You are currently viewing हे करूणाकर …

हे करूणाकर …

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हे करूणाकर …*

 

हे करूणाकर विघ्नविनाशक

संतोषे या देवा

तुझ्या गुणांचा सकलजनांना वाटे किती हेवा…

रूप मनोहर कटी मेखला घुंगुरवाळे पायी

तुला पाहता प्रसन्नवदना मन हरखून जाई..

 

देवर्षी तू विश्वाचा तू अधिनायक गणपती

तुझ्या कृपेने विद्याप्राप्ती मिळे पहा सन्मती

अती कृपाळू धावा करता सत्वर येतो देवा

हृदयकुपीतील तू अमुचा रे अनमोल असे ठेवा…

 

वरदविनायक लंबोदर तू भालचंद्र भूपती

बुद्धिनाथा बुद्धिविधाता तूच महागणपती

शूर्पकर्ण तू नयनमनोहर रूप किती देखणे

ध्यानी मनी तू तुलाच भजतो नित्य तुला स्मरणे..

 

असूर माजले पुनश्च देवा घ्या आता अवतार

माता भगिनी तुझ्या चिमुकल्या झाल्या बघ बेजार

भयकंपीत रे झाले जीणे जरा नसे शाश्वती

बुद्धिदाता करी अनुकंपा देई शुद्ध मती…

 

कर तांडव तू थयथयाट कर असूर तुडवी तू पाया

पुन्हा एकदा निर्दालून तू , दिसू देत” माया”

उघड नेत्र बा आशेवरती बसलो बघ देवा

विघ्ने हरू दे सुखशांतीचा तूच असे ठेवा…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा