अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने कोकणवासीयांसाठी “अल्प दरात बस सेवेचा” शुभारंभ..
सावंतवाडी :
सालाबादप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांच्या सौजन्याने सिंधुदुर्गवासियांसाठी “अल्प दरात बस सेवा” उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पहिली बस गणपती बाप्पाच्या जयघोष करीत कोकणात येण्यासाठी मार्गस्थ झालेली आहे. सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
पुणे येथून सुटणारी बस सावंतवाडी, वेंगुर्ला / दोडामार्ग तालुक्यापर्यंत येणार आहे. गणेशोत्सवात सिंधुदुर्गात जाणाऱ्या जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो असे मत सौ. अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले. तर कोकणातील तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासीय गणेशभक्तांची प्रवासादरम्यान होणारी गैरसोय, वाढलेले तिकीट दर यामुळे पडणारा भुर्दंड आदी लक्षात घेऊन सौ. अर्चना घारे-परब यांनी कोकणातील लोकांसाठी लक्झरी बस उपलब्ध करून दिली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सौ. घारे यांचा पुढाकार असतो. यातील पहिली बस कोकणात येण्यासाठी रवाना झाली आहे. यावेळी अमित वारंग, समीर दळवी, गजानन परब, सागर गावडे आदींसह कोकणवासिय उपस्थित होते. सिंधुदुर्ग युवा ग्रुप, पिंपरी चिंचवड यांच्याद्वारे अल्प दर आकारून हा उपक्रम राबविण्यात येतो. पिंपरी-चिंचवड येथून या बसेस सुटल्या असून पिंपरी चिंचवड – नवले पूल, पुणे-कोल्हापूर – गगनबावडा- कुडाळ – सावंतवाडी- वेंगुर्ला / दोडामार्ग मार्गे कोकणात दाखल होणार आहेत. तर उद्या शुक्रवारी दुसरी बस कोकणसाठी मार्गस्थ होणार आहे.