महाराष्ट्रातील युवक- युवतींना र्जनीत रोजगाराची संधी
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्रातील कुशल- अकुशल बेरोजगार युवक युवतींना जर्मनी येथे रोजगाराची अधिकृतरित्या पाठविण्यासाठीची महाराष्ट्र शासनाची योजना आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षण आपल्या जिल्ह्यात मोफत व जवळच देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक कौशल्य सुधारण्याचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथील सुरुवातीच्या काळातील मदतही महाराष्ट्र शासनाची असणार आहे. यासाठी नावनोंदणीचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबात सामंजस्य करार केला आहे. तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि.११ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.
पहिल्या टप्यात सुमारे १० हजार युवक- युवतींना संधी उपलब्ध होणार आहे. उत्पन्नामध्ये भरघोस वाढ व अत्याधुनिक यंत्रसामग्रीवर कामकरण्याची संधी युवकांना मिळणार आहे. आरोग्य सेवामधील तंत्रज्ञ, अतिथ्य सेवामधील तंत्रज्ञ, स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ व इतर विविध सेवांमधील तंत्रज्ञ म्हणून संधी उपलब्ध होणार आहे. शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवक-युवतींनी https://maa.ac.in/Germany Employment या वेबसाईटवर नाव नोंदणी करावी.
जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन, MA in जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांच्याद्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A१, A२, B१, B२, C१,C२ उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांनी नावनोंदणी करण्यासाठी (https://forms.cle/१Q३२BvNwp@MnHmHc७) ही गुगल लिंक तयार करण्यात आली आहे.
तरी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मनभाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांनी गुगल लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.