You are currently viewing गणेशोत्सव दरम्यान केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची जनजागृती करावी

गणेशोत्सव दरम्यान केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची जनजागृती करावी

गणेशोत्सव दरम्यान केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची जनजागृती करावी

सिंधुदुर्गनगरी,

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे यांना केंद्र पुरस्कृत उल्लास- नवराभारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी साक्षरता विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, बॅनर, पोर्स्टर्स, पथनाट्ये, नाटिका इ.मार्फत जनजागृती करुन साक्षरतेचे महत्व सर्व जनमाणसांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

 संयुक्त राष्ट्रांचे सन 2030 पर्यंत सर्व तरूण आणि प्रौढ, पुरूष आणि स्त्रिया अशा सर्वांनी साक्षरता आणि संख्याज्ञान संपादन केले पाहिजे, असे शाश्वत विकास ध्येय आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये “सर्वांसाठी शिक्षण” या संकल्पनेंतर्गत प्रौढ शिक्षण आणि निरंतर शिक्षण यासंबंधी उल्लेख करण्यात आला आहे.  त्यातील परिच्छेद क्र. 21.4 मध्ये, विशेषत: प्रौढ शिक्षणासाठी भक्कम आणि नावीन्यपूर्ण शासकीय उपक्रमाद्वारे तसेच समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचे सहज आणि फायदेशीर एकत्रीकरण केले जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या २५.७६ कोटी आहे. त्यातील पुरुष ९.०८ कोटी आणि १६.६८ कोटी महिला आहेत. सन २००९-१० ते २०१७-१८ दरम्यान राबविण्यात आलेल्या साक्षर भारत कार्यक्रमांतर्गत ७.६४ कोटी एवढे साक्षर झालेल्या व्यक्तींच्या प्रगती अहवालाचा विचार करता, असा अंदाज आहे की सध्या देशात सुमारे १८.१२ कोटी लोक अजूनही निरक्षर आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरक्षरांची संख्या एकूण १,०६,३९५ असून त्यापैकी असाक्षर पुरूष ४२५५८ आणि असाक्षर स्त्रिया ६३,८३७ इतके आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात सर्वात प्रथम साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.  तरी ही जिल्ह्यात जे अजूनही असाक्षर आहेत, त्यांना नवसाक्षर करणे गरजेचे आहे.  या अनुषंगाने गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात केंद्र पुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार – प्रसार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांनी आपल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीने नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार – प्रसार करण्यासाठी आपण साक्षरतेवर आधारित पोस्टर्स, बॅनर्स, उद्बोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्ये, नाटिका इ. मार्फत जनजागृती करून साक्षरतेचे महत्व सर्व जनमाणसांत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत.

आपल्या या सक्रिय सहभागामुळे पुन्हा एकदा राज्यात केंद्र पुरस्कृत उल्लास – नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम साक्षर होईल, असा मला विश्वास आहे.  याबाबत आपले निश्चितच सहकार्य मिळेल, अशी आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा