You are currently viewing “महिला आयोग आपल्या दारी” चे ३० ऑगस्टरोजी आयोजन

“महिला आयोग आपल्या दारी” चे ३० ऑगस्टरोजी आयोजन

“महिला आयोग आपल्या दारी” चे ३० ऑगस्टरोजी आयोजन

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने महिलांना त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाद्वारे जिल्हयातील महिलांच्या तक्रारींचे स्थानिक स्तरावर निराकरण करणेसाठी शुक्रवार दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिधुदुर्ग येथे जनसुनावणी आयोजित केली असल्याची माहिती  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे.

या जनसुनावणीस आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर स्वतः उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख तसेच कोकण विभाग महिला व बाल विकास विभागीय उपआयुक्त हे देखील उपस्थित राहणार आहेत.

या जनसुनावणीमध्ये ३ स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष येथील समुपदेशक, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पॅनेलद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे मुंबई येथील विभागीय कार्यालयातील सिंधुदुर्ग जिल्हयाच्या प्राप्त तक्रारी व इतर सेवाभावी संस्थेचे समुपदेशन केंद्र यांच्याकडील प्रकरणांचे, भरोसा सेल-पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्राप्त तक्रारी तसेच ऐनवेळी जनसुनावणीचे ठिकाणी येणाऱ्या पिडीत महिलांचे तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे. तक्रारीचे स्वरूप महिला केंद्रित कौटुंबिक/सामाजिक समस्या या प्रकारचे असावे व सदरील विषय न्यायप्रविष्ट नसावा.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या महिला जनसुनावणीचे वेळी उपस्थित राहून जास्तीत जास्त पिडीत, समस्याग्रस्त महिलांनी “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी १८१’ या महिला हेल्पलाइन क्रमांकावर अथवा ‘सखी वन स्टॉप सेंटर, ९२०९०७२७०९ येथे संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा