You are currently viewing स्पर्धा

स्पर्धा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*स्पर्धा*

 

अकबर राजाच्या दरबारात, बैजनाथच्या वडिलांच्या संगीताचा अपमान झाला होता. त्या अपमानाचा बदला घेण्याच्या भावनेने बैजूनी अकबर बादशहाच्या नवरत्न दरबारातील महान गायक ज्याच्या गाण्याने पाऊस पडत असे दीप प्रज्वलित होत असत अशा संगीतसूर्य तानसेनास संगीत स्पर्धेत हरवण्याचा विडाच उचलला. बैजू ने स्वतःला संगीतात इतके झोकून दिले की लोक त्यास बैजू बावरा म्हणू लागले. हा बावरा बैजू तानसेनाचे गुरु *स्वामी हरदास* यांच्या दारी शिष्यत्वाची विनवणी घेऊन आला त्यावेळी गुरु हरदासांनी त्याला सांगितले,” तू मनात इर्ष्येच्या भावनेने संगीत शिकण्याचा प्रयत्न करशील तर तुला संगीताचे निखळ, पवित्र, मंगल ज्ञान कधीही लाभणार नाही. प्रथम मनातली स्पर्धेची भावना काढून टाक. त्यातून निर्माण झालेली सुडाची भावना सोडून दे. स्वच्छ निर्मळ मनाने माझ्याकडे ये.”

 

हा गुरूंचा उपदेश किती मौलिक होता! स्पर्धेत तानसेन हरला, बैजू बावरा जिंकला पण स्पर्धेच्या अटीप्रमाणे बैजूने तानसेनाला प्राणार्पणाची दिलेली शिक्षा मात्र बादशहाकडून रद्द करून घेतली. संगीत क्षेत्रामधला तानसेन एक हिरा होता तो टिकला पाहिजे ही त्या मागची भावना. गुणांची कदर करणाऱ्या दोन गुणी कलावंतांमधली ही स्पर्धा इतिहासात अजरामर झाली.

 

आज या कहाणीचा वेध घेताना आणि स्पर्धा या शब्दावर थांबताना मनात अनेक विचार येतात.

स्पर्धा चांगल्या की स्पर्धा वाईट?

स्पर्धा हव्यात की नकोत?

पटकन उत्तर देता येत नाही ना?

मी म्हणेन चांगल्या स्पर्धा जीवनात हव्यात. गुणात्मकतेचा तुलनात्मक अभ्यास स्पर्धांमुळे होतो. स्पर्धेतील यश, अपयश व्यक्तीची पात्रता, योग्यता ठरवतात.

 

मला तर असे वाटते माणूस जन्माला येतो त्याच दिवसापासून तो जीवनाच्या स्पर्धेत उतरलेला असतो. म्हणजे बघा ना …मुलगा की मुलगी? काळा की गोरा? आईसारखा की बाबांसारखा? अशा अनेक प्रश्नांना सोबत घेऊनच तो जन्माला येतो आणि तिथूनच या पडद्यामागच्या स्पर्धेला सुरुवात होते. मरेपर्यंत तो स्पर्धेतून माघार घेऊच शकत नाही. जीवन जगत असताना भावंडांशी, शैक्षणिक आयुष्यात मित्र-मैत्रिणींशी, हुशार की मध्यम बुद्धीचा की *ढ*च, क्रमांक पहिला की शेवटचा… पुढे मग संसाराची घडी बसवताना तर भलं मोठं विस्तारलेलं स्पर्धेचं युगच सुरू होतं. त्यात कधी आनंददायी फुलं ओंजळीत येतात तर कधी काटे. कधी आरामशीर तर कधी ठेचकाळात वाटचाल होते. कधी सगळं जग मुठीत असतं तर कधी हाती भलं मोठं शून्य असतं. मग स्वतःला तपासण्याच्या नादात याच्या त्याच्याशी तुलना सुरू होते. इर्ष्या, सुडाच्या भावनांचा उद्गम होतो आणि नकळत हिंसकतेला दार उघडले जाते. ज्या स्पर्धांमधून अस्थिरता, अराजकता, बेचैनी, हिंसाचार निर्माण होऊ शकतो अशा स्पर्धा नकोतच मुळी.

 

ज्या क्षणी स्पर्धा संपते त्या क्षणी हरणारा आणि जिंकणारा या दोन भेदसंज्ञा नाहीशा झाल्या पाहिजेत आणि स्पर्धकांच्यामध्ये दिलजमाई झाली पाहिजे. हरणं आणि जिंकणं यातलं अंतर मिटलं पाहिजे.

“ तू जिंकलास कारण तू पात्र होतास.” तसेच,

“ तुझ्यासारखा लढाऊ वृत्तीचा मी आजपर्यंत पाहिला नाही. मीच तुला सलाम करतो.”

दोन स्पर्धकांमधला हा संवाद त्या स्पर्धेचीच गुणवत्ता वाढवतो. अशा स्पर्धा हव्यात.

 

आपण सर्वसामान्यपणे चार युगे मानतो. *सत्ययुग**त्रेतायुग* *द्वापारयुग* आणि कलियुग पण आजच्या कलियुगात एक उपयुग आहे आणि ते म्हणजे *स्पर्धायुग*. आजकाल सर्वत्र हे स्पर्धात्मक वातावरण अनुभवताना जीव जेरीस येतो. तुलना आणि स्पर्धा एकमेकांच्या हातात हात घालून येतात. आधी तुलना होते आणि मग स्पर्धा सुरू होते. या स्पर्धाचक्रात खरं म्हणजे सगळेच गिरक्या घेत आहेत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. *आय ॲम द बेस्ट* होण्याच्या मानसिकतेतून ज्या स्पर्धा निर्माण होतात त्या खरोखरच काही वेळा घातक ठरू शकतात.

 

आजकाल मुलांचे पालक केवळ स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न करून आपल्या अजाण पाल्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अनेक कला, क्रीडा, मनोरंजन माध्यमातून एक प्रसिद्ध चेहरा बनवण्यासाठी जिथेतिथे ढकलतात.

“अरे माझ्या पाल्या तुला काय हवंय?” याचा त्यामागे विचारही नसतो. मुलांचं व्यक्तिमत्व घडविण्याच्या अतिरेकी नादात या स्पर्धा कोणता जीवनाविषयीचा गुणात्मक संस्कार त्यांच्यावर करतात? यातून मग स्वाभाविकपणे काही प्रश्न नक्कीच उद्भवतात.

“ मग हे करूच नये का?।

“ जगात जे चाललं आहे त्याकडे पाठ फिरवून जगायचं का?”

“ मग विकास, ज्ञान, प्रगती करण्याची दुसरी माध्यमे आहेत का?”

“ धावत्या जगाचा हात धरून आपण पळत राहिलो नाही तर मागे नाही का पडणार?”

हे प्रश्न म्हणजेच एका विशिष्ट मानसिकतेचा प्रवाह आहे. एक माईंड सेट आहे आणि तो स्पर्धा करायला भाग पाडतो. स्पर्धेत जरूर उतरावं पण उतरण्यापूर्वीची मानसिकता प्रबळ झाल्यावरच.

“ जिंकलो तर आनंद आहेच पण हरलो तर.. देअर इज ऑलवेज नेक्स्ट टाईम किंवा धिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ” अशा सकारात्मक विचारांची पूर्वतयारी फार आवश्यक आहे. शिवाय ज्याच्या समोर पराभूत ठरलोय त्याचा यथोचित सन्मान ठेवता आला पाहिजे. सूडबुद्धी, तिरस्कार, उपहास नको.

 

ऑलिंपिकचे दिवस चालू आहेत. सुवर्ण, रौप्य, ब्रांझ पदकासाठी प्रचंड चुरस वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात दिसत आहे. खरं म्हणजे हा एक विस्तृत खेळांचा आखाडा आहे इथे खेळ महत्त्वाचा. कुणीतरी हरणार कुणीतरी जिंकणार पण त्यातही घुसलेलं बाजारी राजकारण पाहिलं की मनाला खंत वाटते. अशा प्रकारचा क्रीडा क्षेत्रातला कुठलाही इव्हेंट असू दे ज्या ठिकाणी अनेक देश सहभागी असतात आणि त्या मागचा हेतू हा असतो की *वसुधैव कुटुंबकम*. ग्लोबल प्रेम, मैत्री, समता, बंधुता, एकत्रीकरण. जगात जी सत्तेसाठी भयंकर विनाशकारी युद्धं चालू आहेत त्यावर नापसंतीची मोहर उमटवण्यासाठी एकाच मैदानावर अनेक देश स्पर्धांच्या निमित्ताने खिलाडू वृत्तीने एकत्र यावेत पण असे होते का?

इंडिया विरुद्ध पाकिस्तानची मॅच बघताना उरात प्रचंड धडधड असते. जिंकण्याची आस जरूर असावी पण हा हरलाच पाहिजे कारण हा माझा सरहद्दशत्रू आहे ही भावना दोन्हीकडे असते मग अशा स्पर्धा ज्यात आधीच वैरभाव भरलेला असतो, खिलाडू वृत्तीचा अंशही नसतो त्या टाळलेल्याच बऱ्या.

 

शेवटच्या टप्प्यावर हरलेल्या विनेश फोगटला जेव्हा पॅरिसमधला एक परदेशी प्रशिक्षक सांगतो,” हा निव्वळ योगायोग आहे. तू नक्कीच जागतिक दर्जाची कुस्तीपटू आहेस आणि हे तू सिद्ध केलेले आहेस.” तेव्हा ही ठरते स्पर्धेत उतरणाऱ्या स्पर्धकांची खरी गुणवत्ता.

 

राजकीय स्पर्धा बद्दल तर न बोललेलेच बरं नाही का?

निवडणूक ही फार मोठी गुणवान स्पर्धा आहे आणि तशी ती असायला हवी पण सत्तालोलुपतेच्या प्रवाहात निवडणूक स्पर्धेच्या अंतरातली लोकशाहीची मूळ तत्वं पार धुळीलाच मिळालेली दिसतात. मतांची पळवापळवी, आयाराम —गयाराम, घोडेबाजार, घोषणांचा महापूर, सत्ताधारी आणि विरोधक, त्यांनी एकमेकांवर ओढलेले आसूड, चारित्र्यहनन या सगळ्यांच्या वावटळीत *कोण कोणाचा कोण* या प्रश्नचिन्हात हरवलेला मतदार हेच सांगतो की,”अखेर या स्पर्धांचे फलित काय?”

 

नेपोलियन असो वा हिटलर असो …इतिहासाच्या पानापानावर रक्तरंजित हिंसाचाराची साक्ष या रणभूमीवरच्या सत्तास्पर्धा देतात.

 

जे. कृष्णमूर्तींचे एकच वाक्य मला आठवतं. ते म्हणतात,” कॉन्सन्ट्रेट ऑन द कॉम्पिटिशन विदीन यू.”

स्पर्धा स्वतःशी करा. स्वतःला उंच करा. या प्रक्रियेतूनच तुम्ही समाजाला उंच कराल.

 

जाता जाता इतकंच म्हणेन जीवनात स्पर्धा हव्यात पण त्या निरोगी हव्यात. गुणात्मकतेवर चिखलफेक करणाऱ्या स्पर्धा कशाला हव्यात?

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा