विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात
१० जण किरकोळ तर ९ जण गंभीर जखमी ; जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले
सिंधुदुर्ग :
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये साधारणतः १९ – २० किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चालकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते.
अपघातातील १० जखमींना कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर यातील ९ जण अति गंभीर असल्याने त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांनी दिली. यावेळी त्यांचे सहकारी डॉ. विद्याधर हनमंते, डॉ. सचिन डोंगरे, डॉ. रेड्डी व सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावून आपत्कालीन पथकाच्या सहाय्याने तातडीने औषधोपचार केले. या अपघातात शकील शब्बीर शेख ( वय २७ विजयदुर्ग ), नामदेव काशीराम गोक्षे ( वय – ६४ गवाणे ), गणेश नामदेव मुळे (वय – ३७ ), प्रमोद पाळेकर ( वय – ४० विजयदुर्ग ), अक्षता सुनील हातगे ( वय – २० पाडगाव ) या जखमी अपघातग्रस्तांवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात नव्हती. मात्र अपघात ज्या हद्दीत घडला त्या हद्दीतील पोलीस पथक व कणकवली पोलीस यांच्या सहाय्याने अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरू होते.