रस्त्यावर मासे विकणार्यांच्या विरोधात मच्छी विक्रेते आक्रमक…
पालिकेकडे कारवाईची मागणी; पाण्यासह स्वच्छतागृहाकडे वेधले लक्ष….
सावंतवाडी
मच्छी मार्केट सोडून शहरात अन्यत्र मासे विक्री करणाऱ्या संबंधितांना मच्छी मार्केटमध्ये येऊन बसण्याची सक्ती करा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी शहरातील मच्छी विक्रेत्यांनी सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे केली आहे. दरम्यान मच्छी मार्केट मध्ये जाण्यासाठी असलेल्या रॅम्प तुटला असून तो तात्काळ दुरुस्त करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या सोयीसह महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
याबाबत मच्छी मार्केट मधील विक्रेत्यांनी श्री. साळुंखे यांची भेट घेतली. याबाबत त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी अर्चना हडक, रेशमा झेमणे, आबा झेमणे, जिजाबाई कोळंबकर, रोजालिन गोम्स, लक्ष्मी पेडणेकर, करुणा कासकर, लक्ष्मी बड्डा, कल्पना धुरत, कासू लोबो, सुमन राणे, शिल्पा तारी, रंजना डॉन्टस, पुनम साळगावकर, सागर पेडणेकर, रुपेश मिस्ते, शहीन शेख, विजय पाटील, सुभाष खोरागडे आदी उपस्थित होते.