कुडाळ तालुक्यातील ५४ भजन मंडळांना जिल्हा परिषद स्वनिधी योजनेतून भजन साहित्याचे वाटप
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील ५४ भजन मंडळांना जिल्हा परिषद स्वनिधी योजनेतून आज भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. कुडाळ पंचायत समिती सभागृहात गट विकास अधिकारी धनंजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून भजन मंडळांना भजन साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. या साहित्य वितरणाचा कार्यक्रम आज कुडाळ पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कुडाळचे गट विकास अधिकारी धनंजय जगताप, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब सहाय्यक गट विकास अधिकारी श्याम चव्हाण, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत संजय ओरोसकर, श्री. मुणनकर उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातून एकूण ३०० प्रस्ताव या भजन साहित्यासाठी आले होते. कुडाळ तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागासाठी ६ प्रस्ताव लॉटरी पद्धतीने निवडण्यात आले. असे एकूण ५४ प्रस्ताव तालुक्यातून निवडून त्या ५४ भजन मंडळांना या भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये काही महिला भजन मंडळांचाही समावेश होता. या भजन साहित्यामध्ये एक मृदूंग, पाच टाळ आणि एका चकीचा समावेश आहे.
कोकणात भजन कला चांगल्या प्रकारे जोपासली जाते. या भजनी मंडळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांना जिल्हा परिषद स्वनिधीतून लॉटरी पद्धतीने या भजनी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. यासाठी भजनी मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभला असून कोकणची हि भजनी कला मंत्रमुग्ध करणारी कला असल्याचे गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी सांगितले. भजन मंडळाचे प्रस्ताव करताना त्या गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी मेहनत घेतली. जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर आणि विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी देखील पूर्ण सहकार्य केल्याचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब यांनी सांगितले. भजन साहित्यासाठी जिल्ह्याच्या ४० टक्के प्रस्ताव कुडाळ तालुक्यातून आले. एकंदरीतच खूप चांगला प्रतिसाद या योजनेला तालूक्यातून मिळाला असल्याचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितले. शासनाच्या या योजनेमुळे आम्हा भजनी कलाकरांना चांगले प्रोत्सहन मिळत असल्याची भावना भजनी कलाकारांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विस्तार अधिकारी संजय ओरोसकर यांनी जिल्हा परिषदेच्या या योजनेबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर भजनी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.