रमाणे गौरी, गणपती घेऊन
विसर्जनाला गेले की मन भरून
येते! निरोप देताना दही भात, तळलेले मोदक ,करंजी यांची शिदोरी गणपती, गौरीसाठी दिली जाई. तिथून येताना पाण्या जवळची थोडीशी माती, खडे बरोबर घेऊन यायचे आणि ते गौरी गणपतीच्या रिकाम्या जागी ठेवायचे! एकदम रिकामी जागा नको म्हणून तिथे एखादे देवाचे पुस्तक ठेवायची आमच्याकडे
प्रथा होती. गणपतीचा हा सगळा सोहळा आनंददायी केला जाई.
कितीही संकटे आली तरी आपण ती बाजूला सारून या उत्सवाला आनंदाने सामोरे जातो.
शेवटी ते संकट दूर करणारा विघ्नहर्ता गजाननच आहे याची आपल्याला खात्री असते.
आतापर्यत आलेली वादळे, कोरोना आणि इतर संकटे दूर करून गणपती आपल्याला चांगले दिवस दाखवून देईल ही मनाची खात्री आहे. गौरी गणपती कडे एवढेच मनापासून मागणी आहे!
उज्वला सहस्रबुद्धे