*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आला भादव*
पिकून येता पिवळी शेते, सजून गेला भादव
भल्या पहाटे दंवात ओल्या, सचैल न्हाला भादव
तृप्त सुखाने डोलू लागली शेतांमधली भाते
भ्रमरासंगे फुलाफुलांवर नाचत आला भादव
डोंगर सारे हिरवे झाले, नद्या वाहती दुथडी
हस्तामधले कोसळणारे अमृत प्याला भादव
उभ्या पिकाने गर्दी केली मळ्यात मांडव पडले
पुष्ट जाहली गुरे वासरे प्रमुदित झाला भादव
रिमझिम पाऊस पडू लागता इंद्रधुनूही झळके
सप्तरंगाची सोन साखळी मजेत ल्याला भादव
डाळिंबाची फुले लालसर,सोनकेवडा माळी
धरणी वरती अवतरली ही सुंदर बाला भादव
पकोळ्या अन चतुरासंगे कुठे पाखरू फिरते
स्वर्गसुखाने फुसांडणारा गोकुळ काला भादव
श्रीनिवास गडकरी
रोहा पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित