You are currently viewing बदल करून पहायला हवा नं!

बदल करून पहायला हवा नं!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अंजना कर्णिक लिखित अप्रतिम लेख*

*बदल करून पहायला हवा नं!*

त्या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार होता . घराजवळच्या काशिविश्वेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला गेले. गाभाऱ्यात गेले आणि समोरच दृश्य पाहून मन उद्विग्न झालं. दर्शनार्थी तेथील शिवपिंडीवर बदबदा दूध दही पिशव्यातून डब्यातून लोट्यातून ओतत होते. कोणी मधेच घुसून पिडीला लोणी फासत होते.त्या वरच बेलपत्र फुलं याची रास पडत होती. मधेच कोणी नुसत्या पाण्याचे तांबे वरून ओतत होते तर बायकांची शिवामूठ वहायला. मघेच बेल पाने, फुलं यांच्या पुड्या, मुठी पिंडीवर रिकाम्या होतं होत्या. दर्शनार्थीना शिस्त अशी काही नव्हतीच! धक्काबुक्की चालू होती. कोणी त्या चिकट झालेल्या पिंडीला मिठी मारू पहात होते. आणि तो दूध,दही, पाणी, तूप लोणी, पंचामृत याचा काला नंतर वळवून बाहेरच्या कुंडामघे रीता होत होता. आणि…..
त्या गोमुखवाल्या कुंडातून तो काला शेवटी खालच्या गटारात वहात जात होता यात मला तरी काही संशय नव्हता.

गाभाऱ्यात त्या ओषट पदार्थाचा कुजका, नासका वास पसरला होता. गाभरा चिकट होऊन पाय घसरत होते.

घुसमटतच मी पटकन बाहेरच्या मुख्य सभागृहात आले. तर त्या देवस्थानाच्या ज्येष्ठ मालकीण बाई भेटल्या. न राहवून मी त्यांना त्यांना विचारल की पिंडीवर शिवाला दाह शांत करण्यासाठी भक्तांनी वाहिलेलं दूध दही पाणी याचं पिंडीवरून पुढे वहात गेलेलं मिश्रण जात कुठे? तर त्यांनी अगदी सहज सुरात म्हटलं अहो आधी गोमूख कुंडात आणि तिथून खाली गटारात. मी चीरडीस येऊन म्हंटल, ‘ताई पटत का तुमच्या मनाला हे? एकीकडे देवळाबाहेर लहान मुलंभीक मागतायत आणि दुसरीकडे हे दूध दह्याचे लोट सरळ गटारात जातायत!’

‘नाही हो पटत! पण काय करणार! लोकांच्या श्रद्धा असतात न! काय उपाय आहे का या वर?

मी ठासून म्हणलं,” हो! आहे उपाय! या गाभाऱ्याला मोठे गज असलेलं जाळीच दार आहे, ते बाहेरून लावून घ्या. अभिषेक करायला बंदी आहे अशी नोटीस सभागृहात लावा.भक्त फक्त बाहेरून दर्शन घेतील. दाराला कुलूप लावा हवं तर! मी सुचवलं

” अहो पण भक्तांना अभिषेक करायचा असतो ” इति मालकीणबाई

“करु देत नं! त्या साठी अभिषेक करायला म्हणून सभागृहात तीन मोठाली पिंप ठेवा. एक दूधासाठी, एक दह्यासाठी, एक जलाभिषेकसाठी . प्रत्येक पिंपात छोटीशी एकेक शिवपिंड ठेवा. आणि ओतू देत भक्ताना त्यात त्यांचा श्रद्धेनुसार दूध, दही जल वेगवेगळ्या
पिंपात. नंतर जे जमा झालेलं असेल ते दूध दधी अनाथालयात,
एखाद्या गरीब वस्तीत प्रसाद म्हणून वाटून या. जल झाडांना घाला. पण हा श्रद्धेने वाहिलेलं दूध दही गटारात सोडणं थांबवा. कोणा गरीबाच्या मुखात पडू देत! जैन लोक बघा न! देवस्थानं किती प्रसन्न आणि स्वच्छ ठेवतात. दक्षिणेकडे भक्तांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही.तुम्ही पण तीच प्रथा सुरु करा”मी सविस्तरपणे उपाय सुचवला

देवस्थान ट्रस्टच्या मालकीणबाईंनी न चिडता सगळं शांत पणे ऐकून घेतलं!

म्हणाल्या,’पटलंय मला.! बघू पुढच्या वर्षी जमतंय का ते!’ पण….. हे देवस्थान ट्रस्ट कडे आहे व्यवस्थापनासाठी. ट्रस्टचे बाकी पदाधिकारी पटवून घेतील का….!
बाईंच्या नजरेतली हतबलता मला स्पष्ट दिसत होती.

अशा आपल्या हजारो वर्ष चालत आलेल्या कितीतरी प्रथा. काळ, देशातील दारिद्रय आणि आरोग्य याचा विचार करून बदलाची सुरवात करायला नको का प्रत्येक भक्ताने.

@ अंजना कर्णिक

प्रतिक्रिया व्यक्त करा