मालवण :
समुद्राला आलेल्या उधाणाचा जोर पौर्णिमेपासून वाढल्याने त्याचा फटका तोंडवळी गावातील तळाशील व मधली तोंडवळी भागाला बसला आहे. तळाशील येथील धर्मराज कोचरेकर यांच्या घरासमोरील भाग तसेच मधली तोंडवळी साई सागर रिसॉर्ट जवळील भागात मोठया प्रमाणात धूप होऊन समुद्राने भूभाग गिळंकृत केला आहे. अजून काही दिवस उधाणाचा प्रभाव राहणार असल्याने मोठया प्रमाणात धूप होणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.
दोन दिवस होत असलेल्या उधाणामुळे या भागात बंधारा नसल्याने मोठया प्रमाणात धूप होत आहे. उधाणाचा जोर अजून वाढणार आहे त्यामुळे समुद्राचे पाणीही वस्तीच्या दिशेन मार्गक्रमण करत आहे. उधाणाचा जोर कायम राहिल्यास मोठी धूप होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली. यावेळी माजी सरपंच आबा कांदळकर, दीपक कांदळकर, अनिरुद्ध जुवाटकर, भाऊ चोडणेकर, नामदेव तळवडकर, नृ्पृल तांडेल, मिलिंद मालंडकर गणपत शेलटकर उपस्थित होते.
एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला कालावल खाडी अशा जलाशय प्रवाहामध्ये तोंडवळी गावातील मधली तोंडवळी, तळाशिलवाडीच्या दोन्ही बाजूला वाढत चाललेलया पाण्याच्या आक्रमणामुळे तळाशिलवासीयांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी सुरक्षित बंधाऱ्याची गरज निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे होणारे खाडी, समुद्राच्या आक्रमणाकडे आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गांभीयनि बघण्याची वेळ येवून ठेपली आहे. तोंडवळीतील मधली तोंडवळी, तळाशिल भागाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण असून किनाऱ्याचा काही मीटर रुंदीचा भाग समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने समुद्रात विलीन झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही तळाशिलवासीयांवर किनाऱ्यावर बसून होणारी धूप पाहण्याची वेळ आली आहे.