You are currently viewing माऊली

माऊली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा अनिल कुळकर्णी लिखित आठवण सारांश इंद्रायणी काठी*

 

*माऊली*

 

श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती निमीत्त हा आठवण सारांश “इंन्द्रायणीकाठी” या रवीन्द्र भट यांच्या कादंबरीवर आधारित

 

🌸चारही वेद जन्मले जिच्या उदरी

धन्य ती कूस रूक्मीणीची

निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताई

चारही जीवनमुक्त संत योगी.

आले ग्रामण्य व्युत्पन्न पंताच्या भाळी

झोळी माधुकरीची आली त्यांच्या हाती

निवृत्ती झाला निवृत्तीनाथ

ज्ञानेश्वर ज्ञानवंत तेजस्वी

अमृतवर्षाव झाला रसनेवर

बरसली प्रतिभा घेऊन अभंगरुप सुंदर.

झाली सिध्दी योगसाधनेची

प्रसन्न झाल्या बावन्न शक्ती

ओंकार उपासना ज्ञाना दावी गुरूभक्ती,सगुणभक्ती.

मधुकरी मागाया आले ज्ञानोबा(बालयोगी)

माणुस धर्माची लाविली पताका

झोळी भरली रूढीच्या अहंकाराने,समाजाच्या कोपाने,पाखंडीपणाच्या आरोपाने,

मायतातांच्या देहान्त प्रायश्चित्ताने.

विश्वाचं सुदर्शन चक्र फिरलं

धर्मरूढींच्या वादळात नाही स्थिरावलं

ज्ञानदेवांच्या हाती आली चौपदरी

स्विकारण्या इच्छादानाची मधुकरी

निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताई

निघाली पंढरी भावंडांची वारी

पंढरीच्या वाटेवर जप हा

 

“रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी”

 

विकसली शब्दकळा आनंदल्या चित्तवृत्ती

लयबद्ध ध्वनीरूप ते स्फुरल्या सात्वीकवृत्ती

 

“रूप पाहता लोचनी,सुख जाले वो साजणी

तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा”

 

मान्य करण्या अस्तित्व परमेश्वराचे

चमत्कार दावी संत भगवंताचे

जड भित्ती केला, दिली प्रेरणा,

वदविले वेद महिषराज मुखी

ज्ञानदेवचा ज्ञानेश्वर झाला सर्वतोमुखी

नेवासे तीर्थक्षेत्री वाग्यज्ञ केला प्राकृत गीतेवर

ज्ञानामृताचे धागे गुंफून पौरजनांना दिले आत्मस्वरूपाचे पांघर

प्रसाद पसायदानाचा दिला गुरूमाऊलीने.

शालीवाहन शके १२१२ धन्य झाले मोरपिसाच्या लेखणीने

सगुण समाधी ही संजीवन,ज्ञानियांचा राजा आहे चिरंतन.

 

सगुण भक्तीचे मळे फुलवले इंद्रायणीकाठी

तापलेले नरदेह येती ज्ञानेश्वरांची आनंदगाथा श्रवण करण्यासाठी.

 

धन्य झाली इंद्रायणी,धन्य ती आळंदी

 

🌸श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण🌸

सौ. अनघा अनिल कुळकर्णी

पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा