७२,७८९ घरगुती गणरायांची होणार प्रतिष्ठापना
सिंधुदुर्गनगरी :
गणेशोत्सवाला शनिवार ७ तारखेपासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यात ७२ हजार ७८९ घरगुती तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामार्फत ३२ ठिकाणी गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी एसटी बस व रेल्वे स्थानकावर १८ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सर्व बस व रेल्वेस्थानके, महामार्ग आणि सर्व घाट मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा वाहतुकीची कोंडी कुठेही होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असल्याने जादा रेल्वे, एसटी, खाजगी बस मोठ्या प्रमाणात सोडल्या आहेत. जिल्ह्यात चाकरमानी यायला सुद्धा सुरुवात झाली आहे. यावर्षी ७२ हजार ७८९ खाजगी घरगुती गणपती तर ३२ ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत, अशी माहिती पोलीस खात्याच्या अहवालातून उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात साधारणतः दीड ते अकरा दिवसापर्यत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतो. यावर्षी जास्तच उत्साह दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून घराची रंगरंगोटी व सजावट सुरू आहे. बाजारापेठांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे. गणेशमूर्ती शाळांमध्ये रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात आहे. चाकरमानी येऊ लागल्याने येणाऱ्या त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी सर्व रेल्वेस्थानके, बस स्थानकांवर १८ आरोग्य पथके तैनात केली आहेत. आरोग्य तपासणी करून जोखमीच्या रुग्णांना जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे.
जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रेल्वे व बसस्थानके, फिक्स पॉइंट, भुईबावडा, करूळ, फोंडा आणि आंबोली या घाट मार्गावर व महामार्ग या सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अपघात होऊ नये, यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे. महामार्गावरून प्रवास सुखकर होण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. एकूणच गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांची लगबग सुरू असून जोरदार तयारी सुरू आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनीही कडक पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यावर्षी एसटी स्थानक व रेल्वे स्थानकावर पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग-३, सावंतवाडी-५, आचरा-१, मालवण-२, कणकवली-५, बांदा-२, कुडाळ-५, वेंगुर्ले-३, देवगड-२, वैभववाडी-४ अश्या ३२ ठिकाणी सार्वजानिक गणपतीची स्थापना होणार आहे.
गणेशोस्तव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ३२ पोलिस अधिकारी, २१३ पोलिस अंमलदार व ३५० होमगार्ड बंदोबस्थासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवशांसाठी १०४० जादा एसटीफेऱ्या तर रेल्वे प्रशासनाने १३९ रेल्वे फेऱ्या सुरु केल्या आहेत.
गणेशोत्सव कालावधीत गणपतीचा पाच, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी क्षेपणास परवानगी देण्यात आली आहे. अन्य दिवशी रात्री १० वाजेपर्यंत परवानगी असेल.
गणेशोत्सव कालावधीत अवजड वाहनांमुळे इतर वाहतुकीला अडचण येऊ नये यासाठी ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर, ११ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यातून गॅस सिलेंडर, दूध वाहतूक, भाजीपाला, औषधे, जीवनावश्यक वस्तू वाहतुकीला वगळण्यात आले आहे.
कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेऊन आनंदात गणेशोत्सव साजरा करा. गणेशभक्ताची गैरसोय, वाहतुक कोंडी होऊ नये याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण होता नये याची दक्षात घ्यावी. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
सर्वांनी आनंदात गणेशोत्सव साजरा करावा, यासाठी पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासन सतर्क आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.