You are currently viewing जयदीप आपटे विरोधात पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी…

जयदीप आपटे विरोधात पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी…

जयदीप आपटे विरोधात पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी…

मालवण

मागील आठवड्यात मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे हा पसार असून गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र त्याचा थांगपत्ता अद्यापही लागलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध आज लूक आऊट नोटीस जारी केली आहे.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याच्यासह बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमां अतर्गत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपी चेतन पाटील याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता अजित पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज हे भारत देशाचे राष्ट्र पुरुष आहेत. राजकोट येथे उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता लक्षात घेवून हा पुतळा शतकानुशतके सुस्थितीत सुरक्षित व दिमाखाने उभा राहण्याच्या दृष्टीने परिपूर्ण व त्या संदर्भात आवश्यक अशी सर्वोतोपरी काळजी घेणे आवश्यक होते. परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा बनविणारे शिल्पकार व बांधकाम रचना सल्लागार यांच्या हलगर्जीपणा मुळे हा पुतळा कोसळला तर पुतळ्याच्या जवळील पर्यटक व इतर लोकांचा मृत्यू होईल तसेच अपरिमित जीवित व वित्त हानी होतील याची पूर्ण जाणीव असतानाही पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले. या पुतळ्याच्या उभारणीचा अभ्यास न करता पुतळ्याची निकृष्ट दर्जाने उभारणी केली. तरी जयदीप आपटे व डॉ. चेतन पाटील यांनी एकमेकांच्या संगनमताने हे कृत्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर येथील पोलिसांत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ११०, १२५, ३१८, ३(५), ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा