You are currently viewing बैलपोळा

बैलपोळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*बैलपोळा*

 

श्रावण महिन्यातला एक अत्यंत महत्त्वाचा खानदेशी सण म्हणजे बैलपोळा.

बैलपोळा हा सण कृतज्ञतेचा आहे.आमचे कुटुंब शेतकर्‍यांचे. त्यामुळे बैलपोळा हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि तितकाच या पशुधनाच्या पूजेचा दिवस. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस.

आता शेतीची तंत्रे बदलली .शेती यांत्रिक झाली असली तरीही शेतकरी आणि बैल यांचं नातंअबाधितच आहे.

 

श्रावण अमावस्येला बैलपोळ्याचा सण साजरा होतो.

श्रावणातला शेवटचा दिवस. त्यादिवशी पिठोरी अमावस्याही असते. हिंदु संस्कृतीतला हा मातृदिनच.

मातृदिन आणि बैलपोळा.. .दोन्ही दिवस कृतज्ञतेचेच.

 

ज्या बैलांनी वर्षभर शेतकर्‍याची सेवाच केली असते

त्याच्या श्रमाचा गौरव, जाणीव म्हणजे बैलपोळा.

त्यादिवशी बैलाला सुट्टी. वर्षातला एक दिवस त्याच्यासाठी आरामाचा, विश्रांतीचा.

 

त्याना प्रेमाने आंघोळ घालायची. त्यांची शिंगे रंगवायची, गळ्यात घुंगुरमाळा, पाठीवर रंगीबेरंगी, सुरेख

कशीदा काढलेली झूल—अशी ही नटलेल्या ,सजलेल्या ढवळ्यापवळ्यांची जोडी इतकी गोजीरी दिसते…!

 

घरातल्या सुना, पुरणपोळी, तांदळाच्या खिरीचा रुचकर स्वयंपाक रांधतात. या महत्वाच्या पाहुण्यासाठी.

 

गावात मस्त फेरफटका मारुन संध्याकाळी घरी आले की सुना, लेकीबाळी त्यांचे औक्षण करतात. कपाळावर गंधाचा टिळा लावतात आणि स्वत:च्या हातानं घास भरवतात. फार ह्रद्य सोहळा असतो हा! शेतकर्‍यांच्या डोळ्यातला भाव आणि ढवळ्या पवळ्यांची मऊ पाणीदार नजर एकमेकांना भिडते आणि या अलौकीक

नात्याचा बंध अधिक घट्ट होतो.

thank you आणि you are welcome..

असं तर नाही ना म्हणत ते एकमेकांना?

 

या दिवशी शेतावर राबणार्‍या सगळ्या मजुरांनाही जेवणाचे आमंत्रण असते.

माझ्या सासुबाई सर्वांना स्वत:आग्रह करुन वाढायच्या..

“”पुरे माई…”

“कारं इतनामंदी कसकाय जालं…?”

असे जेवतानाचे अहिराणी संवाद. अतिशय गोडव्याचे.

ज्यांच्या श्रमानं धान्याची रास रचली, त्यांचा या घासावर खरा अधिकार या भावनेचा हा सण. विशेषत: खेड्यात

त्याचे महत्व अधिक असले तरी काही ठिकाणी बाजारातून मातीचे बैल आणून त्यांची प्रतिकात्मक पूजा केली जाते. नैवेद्य दाखवला जातो.बळीराजा हाच अन्नदाता. त्याच्याविषयीची ही उपकृत भावना या सणाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते.त्याचबरोबर “बळीराजा सुखी तर राष्ट्र सुखी” ही भावना जपली जाते.

 

वसुधैव कुटुंबकम! हे हिंदुधर्माचे तत्व आहे. आणि या कुटुंबात पशु, पक्षी, प्राणी ,वृक्षवल्ली ,माती ,जल, आकाश, तारे सगळ्यांची पूजा होते.

बैलपोळा म्हणजे बैलांची पूजा..

त्याच्या श्रमाला दिलेली भावपूर्ण वंदना….!!

 

सौ.राधिका भांडारकर

पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा