You are currently viewing गोपाळकाल्याच्या निमित्ताने……

गोपाळकाल्याच्या निमित्ताने……

*के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे लेखक प्रा.प्रशांत शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*गोपाळकाल्याच्या निमित्ताने……..*

 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे

असा सृष्टी सौंदर्याचा नजारा घेऊन येणाऱ्या, फुलनं आणि फुलवणं हा आत्मा असणारा श्रावण अंगभर मिरवीत मुली स्त्रिया आनंदी असताना, रक्षाबंधनाने नात्याची वीण घट्ट करत द्रौपदीच्या पाठीराख्याचे मयसभेत तिचे रक्षण करणारा, तिला वस्त्र पुरवणारा श्रीकृष्णाच्या जन्माचा दहीहंडीच्या उत्सवाचा आनंद साजरा करताना बदलापूर ते बंगाल मधील लैंगिक अत्याचार ते बलात्कार ते क्रूर हत्या यांचा बळी ठरणाऱ्या मुलींनो ‘मुली तू जन्मुच नको’ अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. दिल्लीतील निर्भया ते कलकत्त्यातील अभया पर्यंत ती आज कुठेच सुरक्षित नाही. भर सभेत द्रौपदीची लाज राखणाऱ्या श्रीकृष्णाची जयंती साजरी करताना दही हंडीला प्रो गोविंदा लीग चे आधुनिक रूप देणाऱ्या व्यवस्थेला आणि बलात्काराची घटना घडली की मेणबत्ती मोर्चा काढणाऱ्या पांढरपेशा समाजाला, लाडकी बहीण म्हणून मिळणाऱ्या मदतीसाठी बँकांमध्ये तोबा गर्दी करणाऱ्या निम्नस्तरातील स्त्रियांना या सर्वांच्या मानसिकतेत प्रचंड मोठा बदल घडविण्याची वेळ आली आहे. एक राष्ट्र बांधणीचा आधारस्तंभ म्हणून मानसिकतेत बदल घडवण्यासाठी स्त्रियांचा रक्षणकर्त्याच्या जन्मानिमित्त केलेला हा लेख प्रपंच

समस्त भारतीयांचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण. श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि गोपाळकाला उत्सव म्हणजे आपल्या प्रचंड उत्साहाला आणि आनंदाला उधान. हा उत्साह आणि आनंद मनाला नुसताच विरंगुळा नाही तर प्रफुल्लित आणि उत्साहीत करून जातो. दहीहंडीत प्रत्यक्ष सहभाग म्हणजे संघभावना, खेळाडू वृत्ती, प्रोत्साहन, नेतृत्व गुण, सराव, सांघिक एकाग्रता, सहकार्याची भावना, जबाबदारीची जाणीव, सामाजिक समरसता व एकात्मतेचा विलोभनीय नजारा. तर लहान थोर अबाल वृद्धांसाठी नयनरम्य सोहळा. खरंतर यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या रूपात श्रावणात येणाऱ्या या भक्ती पर्वात निसर्गासहित आपण सर्वच विविध प्रकारांनी न्हाऊन निघतो.

हे सर्व जरी खरे असले तरी सध्या अवतीभवती घडणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील घटनांचा विचार करता, द्वापर युगात भगवान श्रीकृष्णांनी प्रेम आणि व्यवहार यांचा जो अर्थ सांगितला, त्याचा लवलेश ही सध्या दिसत नाही. तेव्हा वाटते फक्त गोपाळकाल्याच्या निमित्ताने

*”गोविंदा रे गोपाळा”*

केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर पुनश्च एकदा भगवान श्रीकृष्णांच्या कथा मुलांना जगायला शिकवल्या पाहिजेत. त्यात विशेषत: पालक, समाज, शिक्षक यांनी पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता व महर्षी वेदव्यासांचे महाभारत जाणून घ्यायला हवे. भगवान श्रीकृष्ण हे फक्त उत्सवासाठी न राहता जगण्याचा आधार व्हायला हवे. भगवान श्रीकृष्ण हे जगण्याचे साधन आहे हे राजमाता जिजाऊंनी शिवबांच्या मनावर ठसवले. म्हणूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळालेत. महाराजांनी श्रीरामचरित्र जीवनात तर श्रीकृष्णचरित्र राजकारणात वापरले. मित्रांनो लहानपणी आपल्यावर जे संस्कार होतात ते मोठेपणी निश्चितच उपयुक्त ठरतात. दुर्दैवाने नीतिमत्तेचे बाळकडू असणाऱ्या आपल्या अनेक धर्मग्रंथांचा प्रभाव गेल्या काही वर्षात अनेक परिचित-अपरिचित कारणांमुळे कमी झाल्याचे जाणवते. मोबाईल, इंटरनेट, गुगल, युट्युब, व्हाट्सअप, फेसबुक, इस्टाग्राम यासारख्यांच्या अनियंत्रित वापरामुळे समाजमन भरकटताना दिसत आहे. कीर्तन, प्रवचन यांना हल्ली फारसे कोणी जात नाहीत. घरात आजी-आजोबा दिसत नाहीत. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. वर्तमान कालखंडातील स्त्री शिक्षणाने नोकरी करती झाली पण तिच्याजवळ तिच्याच मुलांसाठी वेळ नाही. घरोघरी शोधूनही जिजामाता तर सोडाच पण तिची सावलीही सापडत नाही. मानवी जीवनावर संस्कारांचा मोठाच प्रभाव असतो. संस्कार देणाऱ्या केंद्रांचाच लोप होतांना दिसत आहे. याशिवाय संस्कार मूल्यशिक्षणातून मिळतात. शाळा-शाळांमधील पूर्वीचे मूल्यशिक्षणाचे तास बंद झाले आहेत.

महर्षी वाल्मिकी रचित रामायणातील नायक प्रभू श्रीराम तर महर्षी वेदव्यास रचित महाभारतातील नायक भगवान श्रीकृष्ण आहेत. भारत भूमितील बहुसंख्य लोकांनी या दोघाही नायकांचा ईश्वर म्हणून स्वीकार केला आहे. १९८७-१९८८ च्या जवळपास दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ९ ते १० या रामायण-महाभारताच्या मालिकेच्या वेळेत अखंड भारतातील रस्ते, गावं, शहरे सुनसान पडत. यावरून सुद्धा या भूमीतील लोकांची श्रीरामकृष्णां प्रती काय भावना आहे हे सहज लक्षात येते. यातील श्रीरामांकडे आपण आदर्श मानवी जीवनाचे चरित्र म्हणून पाहतो तर भगवान श्रीकृष्णांकडे आपण आदर्श व व्यवहार यांची समन्वयात्मक मांडणी करणारे चरित्र म्हणून पाहतो.

भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाचा सेनापती कालयवनाचा वध करण्यासाठी आधी युद्ध भूमीतून पलायन केले व पाठलाग करणाऱ्या कालयवनाचा चातुर्याने गुहेत निद्राधीन असलेल्या राजा मुचकुंदाकरवी वध घडवून आणला. हे एक उदाहरण आज च्या काळात सुद्धा मार्गदर्शक आहे. जीवन संघर्षात अंतिम विजय प्राप्त करण्यासाठी प्रसंगी दोन पावलं यशस्वीरित्या माघार घेता येणे हे तत्व आज आपण खरोखर किती प्रामाणिकपणे वापरतो? की समस्यांपासून कायमचे पलायन करतो?

महाभारत युद्धात युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धाचे नियम पितामह भीष्मांनी ठरवले होते. दुर्दैवाने ते नियम आपल्या धर्माचेच नियम आहेत असे समजून पुढील कालखंडात भारतीय राजांनी त्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसते. पण त्याच महाभारत युद्धात अंतिम विजय मिळविण्यासाठी नियम कुठे व कसे वापरावेत व कुठे वापरू नये याचा आदर्श वस्तूपाठच भगवान श्रीकृष्णाने घालून दिला होता . ‘शरण आलेल्यांना मारू नये’ या अशाच नियमामुळे पृथ्वीराज चौहाण ने मोहम्मद ग़ोरीला जीवनदान दिले. पण त्याच मोहम्मद ग़ोरीने पुढच्या युद्धात पृथ्वीराजला पकडल्यानंतर जिवंत सोडले नाही. मग इथे प्रश्न पडतो आम्ही आमच्या धर्मग्रंथांमधून आपल्या जीवन उत्कर्षासाठी व विजयासाठी योग्य संदेश घेतो का ?

भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीला, रासलीला लोकांना विशेष आवडतात. त्यासोबतच भगवान श्रीकृष्णांची बाळकृष्ण, गोपाळकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण, सखाकृष्ण अशी नानाविध रूपे सुद्धा लोकप्रिय आहेत.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे

जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी ईश्वर अवतार घेतात. भगवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्धात समोर असलेल्या परिस्थितीचा सर्व अभ्यास करून काय केले म्हणजे आपल्याला यश मिळेल याचा सर्व अभ्यास करूनच निर्णय घेतले. कर्माचा सिद्धांत सांगत अर्जुनाला ज्या प्रकारे कार्यप्रवण केले तोच संदेश आज आम्ही स्वीकारत आहोत का? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. इतकेच काय सध्याची बहुतांश मानवी प्रवृत्ती आपले कर्म प्रामाणिकपणे करण्याऐवजी त्यांचा भर कर्म टाळण्याकडे जास्त दिसून येतो. आणि केवळ या आणि याच आपल्या प्रवृत्तीमुळे अनेक घृणास्पद गुन्हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात. आपण त्या घडल्यानंतर त्यांचा निषेध किंवा आक्रोश मोर्चे काढतो. हा खरंच त्यावर उपाय आहे का? आपण समस्येच्या मुळाशी जाऊन खरच काम करणार आहोत का? तशी आपली धारणा आहे का?

महाभारतात धृतराष्ट्र जन्मतः अंध असल्याने व पुढे पुत्र प्रेमाने स्वतःच्या कर्माला योग्य न्याय न दिल्याने द्रौपदी वस्त्रहरण सारख्या घटना घडल्या परिणामतः त्याचे पर्यावसान महाभारत युद्धात झाले. एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मला असे सांगावेसे वाटते की आज धृतराष्ट्र किंवा कंस म्हणजे तुम्हां आम्हां सर्वांना स्वतःच्या योग्य व प्रामाणिक कर्मापासून दूर ठेवते ती प्रत्येक गोष्ट. बऱ्याच वेळेला ज्याची आपल्याला भीती वाटते, त्याकडे जर आपण धृतराष्ट्र किंवा कंस या दृष्टीने बघितलं व त्यावर विजय मिळवायचा असा निर्धार केला की आपले काम सोपे होते. आपल्यातील धृतराष्ट्र किंवा कंस म्हणजे काय तर स्वतःच्या मनातील वाईट विचार, दुसऱ्याला लुबाडून स्वतःला मोठे करणे, कायद्याचे पालन न करणे, चारित्र्यहीन काम, स्वतःमधील अहंकार, स्वतःमधील आसुरी प्रवृत्ती, स्वतःचे काम प्रामाणिकपणे न करणे, दुसऱ्याबद्दलची आपल्या मनातील वाईट भावना, वाईट विचार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना ते भोसल्यांचे राज्य आहे म्हणून कधीही विचार केला नाही. या उलट ते रयतेचे व रयतेच्या कल्याणासाठी स्थापन केलेले राज्य आहे हीच भावना होती. महाराजांच्या राज्यात स्री व रयत सुरक्षित व सुखी होती. वर्तमान जगात या संदर्भातील चित्र अत्यंत चिंताजनक आहे. अशावेळी पुष्यमित्र उपाध्याय यांनी लिहिलेल्या कवितेच्या ओळींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

सुनो द्रोपदी! शस्त्र उठालो,

अब गोविंद ना आयेंगे……

छोडो मेहंदी, खडग संभालो,

खुद ही अपना चीर बचालो |

महाभारताच्या युद्धात कर्णपर्वात कर्णाचा सारथी असलेल्या मद्र नरेश शल्याने कर्णाची ज्या प्रकारे अवहेलना केली, मानखंडना केली अगदी त्याच प्रकारे आजच्या समाजात कर्म करणाऱ्यांची अवहेलना करणारे शल्य मोठ्या प्रमाणात दिसतात. मात्र कर्माचा प्रेरणायुक्त संदेश देणारा श्रीकृष्ण मात्र दिसत नाही. माझ्या मते हेच खरे आजच्या समाजाच्या दुःखाचे कारण आहे.

श्रीकृष्णाचे चरित्र जगणे यातच आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.

या देशावर संस्कृतीवर मनापासून प्रेम करणारा एक राष्ट्राभिमानी शिक्षक म्हणून मी माझ्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी कालसापेक्ष *’गोपाळकाल्याच्या निमित्ताने……..’* हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

धन्यवाद.

लेखक प्रा.प्रशांत शिरुडे

के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली.

prashantshirude1674@gmail.com

9967817876

प्रतिक्रिया व्यक्त करा