You are currently viewing 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आमचे शिक्षक आमचा आदर्श

5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आमचे शिक्षक आमचा आदर्श

 

5 सप्टेंबर संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्या गुरुजींविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. खरं म्हणजे आई-वडील मुलाला घडवितातच पण मुलांना घडविण्यात बराचसा मोठा वाटा हा शिक्षकांचा असतो. मला आठवते माझे प्राथमिक शिक्षण अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव या लहानशा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. त्यावेळेस आम्हाला निर्मळ गुरुजी शिकवायला होते. नावा प्रमाणेच ते निर्मळ होते व आहेतही. त्यांनी खऱ्या अर्थाने मनापासून हृदयापासून आम्हाला शिकविले. त्यामुळे आमच्या पाया भक्कम झाला. पुढे गुरुजींना व त्यांच्या सौभाग्यवतींना राष्ट्रपतींनी राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरविले. खऱ्या अर्थाने त्यांनी विद्यार्थ्यांची जी पिढी तयार केली त्याचा आदर शासनाने केला. पुढे अमरावतीच्या श्री गणेशदास राठी विद्यालयामध्ये मी शिकायला आलो. येथे शिक्षण घेत असताना दोन सरांनी माझ्या जीवनावर त्यांचा ठसा उमटवला. माझे इंग्रजी पक्के करण्यामध्ये श्री डूडल सर व मराठी पक्के करण्यामध्ये श्रीमती मोहरील मॅडम यांचा मोलाचा वाटा आहे. डुडूल सर अतिरिक्त वर्ग घेऊन आम्हाला शिकवायचे. त्यांनी माझ्याच नव्हे तर सर्वांचे इंग्रजी उत्तम करून दिले. मोहरील मॅडमनी मराठी व संस्कृतची चांगली तयारी करून दिली. मला लेखनाची आवड लागली ती त्यांच्या प्रेरणामुळेच. मोहरीला मॅडम मुळे मला मराठीमध्ये शंभर पैकी 87 मार्क मिळाले. तेव्हाचे अध्यापक गुण देण्यामध्ये हात आखडता घ्यायचे. असे असतानाही 87 गुण म्हणजे खऱ्या अर्थाने मी तेव्हा मेरिटचा विद्यार्थी होतो. पदवीपर्यंतचे शिक्षण जेव्हा केशरबाई लॉहोटी महाविद्यालयामध्ये घेतले. त्यावेळेस लक्षात राहणारे व माझी अभिरुची वाढविणारे सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी प्राध्यापक मधुकर केचे व इंग्रजीचे प्राध्यापक श्री एस एस. जोशी. मधुकर केचे सरांनी तास कमी घेतले. पण जे काही घेतले ते आमच्या जीवनातील मैंलाचा दगड ठरले. त्यांनी मनापासून तन-मन धनाने शिकविले आणि माझी लेखकवृत्ती वृद्धिंगत केली. प्रा. एस एस जोशी आम्हाला शिकवायला नव्हते. पण मी त्यांचा आवडता विद्यार्थी. ते ज्या वर्गाला शिकवायचे त्या वर्गात मी जाऊन बसायचो. त्यांनी कधी टोकले नाही आणि मीही कधी त्यांच्या वर्गाला जाणे टाळले नाही. हा माणूस दिलखुलास आहे. मनापासून प्रेम करणारा आहे. त्यांनी इंग्रजी इतकं सोप करून शिकवलं तितकं सोपं शिकवणे कठीणच. इंग्रजी बरोबरच त्यांनी क्रिकेट खेळ वेगवेगळ्या स्पर्धा यामध्येही लक्ष घातलं. सरांच्या प्रेमामुळे मला आवड नसतानाही मी क्रिकेटची मॅच पाहायला जायचो. सर आता पुण्याला आहेत. पण आमचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. पुढे मराठीत एम. ए. करायला मी आताच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमध्ये म्हणजे तेव्हाच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर दोन महिने होत नाहीत तोच माझे वडील वारले. पण ज्या केशरबाई लॉटरी महाविद्यालयामध्ये माझे वडील नोकरीला होते त्या महाविद्यालयाने माझी सात दिवसातच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. सकाळी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयमध्ये नोकरी व दुपारी विदर्भ महाविद्यालयाचे एम ए मराठीचे वर्ग अशी कसरत सुरू झाली. तेव्हा श्रीमती मनुताई नातू व प्रा. डी वाय देशपांडे हे चर्चेत असलेले व्यक्तिमत्व. सामाजिक पुरोगामी विचाराचे पाईक. प्रा. डॉ.विजया डबीर, प्रा. वसंत आबाजी डहाके, प्रा. प्रभा गणोरकर,  प्रा. सुशीला पाटील, प्रा पेशकार, प्रा वाघमारे, प्रा थोरात या सारखी नामवंत अध्यापक मंडळी आम्हाला शिकवायला होती. आमचे तास नियमित व्हायचे. विदर्भ महाविद्यालयामध्ये असताना आमच्या व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने जडणघडण करण्यामध्ये आमच्या प्राध्यापकांबरोबरच आम्हाला इतरत्र सांस्कृतिक चळवळीमध्ये ओढण्याचे काम प्रा. जहागीरदार यांनी केले. वाद विवाद स्पर्धा आहे सांस्कृतिक महोत्सव सर आठवणीने माझी आठवण काढायचे व प्रोत्साहन द्यायचे. विदर्भ महाविद्यालयामध्ये आमच्या या अध्यापकांनी आमचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. नातू बाईंचा मी आवडता विद्यार्थी. माझी अडचण लक्षात घेऊन त्यांनी मला सायकल घेऊन दिली. नातू मॅडमच्या घरी तेव्हा फोन होता. तो फोनही आम्हाला वापरायला मिळायचा. माझे वडील वारल्यामुळे सर्वांचे सहानुभूती माझ्याबरोबर होती. मी सलग दोन वर्ष मराठी साहित्य मंडळाचा उपाध्यक्ष व अध्यक्ष होतो. या प्राध्यापकांनी आम्हाला इतके सहकार्य केले आणि या दोन वर्षात आम्ही इतके कार्यक्रम घेतले इतके कार्यक्रम गेल्या शंभर वर्षात विदर्भ महाविद्यालयाच्या इतिहासात कधीही झाले नाहीत आणि कधीही होणार नाहीत. आम्ही रात्र रात्रभर जागून कार्यक्रमाचे नियोजन करायचो. प्रमाणपत्र तयार करणे. भित्ती पत्रक तयार करणे. नोटीसेस काढणे हे सगळं मी करायचा. माझ्याबरोबर श्री शिवराम भोंडेकर हा मदतीला असायचा. मी श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात नोकरीला असल्यामुळे तिथले टंकलेखन यंत्र देखील रात्रीच्या वेळेस आमच्या उपयोगात यायचे. या दोन वर्षाच्या काळात माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली. त्याला मुखपृष्ठ होते प्रा. वसंत आबाजी डहाके यांचे आणि पुरस्कार होता सुप्रसिद्ध कवी अनिल उर्फ आरा देशपांडे यांचा. पुस्तकाचे जे प्रकाशन अमरावतीच्या नगर वाचनालयात झाले त्यावेळी झालेल्या कवी संमेलनाचे संचालन प्रा. प्रभा गणोरकर यांनी केले. आमच्या सगळ्या गुरुवर्यांनी आणि जहागीरदार सरांनी आमची खूप काळजी घेतली. मराठीत एम ए झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये अध्यापक आले ते प्राचार्य डॉ.भाऊ मांडवकर व प्राचार्य डॉ. सिंधुताई मांडवकर यांनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केले. आमच्या पीएचडी पर्यंतचा प्रवास यांच्यामुळेच पूर्ण झाला. मराठी विषयात मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातून गुणानुक्रमे पहिला आलो. ज्या महाविद्यालयात मी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत होतो. त्याच महाविद्यालयात मी एम ए झाल्याबरोबर माझे पितामह डॉ मोतीलाल राठी यांच्या पुढाकाराने मराठीचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्रा. मधुकर केचे हे याच महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करीत होते. मी तेव्हा तपोवनला राहत होतो. महाविद्यालय संपले म्हणजे मी मधुकर केचे यांचा लेखनिक म्हणून काम करीत होतो. त्यांचे लेखनिक म्हणून काम करता करता मी पण चांगला लेखक व्हायला लागलो. लिहिताना एखादा शब्द चुकला तर माझ्यावर सर खूप चिडायचे. तू मराठीत एमए आहेस. ही चूक तुझ्याकडून अपेक्षित नाही. त्यामुळे माझे मराठी इतके चांगले झाले की अनेक मराठीचे लेख लघु प्रबंध. पीएच.डी.चे प्रबंध तसेच पुस्तके मी तपासून द्यायला लागलो. एक मात्र ठरवले पैसे घ्यायचे नाहीत. मी केचेसरांचा लेखनिक होतो. पण त्यांना एक रुपये मागितला नाही. इतक्या पुस्तकांचे प्रुफरिडिंग केले पण ते सेवाभाव मनात ठेवूनच. केचेंसरांमुळे व दैनिक तरुण भारतमुळे माझे शुद्धलेखन चांगले झाले. आज मागे वळून जेव्हा मी पाहतो तेव्हा या सर्व अध्यापकांची व मार्गदर्शकांची आठवण येणे सहाजिकच आहे. खरं म्हणजे आमच्या जीवनाचा पाया याच मान्यवरांनी पक्का केलेला आहे. तेव्हाचे अध्यापक म्हणजे आमच्या जीवनाचा एक घटक होते. आपल्या मुलांवर त्यांनी जेवढे प्रेम केले त्या खालोखाल आमच्यावरही केले. सर्वजण मला मधुकर केचे यांचा चौथा मानसपुत्र मानायचे. डॉ. भाऊसाहेब व सिंधुताई मांडवकर हे तर आम्हाला कधी परके वाटलेच नाही. केचेसरांकडे आणि मांडवकर सरांकडे मी किती वेळा जेवलो हे मला सांगता येणार नाही. लेखनिक म्हणून सरांकडे गेलो तेव्हा सर म्हणायचे नरेश तू आधी जेवून घे. नंतर आपण लिहायला बसू. मांडवकरांकडे तीच गत. मांडवकरांकडे गेलो आणि काही न घेता परत आलो असे कधीच झाले नाही. प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके, प्रा. डॉ. विजय डबीर, प्रा सुशीला पाटील यांच्याकडे माझे नियमित जाणे येणे असायचे. त्यांनीही त्यांच्या परीने आदरतिथ्य केलेच. आता काळ बदलला आहे. पन्नास वर्ष निघून गेलेली आहेत. या पन्नास वर्षात त्यांच्यासारखे अध्यापक आणि आमच्यासारखे विद्यार्थी म्हणजे अवघडच काम आहे. शिक्षक दिनानिमित्त या सर्व मान्यवर अध्यापकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे कर्तव्य आहे. आज लेखक, वक्ता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा जो वावर आहे त्याचा पाया या आमच्या अध्यापक मंडळींनी रचला आहे. त्यांना हृदयापासून प्रणाम…🙏

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा