You are currently viewing महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा पुतळा कोसळणे ही क्लेशदायक घटना

महाराष्ट्राच्या आराध्य देवतेचा पुतळा कोसळणे ही क्लेशदायक घटना

 

साडेतीनशेहून जास्त वर्षापूर्वी छत्तीपतीनी महाराष्ट्राच्या कडेकोट सुरक्षेसाठी किल्याच्या माध्यमातून उभी केलेल्या तटबंदीचा एकही चिरा ढळला नाही माञ महाराजांनी १६६४ मध्ये बांधलेल्या राजकोट किल्यांच्या प्रवेशद्वारा समोर अवघ्या आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा वाऱ्याच्या झोताने कोसळतो याला काय म्हणावं?

छञपतींच्या या पुतळ्याची उभारणी सुरू होती तेव्हा थोडफारं स्थापत्यशास्त्र समजणऱ्यानी या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली होती… राजकीय विरोधक राजकारण करतात अशी नेहमीप्रमाणे मल्लीनाथी करून दुर्लक्ष केलं गेलं. नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक चुका या विचारात घेऊन पुतळा का बरं उभारला नाही? तो पुतळा काही सर्वसामान्याचा नाही.. अवघ्या विश्वात हिमालयाच्या उंचीचं कर्तुत्व आणि रयतेच्या कल्याणासाठीच झटणारा जाणता राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा शिवरायांचा तो पुतळा… ज्याच्यांशी अवघ्या भारत वर्षातील कोट्यवधी शिवभक्तांच्या भावना जोडलेल्या आहेत.

साकव, पुल, रस्ते वाहून जातात.. सरकारी पैशात बांधलेल्या इमारती गळतात, कोसळतात हे आम्ही नेहमीच अनुभवतो. भ्रष्टाचाराची गटारगंगा अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वहाते त्यात कसा कुणाचा निभाव लागणार? मात्र महाराजांच्या पुतळ्याबाबतही जर गांभीर्य नसेल तर या सगळ्याच राजकीय पक्षांना आणि नेत्यांना महाराजांचं नावं घ्यायचा अधिकार नाही..

महाराष्ट्रात तर छञपती, शाहू, आंबेडकर, फुले या महापुरुषांचा फक्त आणि फक्त राजकारणासाठीच उपयोग केला जातो. हे सत्य नाकारून चालणार नाही..

सरकारी पैशातून होणाऱ्या या सगळ्या सार्वजनिक कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी जी यंञणा असते त्या यंञणेने काय पाहिल? मला आठवत, १९९६ मध्ये मा. सुरेशजी प्रभू खासदार होते तेव्हा त्या दक्षता आणि सनियंत्रण समीतीवर मला त्यांनी अशासकीय सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली होती. तेव्हा पंतप्रधान सडक योजने अंतर्गत एका रस्त्याचं काम सुरू होत. अशासकीय सदस्य म्हणून मी त्या कामाची पाहणी केली मी जरी तज्ञ्ज नसलो तरी संबंधित कंञाटदार कामाची गुणवत्ता मेन्टेन करत नाही हे जाणवलं. मी साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली एवढचं नव्हे तर दक्षता आणि सनियंत्रण समितीच्या मिटींगमध्ये हा विषय मांडला.. परिणामी कंञाटदाराला झक मारत आपल्या कामात बदल करावा लागला… आज सगळीकडेचं याचा अभाव आहे. टक्केवारीच्या राजकारणाचा प्रभाव सगळीकडेच दिसतो.

श्रेयवादात गुरफटलेल्या या जिल्ह्याची खरचं आणखीन किती वाट लागणार? देव जाणो.आता यावर क्रिया- प्रतिक्रिया सुरू होतील. जोरात टिका- टिप्पणी होईल… मग नेहमीप्रमाणे एखादी चौकशी समिती नेमली जाईल. यथावकाश त्याचा अहवाल येईल. Public memory is very short, या न्यायाने जनता विसरून जाईल.. आणि मग आपण पुढच्या अशा दुर्दैवी घटनेची वाट पाहू… आजकाल असं स्पष्टपणे व्यक्त होण सुध्दा कठीण झालय.. वास्तवाचा विचार न करता वैयक्तिक लाभासाठी री ओढणाऱ्या लाचारांची संख्या वाढत आहे.. आणि हेच खरं तर निरोगी सामाजिक जडणघडणीला बाधक आहे.

अशाप्रकारेचे पुतळे बांधून आमच्या छञपतींचा का म्हणून अपमान करता? अशा प्रकारची सार्वजनिक कामं करताना समाजातील सर्व स्तरातील तज्ज्ञ व प्रामाणिक माणसांचा सहभाग असणे आवश्यक असते पण आजकाल फक्त झिंदाबाद म्हणणाऱ्यानाचं ही संधी दिली जाते त्यामुळेचं ही परिस्थिती उदभवते.

घडलं हे घडलं.. ते नैसर्गिक आपत्तीमुळे असेल किंवा तांत्रिक चुकीमुळे.. त्याच समर्थन मुळीच करता येणार नाही… आणि आता कुणी राजकारणही करू नये. महाराजांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात पाळलेला संयम आपण त्यांच्या जीवनचरित्रात वाचला आहे… आपण सगळ्याचं शिवप्रेमीनीं यापुढची परिस्थिती संयमाने हाताळूया… महाराज आणि त्यांचे विचार हे या देशातील प्रत्येक भारतीयांच्या कणाकणात आहेत.. प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबात आहेत दुर्दैवाने काही सत्तापिपासू मंडळींनी महाराजांच्या मुळ विचारालाचं तिलांजली दिली.

.. जय शिवराय..

.. जय भवानी- जय शिवाजी..

… शिवप्रेमी- अॅड. नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा