कणकवलीतील भाजपचे “जोडे मारो” आंदोलन…
शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…
कणकवली
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. तसेच कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
महामार्ग चौपदरीकरण रखडल्याच्या मुद्दयावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर म्हणून कणकवलीतील भाजप कार्यकर्त्यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन श्री.कदम यांचा आज प्रतिकात्मक पुतळा प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी केली.
यावेळी माजी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर म्हणाले की, आमच्या नेत्यांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच त्यांनी पुन्हा टीका केली तर आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही.
दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथील चौकामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत जोडे मारो आंदोलन रोखले. यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, पप्पू पुजारे, सरपंच सचिन पारधिये, विजय इंगळे, विजय चिंदरकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.