*खरीप हंगामात कुडाळ तालुक्यात १३४३० हे. क्षेत्रावर भात लागवड*
*भात पिकावर निळे भुंगेरे चा प्रादुर्भाव; कुडाळ कृषी विभागाची जनजागृती*
*पिंगळी गावात कृषी अधिकारी रवींद्र पाटील, कृषी सहाय्यक सविता हरमलकर यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन*
कुडाळ तालुक्यात खरीप हंगामात सुमारे १३४३० हे.क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली असुन सद्यस्थितीत पावसाची उघडझाप व ढगाळ वातावरणामुळे पाणथळ जमिनीत भातपिकावर निळे भुंगेरेंचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
तालुका कृषि अधिकारी कुडाळ कार्यालयाच्यावतीने शेतक-यांना किड रोग नियंत्रणाबाबत सल्ला देण्यासाठी ग्रामपातळीवर गावबैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. शेतीशाळा वर्गातुनही शेतक-यांना एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे.याचा एक भाग म्हणुन बुधवारी २१ ऑगस्टला गुढीपुर शेटकरवाडी व देऊळवाडी आंबेडकरनगर येथे गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ कृषी अधिकारी रविंद्र पाटील, पिंगुळी कृषीसहाय्यक श्रीमती एस. व्ही. हरमलकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. भात पिक प्रक्षेत्रावर पाहणी करुन शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात आले.
तुरळक ठिकाणी निळे भुंगेरेंचा प्रादुर्भाव दिसुन आला.या किडीच्या अळी व प्रौढ अवस्था दोन्ही हानिकारक असुन ही किड पानाचा हिरवा भाग खरडवुन खाते.परीणामी पानांवर पांढरे डाग दिसुन येतात.नियंत्रणासाठी ५० टक्के कारटॅप हायड्रोक्लोराईड, १२ ग्रॅम किंवा ट्रायझोफाॅस ४०% प्रवाही २७ मिली किंवा ७५% अॅसिफेट २० ग्रॅम किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन ५% प्रवाही ५ मिली १० लीटर पाण्यात मिसळुन उघडीप पाहुन फवारणी करावी.
तसेच तालुक्यामध्ये अशा प्रकारे भात पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास आपल्या गावचे कृषिसहाय्यक यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषि अधिकारी रविंद्र पाटील यांनी केले आहे.