राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटे अटकेत…
कल्याण येथील राहत्या घरातून घेतले ताब्यात*
मालवण
राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला काल रात्री कल्याण पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. रात्री त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आज त्याला मालवण पोलीस ठाण्यात आणले असून दुपारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी जयदीप हा कल्याणच्या राहत्या घरी आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कंत्राटदार जयदीप आपटेच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सातहून अधिक पथके तैनात केली होती. ही पथके त्याचा शोध घेत होती. २६ ऑगस्ट रोजी शिवाजी पुतळा पडल्याच्या दिवसापासून पोलीस जयदीप आपटेचा शोध घेत होते. यात काल तो त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेच्या घरी जात त्याला अटक केली.
कल्याण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला आज सकाळी मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. यात गुन्ह्यातील तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपत असल्याने त्याच्यासोबत जयदीप आपटे यालाही दुपारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.