You are currently viewing “यदा यदा हि धर्मस्य……”

“यदा यदा हि धर्मस्य……”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित पत्र*

 

*”यदा यदा हि धर्मस्य……”*

 

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त….एक पत्र

 

आपल्या कर्मयोगी, धर्मयोगी, राजकारणी ….अशा प्रेमस्वरूप, सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णास हक्काने आपले दुःखी मनोगत सांगून , त्याला प्रेमाने आणि आपला मानुन हक्काने हाक मारणारे हे एक पत्र….

 

प्रिय भगवान श्रीकृष्ण…

साष्टांग दंडवत🙏

 

हे परम दयाळू श्रीकृष्णा !

आपण कौरव पांडव यांच्या महायुद्ध प्रसंगी जी गीता अर्जुनास प्रतिपादिली ती आम्ही ही ऐकली आहे.मला आज त्यातील एका श्लोका वर आपल्याशी बोलायचे आहे.

आपण सांगितले…

 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥”

अर्थात… : हे भारत!(अर्जुन)

जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येऊन धर्माची हानी होते…आणि अधर्म फोफावतो…..

तेंव्हा तेंव्हा मी परत परत जन्म घेतो…नवीन रूप घेऊन अधर्माचा नाश करण्यासाठीच अवतरतो…अवतार घेतो.

 

हे श्रीकृष्णा ! मला तुला आता हेच सांगायचे आहे, की ती वेळ आता आली आहे. या भूतलावर तुझा अवतार घेण्याची वेळ.

इथे या माझ्या लेकारांवर प्रचंड संकटे येत आहेत…विशेषत: माझ्या लेकींवर!

अरे ! २किंवा ३ वर्षांच्या मुलींवर अत्याचार होत आहेत नराधमांकडून. कोवळ्या कळ्या कुस्करल्या जात आहेत…ते ही मोठ्याप्रमाणात. अरे! त्या नराधमांना आवर घालायला, त्यांना जन्माची अद्दल घडवायला तरी ये रे बाबा !…तू तारणहार आहेस. हात जोडते तुझ्या समोर.

आज या माझ्या देशात २ वर्षाच्या मुली पासून ६०/७० वर्षाची स्त्री ही धोक्यात आली आहे रे !

त्या स्वतः स्वावलंबी बनत आहेतच, पण तरी ही झुंडीने येऊन अत्याचार करतात हे लोक.

ते पकडले पण जातात ,पण निर्दोष ही सुटतात…का? तर पुरावा नाही म्हणून…

अरे!अत्याचार होत असताना कोणती स्त्री फोटो काढत बसेल?…अशावेळी अचानक घटनेचा काही पुरावा असतो का?

आणि शिवाय कोर्टात परत परत त्या स्त्रीवर शाब्दिक बलात्कार ही होत आहेत ते वेगळेच!….अरे कुठे थांबेल ही स्त्रीची विटंबना??

तू द्रौपदीचे वस्त्रहरण प्रसंगी तिची मदत करून अब्रू वाचवलीस… आम्हांला छान वाटले, तुझ्या बद्दल आदर वाढला….पण अशा अनेक द्रौपदी आज तुझ्या कडे अपेक्षेने मदतीसाठी पहात आहेत…पण तू ढीम्म उभा आहेस आणि बघत बसला आहेस. हे तुला शोभणारे नाही. …..तुझ्या त्या वरच्या श्लोकाला आता तरी जाग….आणि नवीन अवतार घेऊन या अधर्म रुपी राक्षसांचा बंदोबस्त कर.

अरे! आज बांग्लादेशात जे सत्तांतर झाले,त्यात विनाकारण महिलांवर अतोनात अत्याचार झाले . प्रत्येक वेळी महिलाच का दिसतात या आंदोलनकारांना?.

हे श्रीकृष्णा ! अरे फक्त हाच प्रश्न नाहीय,की तू यावेस….तर आज माझ्या या देशात आता प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. राजकारणी लोक सामान्य जनतेला वेठीस धरून आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत. सत्तेसाठीचे राजकारण फक्त स्वत:चे खिसे भरून घेण्यासाठी होत आहे . सामान्य जनता, त्यात ही मध्यम वर्गीय होरपळला जात आहे .

महागाईने उच्चांग गाठला आहे..जातीभेद विकोपास पोहचला आहे . हिंदू..मुस्लिम दंगे वाढत आहेत…आणि या सर्वांची झळ गरीब जनतेला बसत आहे.

उपोषणे ,आंदोलने करून जनता रस्त्यावर उतरून दंगे घालत आहे…जे की काही गरज नसताना. एखादा मुद्दा घेऊन त्यावर भांडणे..तंटे होत आहेत….शिक्षणाचा तर आरक्षणाने खेळखंडोबा करून टाकला आहे. या आरक्षणाने मुळात हुशार असलेले विद्यार्थी मागे पडत आहेत…संधी वाया जात आहे.पूर्वी सारखे आता काहीच राहिले नाही.

डॉक्टर, शिक्षक ,इंजिनियर,आय एस अधिकारी जर आरक्षणाच्या राखीव कोट्यातून वर आले, तर जनतेला किती मोठ्या संकटात टाकत आहेत ते….याची कल्पना आमच्या बरोबर तू ही कर कृष्णा !

लायकीला महत्व असायला हवे, न की जातीला…आणि याच धोरणामुळे जातीवाद वाढीस लागत आहे. आणि त्याची झळ सामान्य माणूस सोसत आहे.

आज नाती ही दुरावत चालली आहेत …सख्खे असे कुणी राहिले नाहीत…आणि शेजारी ही बंद दाराआड लपले आहेत. कुणाला कुणाची गरज वाटत नाहीय, हे आमचे दुर्दैव आहे. पूर्वी एकत्र होते सर्व….मोठ्यांचा आदर सन्मान होता…त्यांच्या शब्दांना किंमत होती….आता हे बुजुर्ग बहुतेक अधिक प्रमाणात वृद्धाश्रमात बरोबरीच्या लोकांत राहणे पसंद करत आहेत…कारणे ही तशीच घडत असावीत…..लहान मुले घरी कुणी नाही म्हणून डे केअर मध्ये जातात….ही समाज रचनेची ‘ऐशी की तैशी’ परिस्थिती निर्माण झालीय…त्यात एक मूल म्हणून न बहीण आहे, त्यांना न भाऊ…..आपण आपले बरे ! अशाने समाजरचना धोक्यात आलीय कृष्णा ! ….आता तू ये …आणि एखादा जालीम उपाय करून ,परत काही वर्ष मागील व्यवस्था परत आणतोस का बघ बाबा !…कारण पूर्वीचे दिवस खरचं खूप छान होते….नातेवाईक ,शेजार धर्म सगळ्यांमुळे जगणे सोपे झाले होते. तसे आनंदी जीवन परत मिळू दे या माझ्या जनतेला. माझ्या माता भगिनी बिनधास्तपणे, मोकळे पणाने जगू देत…उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनू देत…आज ही त्या आहेत…पण त्यांच्यावर अत्याचाराची टांगती तलवार दिसत आहे…बाहेर गेलेल्या मुली बाळी… संध्याकाळी सुखरूप आपल्या घरी परतून याव्यात…एवढी तरी खात्री दे बाबा..!

आज अजून एक संकट माझ्यावर आले ते सांगते, आणि माझी तक्रार यादी बंद करते बाबा…अरे ! आमच्याच नतद्रष्ट लोकांनी जंगले कापली, आणि नदी नाल्यांचे पाणी अडवून त्यावर टोलेजंग इमारती उभारल्या….इमारतींचे जंगल निर्माण केले….त्यामुळे निसर्ग कोपतोय…. पावसाच्या एका आगमनाने पुर येऊन सर्वत्र पाणी पाणी होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे…लोकांना ऐन पावसाळ्यात घरेदारे सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे…एकाच पावसात हाहाकार उडत आहे…याला जबाबदार ही आम्हीच आहोत…पण कोण कुणाचे ऐकतोय?….. अस्मानी संकटे येण्याने जे नुकसान आहे…जी जीवित आणि वित्तीय हानी होते आहे…त्याला जबाबदार आम्हीच आहोत…हे माहीत आहे…पण काही करू शकत नाही….म्हणून तू ये बाबा !

सर्वांवर तू एकदा अवतार घेऊन कृपादृष्टी टाक तुझी..

मी ही हरत चालले आहे….माझे तुकडे तुकडे करण्याचा घाट काही परकीय लोक करत आहेत हे दिसतय माझ्या डोळ्यांना…पण माझीच माणसे एकजूट होत नाहीत….आपापसात हेवेदावे, भांडणे, राजकारण करत बसलेत….काय करू मी ?

हतबल आहे मी…छुप्या मार्गाने परकीय लोक माझ्या घरात घुसत आहेत…त्यांना आवरणे गरजेचे आहे…पण माझीच काही मूर्ख लोक त्यांना हात देऊन आत घेत आहेत…डोकं बडवून घेण्याशिवाय मी काहीच करू शकत नाही रे कृष्णा !

 

अजून बरेच बोलायचे आहे तुझ्याशी…पण आता प्रत्यक्ष भेटीत बोलेन…

हां ! पण मी माफी मागते तुझी, की या पत्रात मी निराश होऊन फक्त आणि फक्त निगेटिव्ह बाजूच तुला सांगते आहे…पण याच साठी तुझी गरज आहे, हेच मला पटवायचे होते तुला…

म्हणून….

योग योगेश्वर असा माझा सखा असणारा….

हे कृष्णा ! ये बाबा आता…तुझे कार्य आता परत सुरू कर बाबा…तुझी गरज आज प्रत्येक भारतीयाला आहे . जिथे आमचे हात टेकले, तेथून तुझे कार्य सुरू होऊ दे रे बाबा…

 

तुझीच सदैव पूजा करणारी तुझी

भारतमाता…

 

©पल्लवी उमेश

जयसिंगपूर

…………………………………………………

प्रतिक्रिया व्यक्त करा