प्रवासी संघातर्फे ४ सप्टेंबरला गणेशभक्त, चालकांचे स्वागत
कणकवली
तालुका प्रवासी संघ, कणकवली यांच्यातर्फे गणेशोत्सवासाठी येणारे प्रवासी व त्यांना घेऊन येणारे चालक, सुरक्षिततेसाठी मेहनत घेणारे पोलीस यांचे ४ सप्टेंबरला येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे सकाळी ९ वा. स्वागत करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघातर्फे वीजपुरवठा व एसटी बसेस सुरुळीत राहण्याबाबत वीज वितरणचे कार्यकारी अभियंता व एसटीचे विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले आहे. विभाग नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गणेशोत्सव काळात खरेदीसाठी खेडेगावातील गणेशभक्त बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. त्यांना. गावातून येण्यासाठी एसटी बस हेच किफायतशीर माध्यम आहे. त्यामुळे गावातून ये-जा करणाऱ्या एसटी
बसेस कोणत्याही स्थितीत रद्द करू नयेत. या गाड्या नियमित वेळेत सोडाव्यात. वीज वितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलेय, गणेशोत्सवात चाकरमानी गावी येत असल्याने त्यांची गावाकडील घरे बऱ्याच दिवसांनी उघडली जातात. त्यामुळे गणेशोत्सवात वीजपुरवठा अखंडित सुरू राहिल्यास सणाचा आनंद सर्वांना घेता येईल. त्यासाठी वीजखांब, तारा आदींची वेळेत दुरुस्ती व्हावी. कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्या. संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोहर पालयेकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव विलास चव्हाण, सल्लागार दादा कुडतरकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, सी. आर. चव्हाण, प्रवीण गायकवाड, अनिल परब, अमित मयेकर, संदेश मयेकर, सुगंधा देवरुखकर, श्रद्धा कदम, सुभाष राणे, केशव पारकर, गणपत चव्हाण आदी उपस्थित होते.