विशेष संपादकीय…
*छ.शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण; शिवप्रेमींना फक्त वेदना*
सिंधुदुर्ग… हे नाव ज्यांच्या सामर्थ्याचं अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान आहे अशा छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यावरून जिल्ह्याला पडलं, त्याच छ.शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परशुरामाच्या भूमीत आज छ.शिवाजी महाराजांच्या नावाने केवळ राजकारण सुरू आहे, त्यामुळे जे खरोखरच छत्रपतींना आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून केवळ त्यांच्या स्मरणाने नतमस्तक होतात त्या शिवप्रेमींना मिळत आहेत केवळ वेदना…
होय, वेदनाच…!
कारण, जिथे छत्रपतींनी साडेतीन ते चारशे वर्षांपूर्वी अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला बांधला तो सिंधुदुर्ग आजही अजस्त्र लाटांचा मारा झेलत छत्रपती कसे होते याचे उत्तम उदाहरण म्हणून ताठ मानेने समुद्रात उभा आहे तिथेच समुदाच्या काठावरील राजकोट किल्ल्यावर राजकीय अभिलाषेपोटी म्हणा किंवा राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपण काहीतरी आगळं वेगळं करतोय असे दाखविण्यासाठी किंवा कुणाला तरी खुश करून आपली पाठ थोपटून घेण्यासाठी छ.शिवाजी महाराजांचा देशात कुठेही नसेल असा वेगळ्याच ढंगातील पुतळा उभारला गेला. त्याला स्थानिक शिवप्रेमी जनतेने, छत्रपतींचे वारस समजले जाणारे कोल्हापूरच्या गादीचे वारसदार यांनी देखील नाकारले होते. कारण तो पुतळा कदाचित शिवाजी महाराजांची खरी ओळख दाखवतच नव्हता, तर त्यात शिवप्रेमींना महाराज शोधावे लागत होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला ज्या शिवरायांनी ताठ मानेने जगायला, लढायला शिकविले, समाजात उभे रहायला शिकविले तिथे आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेने कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून उभा केलेला छ.शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडतो हे केवळ दुर्दैवच नव्हे तर छत्रपतींच्या नावावर राजकारण करणाऱ्या राजकीय धुरंदरांसाठी शरमेची बाब आहे. कदाचित “शरमेची” हा शब्द देखील त्यांच्यासाठी तोकडा पडेल, कारण त्यावर त्यांनी दिलेली स्पष्टीकरणे म्हणजे “चोरावर मोर” अशाच प्रकारातील आहेत.
*जिल्हा नियोजन मधून पुतळ्यासाठी निधी दिलेला का..?*
राजकारणाने किती खालची पातळी गाठावी याला देखील काहीतरी मर्यादा असतील ना..?
परंतु सर्व मर्यादांचे उल्लंघन करून देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या नौसेनेवर सर्व जबाबदारी ढकलून आज सरकारचे काही शिलेदार मोकळे झाले आहेत. परंतु ज्या अजस्त्र लाटांचा मारा झेलत असणाऱ्या जहाजांवर नौसेनेचे जवान देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावतात त्याच नौसेनेवर घडलेली घटना शेकून राजकारणी कसे काय मोकळे झाले..? पुतळ्यासाठी खर्ची घातलेला निधी नौसेनेला कोणी दिला होता..? महाराष्ट्र शासनाने की केंद्र सरकारने..? *जिल्हा नियोजन मधून पुतळ्यासाठी निधीची तजवीज करण्यात आली होती का..?* असेल तर ती कोणी केली..? तसा निर्णय कोणी घेतला..? जर जिल्हा नियोजन मधून निधी खर्ची घातला असेल तर जबाबदारी पूर्णतः नौसेनेची होती का..? असे अनेक प्रश्न आज आ-वासून उभे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन या दुर्घटनेवर काहीच का बोलत नाही..? प्रशासनाचे किंबहुना जिल्ह्याचे पालक असणारे पालकमंत्री देखील गप्प आहेत, असे का?? घडलेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे परंतु ती घडण्यासाठी कारणीभूत आहेत ते सर्व लोक ज्यांनी छत्रपतींचा पुतळा बनविण्यासाठी आणि उभारण्यासाठी प्रयत्न केला. कारण आजही शिवप्रेमींची मागणी छत्रपतींचे पुतळे उभारण्याची नाही आहे तर छत्रपतींनी उभारलेले गड, किल्ले जोपासण्याची, त्यांची आठवण किल्ल्यांची डागडुजी करून कायम ठेवण्याची आहे. परंतु केवळ राजकीय लालसेपोटी आम्हीच छत्रपतींचे कैवारी, आम्ही शिवप्रेमी असे दाखविण्याच्या फंदात गड किल्ले दुर्लक्षिले जातात अन् पुतळे उभारून “शायनिंग इंडिया” प्रमाणे केवळ दिखाऊ शिवभक्ती दाखवली जात आहे.
*भारत देशात अनेक नावाजलेले शिल्पकार आहेत…मग कल्याणचा हा नवखा शिल्पकार जयदीप आपटे शोधला कोणी..?*
जर घडलेल्या दुर्घटनेच्या मुळाशी जायचं असेल तर जयदीप आपटे कोणी शोधून आणला..? त्याला छत्रपतींचा पुतळा बनविण्याची जबाबदारी नक्की कोणी दिली किंवा नौसेनेकडे तो कसा पोचला..? की नौसेना केवळ पुतळा उभारणी एवढीच जबाबदारी पेलत होती आणि पुतळा बनविणारे कोणी दुसरेच होते..? या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे. एका नवख्या शिल्पकाराला छत्रपतींचा पुतळा बनविण्याची कामगिरी दिली परंतु त्या पुतळ्याच्या उभारणीची जबाबदारी असणारे आर्किटेक्ट समुद्राच्या पाण्याचा, खाऱ्या हवेचा पुतळ्याच्या आतील लोखंडावर, पुतळा जोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या नट बोल्ट वर काही परिणाम होतो की नाही याबाबत काहीच शिकलेले नाहीत की त्यांना त्याबाबत काहीच ज्ञान अवगत नाही..? बांधकामचे अधिकारी जे जिल्ह्यात काम करतात यांना देखील पुतळ्याच्या आतील बाजूला वापरण्यात येणारे लोखंड, नट बोल्ट आदी खाऱ्या हवेत टिकतील की नाहीत..? याबद्दल माहिती नव्हती का..?
बरं, पुतळ्याच्या आतून लोखंड गंजून लाल गंजीचा रंग बाहेर येत आहे अशी माहिती मिळाली असताना देखील पुतळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष का झाला..? २३ ऑगस्टला बांधकाम विभाग नौसेनेला पत्र देतो आणि २६ ऑगस्टला पुतळा कोसळतो मग एवढे दिवस बांधकाम विभाग झोपला होता का..? आज घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक प्रश्न उभे राहत आहेत कारण यात अक्षम्य चूक झाली असून केवळ चूक नव्हे तर पुतळा उभारणीत काहीतरी गौडबंगाल असल्याचाही वास येऊ लागला आहे.
*राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया नक्की काय सांगतात..?*
जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळणे हे दुर्दैवी म्हटले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी त्याची जबाबदारी बांधकाम खात्याची नसून नौसेनेची असल्याचे देखील सांगितले आणि घडलेल्या प्रकारासाठी जबाबदार असणाऱ्या शिल्पकार, अभियंता, कंत्राटदार आदींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत सरकार सदर प्रकरणातून नामानिराळे असल्याचाच निर्वाळा दिला. जिल्ह्यातील दुसरे मंत्री नाम. दीपक केसरकर यांनी “वाईटातून काहीतरी चांगले घडायचे असेल” अशी प्रतिक्रिया नोंदवून घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला. परंतु वाईटातून चांगले घडायचे असेल असे केसरकर का म्हणाले..? जे पूर्वी घडविले होते ते वाईट होते का..? असाही प्रश्न केसरकर यांच्या वक्तव्यातून उभा राहतो. केसरकर यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देताना “जे घडले ते वाईट आहे, त्यातून पुढे चांगले घडेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभर फुटी भव्यदिव्य असा पुतळा सरकारच्या माध्यमातून उभा केला जाईल अशी माहिती दिली. मालवण कुडाळ चे आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर थेट बांधकाम विभागाचे कार्यालय गाठून रागाने भावनेच्या भरात कार्यालयातील खिडक्या दरवाजांची तोडफोड करत आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु शिवप्रेमींनी शांतता राखण्याचे देखील आवाहन त्यांनी केले होते.
*विरोधकांचे आंदोलन…सत्ताधाऱ्यांची कुरघोडी*
राजकोट किल्ल्यावर घडलेली दुर्दैवी घटना पाहण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी विरोधी शिवसेना(उबाठा) पक्षाने राजकोट किल्ला गाठला. हातात भगवे झेंडे, खांद्यावर पक्षाचे चिन्ह असलेली भगवे उपरणे घेत आपणच शिवप्रेमी, स्वराज्याचे खरे शिलेदार अशा अविर्भावात घोषणाबाजी करत आंदोलन केले, सरकारचा निषेध व्यक्त केला. विरोधकांच्या आंदोलनाला प्रतिकार करणार नाहीत तर ते नवेनवेले भाजपवाले कसले..?(जुनी भाजपा यात कुठेही दिसली नाही). आपण कोण आहोत..? कुठल्या घटनेसाठी एकत्र आलो आहोत..? आपण एकत्र आलो ते स्थळ कुठले आहे..? घडलेली घटना राजकीय आहे की आपल्या महाराजांच्या अस्मितेचा प्रश्न आहे..? या सर्व गोष्टींचा विसर पाडून विरोधी शिवसेना उबाठा आणि सत्ताधारी भाजपा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, हुल्लडबाजी करत एकमेकांवर दगडफेक, मारामारी देखील केली…इतके कमी होते म्हणून की काय ऐतिहासिक राजकोट किल्ल्याचे अवशेष देखील पाडले. राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांची झालेली धुमश्चक्री आज संपूर्ण देशाने पाहिली…देशाच्या पंतप्रधानांनी देखील आपण अनावरण केलेल्या पुतळ्याची झालेली अवस्था आणि आपलेच वारसदार त्यावर सामोपचाराने तोडगा न काढता करत असलेली दादागिरी, मारामारी, घोषणाबाजी देखील पाहिली, ऐकली आणि कदाचित त्यांचीही मान शरमेने झुकली असेल. ज्या छत्रपतींचे शौर्य आपल्या भाषणातून गाजवीत त्यांच्या नावावर राजकारण करतात त्याच छत्रपतींनी उभारलेल्या किल्ल्यावर मारामारी करतात, किल्ल्याचे अवशेष तोडून टाकतात अशा राजकीय लोकांना खरोखर छत्रपतींबद्दल प्रेम, आदर, मानसन्मान असेल का..? असता तर त्या पवित्र स्थळी जात छत्रपतींना दुःख होईल, त्यांचा अनादर होईल असे राजकीय पक्ष वागलेच नसते..तर एकमेकांवर कुरघोडी न करता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते शहाणे झाले असते…!