You are currently viewing जाणता राजा !

जाणता राजा !

*महान व्यवस्थापक,*

       *कुशल प्रशासक,*

              *जाणता राजा !*

 

यशवंत कीर्तिवंत |सामर्थ्यवंत वरदवंत |

नीतीवंत पुण्यवंत |जाणता राजा ||

श्री समर्थ रामदासांनी छत्रपतींचा गुणगौरव करताना

सामर्थ्यवंत, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू

ही बिरुदावली लावली आहे.

महानतेचा मानदंड महाराष्ट्री अवतरला अन महाराष्ट्रात शत्रूंचा बीमोड करून स्वराज्य स्थापन केले. हे स्वराज्य सुराज्य व्हावे यास्तव महाराजांनी राज्याचे व्यवस्थापन व प्रशासन अत्यंत कुशल पणे हाताळले.

महाराजांच्या जीवनपटाचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की त्यांनी साधारणतः 7 वर्ष लष्करासोबत तर उर्वरित प्रदीर्घकाळ मुलकी प्रशासन व्यवस्थेसोबत काम केले. आपण अभ्यास करतांना बऱ्याच वेळेला फक्त या लष्करी प्रशासनासोबत झालेल्या घडामोडींचा अभ्यास करतो. पण या घडामोडींमध्ये भक्कमपणे पाठीशी उभी राहणारी रयत, ज्या रयतेसाठी असलेले महाराजांचे मुलकी प्रशासन आणि व्यवस्थापन याचा आपण म्हणावा तसा व तेवढा सखोल अभ्यास करत नाही. तो आजच्या संदर्भात करणे अतिशय गरजेची गोष्ट आहे असे मला वाटते. प्रसिद्ध बंगाली लेखक सुरेंद्रनाथ सेन म्हणतात ‘एक वेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल शंका घेता येईल, पण त्यांच्या प्रशासकीय कौशल्याबाबत अजिबात शंका घेता येणार नाही’. माझ्या मते या वाक्याचा संबंध स्वराज्याशी नसून सुराज्याशी आहे. या एका वाक्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासकीय कौशल्य आपण का समजून घ्यावे याचे उत्तर मिळू शकते. आपण सर्वांनी शिवजयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून व समजून साजरी करण्याची आवश्यकता आहे. छत्रपतींची न्यायव्यवस्था, महिलांविषयी असलेली धोरणे, प्रशासकीय धोरणे, लष्करी धोरणे, पर्यावरण विषयक दृष्टिकोन, आर्थिक धोरणे, चिकित्सात्मक दृष्टी, संदेशवहन यंत्रणा आपण समजून घेतली पाहिजे. महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळात लष्करी व्यवस्थापना संदर्भात फक्त एकच पद हे सेनापतीचे ठेवले व बाकी सर्व पदे ही प्रशासकीय कामकाजा संदर्भात असल्याचे दिसून येते. सेनापतीचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप नसे तर न्यायाधीश यांना कधीही युद्धावर जावे लागत नसे. यावरून सुद्धा महाराजांनी प्रशासकीय व्यवस्थापनाला किती महत्त्व दिले हे लक्षात येते.

महाराजांनी 1646 ला आपल्या बाल सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीची जी प्रतिज्ञा घेतली ती खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठीच होती. राज्य हे रयतेचे, कुणा लहरी-नादान माणसाचे नव्हे. राज्याची निर्मिती ही जनतेच्या कल्याणासाठी असेल ही भूमिका महाराजांनी सतत ठेवलेली दिसून येते. या कालखंडात सुलतानाकडून व बादशहाकडून रयतेला जो अन्याय, अत्याचार सहन करावा लागत होता त्यातून रयतेची मुक्तता करण्यासाठी महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेच्या राज्य निर्मितीची शपथ घेतली होती.

महाराजांच्या काळात रयत सुखी आणि समाधानी होती. जनतेला राज्यव्यवस्थेकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होणार नाही, महिलांना सुरक्षित जीवन जगता येईल, महिलांच्या अब्रूचे रक्षण करणारी व्यवस्था महाराजांनी निर्माण केली होती, शेतकरी राजा सुखी व समाधानी होता. त्यामुळे रयतेच्या मनातही स्वराज्या विषयी अत्यंत जिव्हाळ्याची भावना होती. स्वराज्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास रयत मागेपुढे पहात नव्हती. या उलट आज भ्रष्टाचाराचीच बजबजपुरी माजलेली दिसते, शालेय विद्यार्थ्यांनाही ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ सारखे निबंध लिहावे लागतात. आज भ्रष्टाचारावर व्याख्यानांचे आयोजन होते. ‘न खाऊंगा और न खाने दूंगा’ सारखी आश्वासने विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना निवडणूक प्रचार सभांमध्ये द्यावी लागतात. माजी पंतप्रधान राजीव गांधींनी एका ठिकाणी भाषण करताना सांगितले ‘सरकार जब एक रुपया खर्च करती है, तो लोगों तक 15 पैसेही पाहूंच पाते है’ म्हणूनच की काय शिवरायांच्या काळात जनतेची स्वराज्या प्रति असलेली भावना आणि आजच्या लोकशाही व्यवस्थेतील शासनाप्रती असलेली भावना यात फरक जाणवतो. पण याचा अर्थ असाही नाही की लोकांना लोकशाही सोडून हुकूमशाही हवी आहे.

महाराजांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होती. आज मात्र अनेक ठिकाणी जाती-धर्माच्या नावाने आंदोलने, दंगली होताना दिसतात.

1) शेती – महाराजांनी स्वराज्यात शेती विषयक सुविधांवर भर दिल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी नद्या, कालवे अडवून धरणे बांधली. जमिनीचे सपाटीकरण केले. शेतीमधून रोजगार निर्मिती केली. शेतीसाठी सर्वतोपरी मदत केली. बी-बियाणे, खते, नांगर, बैल-जोडी या गोष्टी गरजेनुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. शेतसारा हा जमिनीच्या प्रमाणावर न घेता येणाऱ्या उत्पादनावर असे. त्यामुळे शेतकरी सुखी होता. पिक न आल्यास किंवा दुष्काळ पडल्यास शेतकऱ्याला शेतसारा भरण्याची आवश्यकता नसे. महाराजांच्या या शेती धोरणाचा आजही विचार करण्याची आवश्यकता आहे.

2) न्यायव्यवस्था – स्वराज्यात गद्दारीला स्थान नव्हते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी खानाला जाऊन मिळालेल्या खंडोजी खोपडेने अफजलखानाच्या मृत्यूनंतर कान्होजी जेधेंच्या मदतीने पुन्हा महाराजांकडे येण्याचा प्रयत्न केला. कान्होजी जेधेंनी त्यासाठी महाराजांकडे शब्दही टाकला आणि खंडोजी खोपडे यांच्या प्राणरक्षणाची हमी महाराजांनी जेधेंना दिली. पण दिलेल्या शब्दाप्रमाणे महाराजांनी खंडोजी खोपडे चे प्राण नाही घेतले. पण एक हात आणि एक पाय कलम केला.

गावातल्या मुलीशी बदफैली केली म्हणून महाराजांनी रांझाच्या पाटलाचा चौरंग करण्याचा निर्णय दिला. त्याचे दोन्ही हात व पाय तोडण्याचा आदेश दिला व गाढवावर बसवून त्याला गावात पाठविला.

शाहिस्तेखानाने स्वराज्याचे जे भयंकर आर्थिक नुकसान केले होते ते भरून काढण्यासाठीच महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. सुरत हे औरंगजेबाचे दक्षिणेकडील प्रमुख आर्थिक केंद्र होते. पुन्हा औरंगजेबाने स्वराज्याला आर्थिक नुकसान पोहोचवू नये म्हणून त्याला दिलेली ती एक प्रकारची चपराक होती. महाराजांना सुरत मधून एक कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळाली ही मोहीम म्हणजे लूट नसून ती नुकसान भरपाईची मोहीम होती.

कर्नाटक स्वारीच्या वेळी राणी सावित्रीबाई हिने आपले राज्य वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. शेवटी कैद झाल्यावर महाराजांसमोर तिला आणण्यात आले तिच्यासोबत तिचे सहा महिन्याचे बाळ होते. तिने महाराजांना विनंती केली की माझे हवे ते करा, पण माझ्या बाळाला मारू नका. महाराजांनी तिला विश्वास दिला. त्या बाळाला त्यांनी आपला भाचा मानून व तिला बहीण मानून तिचे राज्य तिला परत केले. तिच्या पराक्रमाचे कौतुक केले व तिच्या मुलाच्या पालनपोषणासाठी आजूबाजूच्या दहा गावांचा प्रदेशही दिला आणि तिच्या जहागिरीच्या रक्षणासाठीही व्यवस्था केली.

महाराजांनी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार होऊ नये किंवा कामात दिरंगाई होऊ नये, प्रशासन स्वच्छ व रयतेला उत्तरदायी असावे म्हणून आपल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांची नियमितपणे बदली करण्याचे धोरण निश्चित केले होते. मग त्यात किल्लेदार, सरनोबत, कारखानिस, सबनीस यासह सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची ठराविक कालखंडात बदली होत असे.

3) नोकर भरती –

महाराज नियुक्ती करताना मावळ्यांच्या अंगी कोणती कौशल्ये आहेत त्या गोष्टींचा विचार करून स्वराज्याचे कोणते काम त्याला देणे योग्य ठरेल ते काम त्याला दिले जात असे. महाराजांकडे काम करणाऱ्या सर्वांनाच काही मूलभूत अधिकार सुद्धा होते. महाराजांचे मावळे कामगिरी स्वीकारताना ती कशी करायची व यश कसे मिळवायचे हे स्वतः ठरवत. उदाहरणार्थ तानाजी मालुसरे यांची कोंडाण्यावरील मोहीम किंवा बाजीप्रभूंनी लढवलेली गाजापुरची खिंड. थोडक्यात महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना अशा काही पद्धतीने प्रेरित केले किंवा त्यांना अशा काही प्रकारची वागणूक दिली की, कोणी कितीही मोठे प्रलोभन दिले तरी त्यांची स्वराज्यावरची निष्ठा कमी होत नसे.

महाराजांनी कुशल कार्यबळ निर्माण केले. स्वतःच्या कामातून आदर्श घालून द्यावा असे काम केले. स्वराज्य स्थापनेची मावळ्यांमध्ये तीव्र इच्छा, मातृभूमी विषयी पराकोटीचा आदर, प्रेम निर्माण करण्यात यशस्वी झाले. मावळ्यांमध्ये प्रसंगी जीव देण्याची व जीव घेण्याची भावना निर्माण करण्यात यशस्वी झाले. हेच खऱ्या अर्थाने त्यांच्या यशाचे गमक आहे. आज मात्र शिवजयंतीला नुसत्याच घोषणा, अंधानुकरण, डि.जे. वरील कर्णकर्कश आवाज, नृत्य, महाराजांसारखा टिळा लावणे, दाढी ठेवणे पण वर्तन……………….?

महाराज स्वराज्याच्या कामी आलेल्या सैनिकांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना स्वराज्याच्या कामात सामावून घेत. ज्या घरात पुरुष मंडळीच शिल्लक नाहीत तेथील महिलांना व लहान मुलांना काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेत. थोडक्यात अलीकडच्या कालखंडातील अनुकंपा तत्व किंवा पेन्शनचे तत्व भलेही त्या काळात नसले तरी स्वराज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची व त्याच्या परिवाराची काळजी त्यांनी त्या तत्त्वाने घेतलेली दिसते.

महाराज आपल्या सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची काळजी घेत तशी ते त्यांची परीक्षा ही घेत. याबद्दल एक कथा सांगतात, एकदा त्यांच्या एका किल्ल्याचा पहारेकरी सावळ्या तांडेल याची परीक्षा घेण्यासाठी वेश बदलून संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर गडावर जाण्यासाठी येतात. प्रवेश दारावरच सावळ्या तांडेल त्यांना अडवतो. ते सावळ्या तांडेलला विनंती करतात, उशिरा येण्याचे कारण सांगतात, गोड बोलून पाहतात, रागावून पाहतात. पण सावळ्या तांडेल गडाचे दरवाजे काही केल्या उघडत नाही. शेवटी स्वतःची खरी ओळख देतात तरी तो ऐकत नाही. कारण त्यांच्यामते ज्या महाराजांनी नियम केले, ते नियम ते स्वतःसाठीही मोडणार नाहीत. महाराजांना रात्रभर गडाच्या बाहेरच थांबावे लागते. सकाळी गडाचे दरवाजे उघडल्यावर महाराज किल्ल्यात प्रवेश करतात व दरबार भरवून सावळ्या तांडेल चे बक्षीस देऊन कौतुक करतात. आज मात्र आपण काय चित्र पाहतो तर आपले स्वतःचे काम सुद्धा प्रामाणिकपणे न करणारी, आपले काम न करताही रुबाब करणारी, काम करणाऱ्या माणसाने काम करू नये म्हणून सतत टोमणे मारणारी माणसे, स्वतःची चूक झाल्यावरही मान्य न करणारी, आपल्या चुका दुसऱ्यांच्या माथी मारणारी, आपल्या किरकोळ कामांसाठी वरिष्ठांशी लाळघोटेपणा करणारी, वरिष्ठांची खप्पा मर्जी होऊ नये म्हणून नको ती कृत्य करणारी, आपल्या चुकां संदर्भात वरिष्ठांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून वरिष्ठांना सतत खुश ठेवण्याचा प्रयत्न करणारी माणसे आपल्याच आजूबाजूला आपल्याला काही प्रमाणात दिसतात. आज सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचाराचे रूप कमी अधिक प्रमाणात दिसून येते. खरंतर वरपासून खालपर्यंत प्रामाणिक व निष्ठावंत माणसांची साखळी अपेक्षित असताना या साखळीची एक कडी जरी कमजोर असेल तर संपूर्ण डोलारा कोसळण्याची शक्यता असते. अशा आजच्या काळातील ‘नियम हे मोडण्यासाठीच’ असतात असे मानणाऱ्यांना, ‘नियम हे सर्वांसाठी सारखेच’ अशी तंबी देणारे राजे.

आज शॉर्टकट व लवकर यश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईने शिवरायांच्या संयमाचा नेहमीच आदर्श ठेवला पाहिजे. कारण अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांच्या अटी आणि शर्ती सहित भेटीस येईपर्यंत महाराजांनी जो संयम बाळगला तो आजच्या तरुणाईसाठी नक्कीच प्रेरणादायक आहे.

4) आर्थिक –

महाराजांनी संपत्तीचे योग्य नियोजन केले. त्यामध्ये शिक्षण, संरक्षण, स्वच्छता, प्रशासन, भविष्यातील विस्तार, किल्ले बांधणी या सर्वांसाठी आर्थिक तरतूद केली. किल्ले बांधण्यासाठी आणलेली रेती सुद्धा महाराज दोन वेळेला गोडया पाण्याने धुण्यास सांगत त्यामुळे त्यातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन बांधकाम उत्कृष्ट होत असे. महाराजांनी किल्ल्यांचे बांधकाम करतांना नेहमी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला. त्या काळात सर्वांनीच बांधलेले जवळजवळ सर्वच किल्ले हे दळणवळण, जकात व संरक्षण या उद्देशाने बांधले. महाराजांनी स्वराज्याच्या संपत्तीचा काही भाग हा नेहमी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी वापरला. कारण महाराज म्हणत “जैसे जहाजास किले (खिळे) तैसे राज्यास किल्ले मजबुती देतात”. भविष्यात कधीतरी औरंगजेब मोठ्या सैन्यानिशी चाल करून येऊ शकतो तेंव्हा त्याच्या समोर शरणागती पत्करण्याची वेळ येऊ नये म्हणून महाराजांनी आपला प्रत्येक किल्ला इतका भक्कम केला. त्यावरील साधन सामग्री इतकी वाढवली की किमान एक वर्ष तरी किल्ला शत्रूच्या हाती लागता कामा नये प्रत्येक किल्ला जिंकण्यासाठी एक-एक वर्ष लागणार असेल तर बादशाही फौजेला स्वराज्य जिंकणे शक्य होणार नाही हा त्यामागील महाराजांचा हेतू दिसून येतो. स्वातंत्र्यासाठी सतत सावध राहावेच लागते हे महाराजांनी कृतीतून दाखविले आहे. भविष्यात महाराजांच्या मृत्यूनंतर घडलेही असेच. औरंगजेबाने तब्बल 27 वर्ष लढा दिला पण तो स्वराज्य आणि स्वातंत्र्याची प्रेरणा संपवू शकला नाही. उलट 27 वर्षे सततच्या युद्धाने मात्र मुघल सत्ता कायमची खिळखिळी झाली.

महाराज आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे प्रतिपदेला करत. त्यांच्या मते सैन्य व कर्मचारी हे पोटासाठी काम करतात. हे समजून घेणारे त्या कालखंडात महाराज एकमेव असे राजे होते. महाराज स्वराज्यासाठी उत्तम कामगिरी करणाऱ्या आपल्या सहकार्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देत. पण त्यांनी कधीही बक्षीस म्हणून वतन किंवा जहागिरी दिली नाही.

5) जल व्यवस्थापन –

महाराजांनी पाथरवट लोकांच्या मदतीने जलभेद्य खडकांचे थर आणि पाझरणाऱ्या खडकांचे उतारावर हौद किंवा खोल खड्डे तयार केले त्यात सतत पाणी झिरपत राहील याची व्यवस्था केली. त्यामुळे पाणी स्वच्छ व आरोग्यासाठी उपयुक्त असे.

 

6) पर्यावरण –

किल्ल्याच्या बांधकामासाठी किंवा आरमार उभारण्यासाठी महाराजांना लाकूड लागत असायचे तेव्हा त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना झाडे तोडण्यासंदर्भात सूचना केली होती की ‘जर आपणास कोणत्याही कामासाठी एक झाड तोडावयाचे असेल तर सुकलेले झाड तोडावे, पण आधी त्या प्रकारची दहा झाडे लावावीत’. गडाच्या परिसरातील पर्यावरण चांगले रहावे म्हणून वड, शिसव, बाभूळ, नारळ, आंबा इत्यादी झाडांची लागवड करण्यास सांगत.

प्रत्येक गडावर नैसर्गिक विधीसाठी सोय असल्याचे दिसून येते. त्यासाठी सांडपाण्याची विल्हेवाट, कंपोस्ट खत, सोनखत, शोष खड्ड्यांची व्यवस्था व पाणीसाठा यांची व्यवस्था इतकी अचूक होती की त्यामुळे गडावर कधीही रोगराई पसरत नसे.

7)चिकित्सात्मक दृष्टी –

चिकित्सात्मक अभ्यासातून अनेक नवीन उपयुक्त अशा गोष्टींची रुजवात महाराजांनी केली. जसे मध्ययुगातील काही अज्ञात कारणांनी समुद्र लांघणे अशुभ मानले जात होते. महाराजांनी स्वराज्याची गरज लक्षात घेऊन समुद्रात आरमार उभारले व समुद्रातून स्वराज्याचा विदेशी व्यापार सुरू केला. अशुभ मानल्या जाणाऱ्या अमावस्येच्या रात्री महाराजांनी आपल्या अनेक योजना तडीस नेल्या. दीपावलीतील अमावस्येला आपण यश व समृद्धीचे प्रतीक मानतो. पुण्याच्या भूमीला शापित भूमी मानले जात होते. तेथे नांगर चालवणे अशुभ होते. जिजामातेने स्वतः नांगर चालवून जनतेला आश्वस्त केले. होळी सणाला रयतेने आपल्या वैयक्तिक स्वार्थाची होळी करावी ही भावना जागृत केली. महाशिवरात्रीला ज्याप्रकारे शंकराच्या पिंडीवर आपण दूध वाहतो त्याप्रकारे प्रत्येकाने स्वराज्याच्या कामासाठी आपले योगदान द्यावे.

8)संदेशवहन –

आज आपण माहितीच्या वहनासाठी किंवा संदेशवहनासाठी इंटरनेट, टेलिव्हिजन, वृत्तपत्र या साधनांचा वापर करतो त्या कालखंडात महाराजांनी संदेशवहनासाठी प्रत्येक किल्ल्यावर पांढरा धूर निर्माण करणाऱ्या व काळा धूर निर्माण करणाऱ्या लाकडांची व्यवस्था केली होती. बातमी आनंदाची असेल तर गडावर पांढरा धूर निर्माण करणारी लाकडे पेटवली जायची व बातमी दुःखाची किंवा वाईट असेल तर गडावर काळा धूर निर्माण करणारी लाकडे पेटवली जायची. हे सर्वच गडांवर एकापाठोपाठ एक होत असल्याकारणाने संपूर्ण स्वराज्यात बातमी पोहोचायची.

महाराजांचा गावाची उभारणी करतांना निश्चित नियोजनाचा दृष्टिकोन दिसून येतो. उदाहरणार्थ रायगडावर शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेली 300 घरे, 42 दुकाने, काही दुमजली तर काही तीमजली घरे, मोठी बाजारपेठ, धान्य साठवण्यासाठी उत्कृष्ट कोठार यांचा समावेश दिसून येतो.

आपण महाराजांच्या विचारांना विसरलो म्हणूनच पारतंत्र्यात गेलो हे आजतागायत अनेक इतिहासकारांनी दाखवून दिले आहे. आज माणसाला रोजच्या व्यवहारात काय करावे व काय करू नये इतके कळले तरी शिवचरित्र समजल्याचे सार्थक होईल

मित्रांनो छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी सर्वात जास्त महत्त्व व्यवस्थापनाला दिलेले दिसते या व्यवस्थापनामुळे रयत सुखी व समाधानी होती. त्यामुळे ती स्वराज्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास मागेपुढे पाहत नसे. याचा अनुभव शिवचरित्राचा अभ्यास करताना आपल्याला अनेकदा येतो. जगातील फार कमी सत्ताधाऱ्यांच्या जीवनात हा अनुभव दिसून येतो. महाराजांच्या उत्तम व्यवस्थापनाचा हा जो मूलमंत्र आपणास शिवचरित्रातून मिळतो. त्याचा आज आपण सर्वांनी अभ्यास करावयास हवा. या लेखात मी शेती, न्याय, नोकर भरती, आर्थिक, जल, पर्यावरण, चिकित्सात्मक दृष्टी, संदेशवहन या घटकांसंबंधी महाराजांच्या प्रशासकीय व व्यवस्थापकीय धोरणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आज तुम्हीं-आम्हीं सर्वांनी आपण निवडलेल्या क्षेत्रात सर्वोत्तम काम करणे हाच एक शिवरायांचा मावळा म्हणून त्यांना केलेला मानाचा मुजरा असेल. त्या माध्यमातून देशाचेही भविष्य उज्ज्वल करण्यासाठीच्या महासागररुपी कार्यात आपल्यामुळे एका थेंबाची निश्चितच भर पडेल. अशा असंख्य थेंबानी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळेच हा भारत देश उद्या आत्मनिर्भर होऊन जगात विश्वगुरु होईल यात शंकाच नाही. एक भारतमातेचा पुत्र म्हणून, एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी ‘महान व्यवस्थापक, कुशल प्रशासक, जाणता राजा!’ हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मित्रांनो या लेखामध्ये छत्रपतींच्या व्यवस्थापनातील मला गवसलेले पैलू मांडण्याचा प्रयत्न माझ्या अभ्यासा नुसार केला आहे. तुम्हीं माझे विचार काळजीपूर्वक वाचले याबद्दल मी आपला ऋणी आहे. माझ्या लिखाणातली न्यूनाधिक्य पुरते-सरते करून घ्यावे व कमी अधिक तीव्र रचनेबद्दल माफ करावे. “फोडिले भांडार धन्याचा तो माल | मी तो केवळ हमाल भारवाही||” ही तुकोबारायांची उक्ती तुम्हासारख्या जाणत्यांकडून खरे तर सगळे काही घेऊनच मी हे माझे म्हणून लिहितो. याबद्दलही माझ्या लिखाणाचा उदार मनाने स्विकार करावा.

 

धन्यवाद.

लेखक प्रा.प्रशांत शिरुडे

के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली. prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा