You are currently viewing कोकणचे साहित्यरत्न व ज्येष्ठ साहित्यिक कै.विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेत बरसल्या काव्यधारा

कोकणचे साहित्यरत्न व ज्येष्ठ साहित्यिक कै.विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेत बरसल्या काव्यधारा

सावंतवाडी :

रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस धो धो कोसळत होता. मात्र या कोसळणाऱ्या पावसासोबतच सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिर मध्ये कवी व कवयित्रींच्या प्रतिभा शक्तीने काव्यधारा देखील बरसल्या. कोकणचे साहित्यरत्न व ज्येष्ठ साहित्यिक कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे यंदाचे 14 वे वर्ष होते. सलग चौदाव्या वर्षी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. यात तब्बल 25 कवी – कवयित्रींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बांदा येथील मीनाक्षी अळवणी यांनी पटकावला तर द्वितीय सावंतवाडीचे अक्षय कानविंदे व तृतीय क्रमांक वेंगुर्ला येथील प्राजक्ता संकेत करंगुटकर तर उत्तेजनार्थ सावंतवाडीच्या योगिता शेटकर व द्वितीय उत्तेजनार्थ माया गवस यांनी पटकावला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, उपाध्यक्ष उषा परब, सचिव प्रा. सुरेश मक्कनावर, कोषाध्यक्ष भरत गावडे, प्रमुख अतिथी वेंगुर्ला येथील ज्येष्ठ कवी अरुण नाईक तसेच स्पर्धेचे परीक्षक स्नेहा फणसळकर, किशोर वालावलकर, कवी विठ्ठल कदम, श्रिया भागवत आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कवी अरुण नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषा परब यांनी सादर केले. दरम्यान त्यांनी मागील 14 वर्षातील अविरत सुरू असलेल्या स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे महत्त्व विशद केले. तसेच कविवर्य विद्याधर भागवत यांच्या साहित्य संपदे विषयी सखोल चिंतन सादर केले. आरती मासिक याचा प्रवासही त्यांनी उलगडला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा यांनी स्वर्गीय विद्याधर भागवत यांच्याविषयी आपल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांची थोरपण अत्यंत साधेपणात दडलेले होते. हे विशेष हे देखील सांगितले. विद्याधर भागवत यांच्या प्रेरणेने 1984 मध्ये ‘आरती’ मासिक सुरू करण्यात आले. स्व. भागवत सरांच्या या स्मृती अखंड तेवत ठेवण्यासाठी दरवर्षी स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

सदर कार्यक्रम चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शाळांतील बालकवी व कवयित्री देखील सहभागी झाले होते. सर्व यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रक्कम तसेच ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

ॲड. नकुल पार्सेकरांकडून बाल कवयित्रीचे कौतुक –

या कार्यक्रमाचे अजून एक विशेष म्हणजे भागवत सरांचे अतिशय निकटवर्तीय शिष्य व सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर यांनी या काव्यवाचन स्पर्धेत सहभागी झालेल्या एका बालकवयित्रीला रुपये पाचशे रोख रक्कम देऊन सन्मानित केले. हा गौरव त्या बाल कवयित्रिच्या काव्यप्रतिभेचा असून स्वर्गीय विद्याधर भागवत यांना अपेक्षित असलेले साहित्यिक निर्माण व्हावेत, यासाठी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर काव्यवाचन स्पर्धेला साहित्यिक व काव्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शासनाचा सवित्रिमाई फुले पुरस्कार प्राप्त प्रा. सुषमा मांजरेकर यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, ॲड. नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, कवी मनोहर परब, कृष्णा गावडे, विजय गावडे, संगीता सोनटक्के, कवी दीपक पटेकर, बाळकृष्ण राणे, सूर्यकांत सांगेलकर यांसह अनेक साहित्यप्रेमी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. आभार प्रदर्शन भरत गावडे यांनी केले तर उपस्थित मान्यवर व परीक्षकांचा परिचय कवी विठ्ठल कदम यांनी करून दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा