छत्रपतींचा पुतळा कोसळणारी घटना संशयास्पद!
जातीय दंगल निर्माण करण्याचा विरोधकांचा कट.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर
सिंधुनगरी प्रतिनिधी
मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर देशाच्या नौदलाने सन्मानाने स्थापन केलेला शिव छत्रपतीं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे संशय आहे. हा एक राजकीय कटाचा भाग आहे. आमच्या सरकारने महिला व सर्व सामान्य जनतेसाठी विविध योजना हाती घेतल्यानंतर जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी व राज्यात जातीय दंगल निर्माण करण्याचा हा राजकीय कट असल्याचा संशय आहे. म्हणूनच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज, सॅटॅलाइट फुटेज तपासून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सिंधुदुर्ग चे जिल्हा पोलीस अधीक्षक व राज्य व देशाच्या गृह विभागाकडे केली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
राज्यात अन केंद्रात सत्तेतील भाजप सरकारने सर्वसामान्य जनता महिला या सर्वांसाठी चांगल्या योजना आणल्या आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे विरोधी पक्ष गोंधळून गेला आहे. बदलापूर येथील घडलेली दुर्दैवी घटना, पुणे येथील आंदोलन व आता मालवण राजकोट येथील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे या सर्व घटना पाहता हा राजकीय कटाचा भाग असल्याचा संशय आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे अशी प्रतिक्रिया अतुल काळसेकर यांनी दिली.
नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानाने ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नौदलामार्फत हा पुतळा उभा करण्यात आला. प्रथमच असे ऐतिहासिक ठिकाण पुन्हा उभे करण्यात आले. मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला 350 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्यानिमित्ताने या जिल्ह्यात नौदल दिनाच्या प्रमुख कार्यक्रम झाला. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमालाही जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सरकारचे कौतुक केले. हे कौतुकही विरोधकांना रुचलेले नाही. आणि त्यामुळेच हा पुतळा पडण्यामागे राजकीय कटकारस्थान आहे असा आपला संशय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी आपण मागणी केल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.