You are currently viewing “किती राबते घरची माय”!

“किती राबते घरची माय”!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*”किती राबते घरची माय”!*

 

श्रावणातली अष्टमीची गोकुळांची गडबड, दहीकाला, रात्रीचं खेळत जागरण, दहीहंडीची मजा हे ऊरकलं कि माझी माय दुप्पट ऊत्साहाने श्री गणेश व गौरीमाय यांच्या आगमनाची तयारी करू लागे.

तसं श्रावणाची चाहुल लागल्यावरच तिची सारी धांदल सुरू होई.

घराची स्वच्छता, डबे घासुन ओळीत वाळवणे, वाणी सामानाची यादी ती आल्यावर डबे भरणे,

गुळ चिरून , खोबरे किसुन, तुप कढवून, शेंगदाणे भाजुन, कुटून, लोणची … अशी एक ना दोन लाईनच लागत असे कामाची.पहिली सुरवात पाचसहा दळणांपासुनच होई.

मग श्रावण दारात येई… अंगणात रांगोळ्या,… नक्षीकामाची कलाकुसरीची तोरणे,

रोषणाईचे दिवे. बाहेर ही सर्व तयारी होत असे. शेवटची तयारी म्हणजे देवबाप्पासाठी पंचखाद्य, तळण, लाडू करंज्या चकल्या अशी दोघांची जय्यत तयारी.

मग मखराची ताजी सुंगंधी जाई जुई मोगरा, सोनचांफा, केवडा यांनी केलेली सजावट पुढे पुजेची चांदीची चकचकीत भांडी, फळे व इतर तयारी.

बाप्पाचा पाट गौराईचे सांगाडे, मुखवटे जरीची वस्त्रे अलंकार असं काय काय मोजताच यायचं नाही आणि घरच्या मायचं काम संपायचंच नाही.

किती दिवस रात्रंदिवस बिचारी न तक्रार करता, न थकता, स्वत:च्या खाण्याची झोपेची फिकिर न करता राब राबात असे.

मी लहान होते तेव्हापासुन हे बघत होते. आमची आठ दिवस मजा व्हायची नवेकपडे, बांगड्या, डुल माळा,गजरे गोडधोड सगळं आवडायचं पण कुठेतरी मनात वादळ ऊठायचंच . आईचे कष्ट सहन होत नसत.

पुढे शाळा, अभ्यास परिक्षा स्पर्धा यात हे मागे पडले व आई एकटीच राबत राहिली.

वाजत गाजत गणराय यायचे. औक्षण, दृष्ट काढणे माझी माय ममतेने करी. दूर्वांचा हार लाल जास्वंद कधी चुकली नाही.

वडिल सगळ्या तयारीवर यथासांग पूजा आरती नैवेद्य ,महानैवेद्य सगळं हौसेने करत.

संध्याकाळी परत नातलग, आसपासचे गणगोत, मित्र मैत्रिणी सगळे दर्शनाला यायचे., आणि मोदकांपासुन स्वैंपाक केलेली माझी माय पुन्हा हंसत सगळ्यांचे आदरातिथ्य करायची.

दिड दिवस पूजा, आरती नैवेद्य ही धामधुम चालेच.

मग बाप्पा घरी निघे व मायचे डोळे भरून यायला लागत. हात जडावत. ऊत्साह सारा गळुन पडे.

शिदोरी, कानवला बांधताना मी तिला चक्क डोळे पुसताना पाहिलंय.

केवढी ही आवड!किती हे आगत्य, कुठून येते ही हौस, ऊर्जा, मायाममता?

इतकं करूनही बाप्पा निघतानच्या शेवटच्या क्षणी पदर पसरून “काही चुकलं माकलं क्षमा कर घरादाराला सौख्य दे, पोराबाळांना आयुष्य दे ,… अहं काही बाही विनवत भरल्या डोळ्यांनी “. पुढच्या वर्षी लौकर या. पुन्ह आनंदात या म्हणुन घरात वळे.

त्यारात्री तिचा चेहेरा ऊतरलेला,डोळे पाणावलेले , मन रिकामे रिकामे अशीच कशी ती वावरत असे.

सकाळ ऊजाडे मात्र…. आई परत हंसत न थकता दुप्पट ऊमेदीने गौराईच्या तयारीला लागे.

पुन्हा अंगणात रांगोळ्या गौराईची हळदी कुंकवाची पाऊले, गजरे वेण्या फळे फुले पुजेची घासलेली भांडी मांडणे , पूजेची तयारी, देवघर नंदादिप सगळं परत ती त्याच हौसेने करे.

मी व मैत्रीणी पाणवठ्यावरून वाजत ,तोंडात पाणी ठेऊन चांदीच्या तबकात खडे घेऊन यायचो.

मग गौराईच्या पावलांवरून चालत गौरीचे मुखवटे झांजावाली, सगळे दारात ऊभ्या रहात असू.

नथ घातलेली, न ऊवारी साडी नेसलेली माझी माय सजलेली खुप छान दिसे‌

ती पायावर पाणी घाले, द्रृष्ट काढे, औक्षण करताना मला ती येणार्या गौराईपेक्षा तेजस्वी दिसे.

आनंद माया ओसंडुन वहात ती दारी गौराईला घरात घेई मग तिजोरी, फडताळ, गोठा, स्वैपाकघर चुल सर्व दाखवत मखरात बसवे.

सुंदर साड्या अलंकार गजरे वेण्या अशी गौरीला सजवत असे.

पुढे फळे लाडू चकल्या वड्या ठेवे.

गोविंद विडे, स्वत:करून ठेवत असे. ओट्या खण काही काही म्हणुन कमी पडू देत नसे.

रोषणाईने घर देवघर झळकत असे.

हंसत गौराई विराजमान होई तर माझी माय भाकरी भाजीच्या तयारीला लागे. आरती, महाप्रसाद होऊन रात्री खेळ जागरण कॉफी इ. चाले.

मला घर म्हणजे लग्नघरच वाटे.

दुसर्या दिवशी पूजेची तयारी गजरे वेण्या हे स्वत:तयार होऊनच करे. पहाटे चारला रोजच ती ऊठत असे.

आज पुरणपोळीचा …. गौराईच्या मानाचा बेत भजी सोळा भाज्या, कढी असे अनेक पदार्थ तीचे बाराला तय्यार!व ती आरतीला ऊभी.

थकवा तक्रार कामचुकारपणा कुठे शोधुन सांपडणार नाही. देवघरापासुन सारे स्वच्छ, प्रसन्न, आणि वाती ,कापरापासुन सज्ज.

सवाष्ण भोजन गौराईचे जेवण सारं कसं अगत्याने मायेने.!

लगेचच संध्याकाळी लेकी सुनांसह स्रिया हळदीकुंकवाला ही गर्दी होऊन जायची. पण प्रत्येकीला हळदकूंकू, गजरा, खाणं कॉफी हे सारे शांतपणे न विसरता होत असे.

रात्री पुन्हा आरती नैवेद्य.

तिसर्या दिवशी गौराई परत फिरणार. माहेरपण संणार.

आज घावन घाटलं, किंवा करंजी, खीर असे.

बरोबर शिदोरी असे.

संध्याकाळी परत पाऊले काढली जात. पाटावर गौराई बसुन निरोप घेऊ लागे.

“माय परत ये!क्षमा कर !हे हीचे चालू होई डोळे भरलेले. आरती होऊन गौर पाठ फिरवत असे.

सर्व नदीवर जात तर माझी माय देवघरात डोळे पुसत बसलेली असे. जशी काही हिची मुलगीच सासरी गेली आहे.

नदीवरून येताना ओला रिता पाट व वाळू बघुन तिचा चेहेरा ऊतरलेला असे.

मी मनात विचार करायची किती राबली माझी माय !गौराई साठी?

हे इतके बंध कसले असतात.

खरंच गौर सुख समाधान देऊन जात असेल तर!….

हे गोराई माझ्या मायला तू सुखी आनंदी निरोगी ठेवलंच पाहिजेस.

तुझ्या माहेरपणासाठी ती आनंदाने ऊभी होती.

वर्षभर आता तू तिची काळजी घे!

नाहीतर तुझं इतकं मायेने सगळं कोण करेल? असं मी तिला दटावलंच.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी, मुं.६९

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा