मालवण
रुग्णमित्र स्व. जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ मुंबईतील रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आठ सामाजिक संस्थानी नववर्षारंभी १ जानेवारीला सायन हॉस्पीटलमध्ये भरविलेल्या महा रक्तदान शिबीरात सिंधुदुर्गातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान या संस्थेचा रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुंबईतील रक्तदान व सामाजीक कार्यात अग्रेसर असणाऱ्या युनिक ब्लड मोटीवेटर्स, रुग्णमित्र – रुग्णकल्याण सेवा सामाजीक संस्था, जीवनदान सामाजिक संस्था, डोनेट अ लाईफ, थैलेसेमीया निर्मुलन समिती, जनता जागृती मंच, संडे फ्रेंडस् आणि ग्लोबल रक्तदाते या आठ संस्थांनी मिळून रुग्णमित्र – रुग्णकल्याण सेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक स्व. जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ १ जानेवारीला सायन हॉस्पीटलमध्ये महा रक्तदान शिबिर भरविले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात कोरोना काळात जिवाची बाजी लावून सामाजिक कार्यात धडाडीने कार्य केलेल्या २४ व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदानाच्या क्षेत्रात अनेक शिबिरे आयोजीत करुन भरीव कार्य करणाऱ्या आणि काही लाखात सापडणाऱ्या बाम्बे ब्लड ग्रुपचे दाते अवघ्या काही हजारात चार रक्तदाते जगासमोर आणून बॉम्बे ब्लड ग्रुपच्याबाबतची सिंधुदुर्गाची श्रीमंती जगाला दाखवून देणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचाही यथोचित गौरव करण्यात आला. संस्थेच्या वतीने हा गौरव संस्थेचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर व सदस्या कल्पना धुरी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्विकारला. माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल गलसले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी विरेंद्र तांडेल, बॉम्बे ब्लड ऑर्गनायझेशनचे विनय शेट्टी, अजित वहाडणे, जयकुमार साटेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.