*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*३१). माझे गाव कापडणे…*
मग मंडळी, लग्नाला येताय ना? तुम्ही म्हणाल,
मॅडम, येताय ना काय? तुमच्या सोबतच तर
आहोत आम्ही कापडण्यात! सारे हेच म्हणताहेत, आम्ही तुमच्या बरोबर कापडण्यात
फिरत आहोत. इतके तुम्ही समरस झाले आहात. हो, आपल्याकडची लग्नेच अशी असतात ना? पुरा गावच सामिल होतो त्यात!
त्यात काय नवलाई? तर मंडळी, काय म्हणाले मी? मांडव, करागीर, मांडवाचं सामान व बांधणी जोरात सुरू झाली. माझी तर फारच टेच होती हो! माझा मांडव, माझी बहिण, मग माझा तोरा जरा जास्तच होता. पूर्ण दिवस मांडवात. शाळेला सुट्या होत्या.आणि आठवते
कुणाला शाळा? काही काही ठळक गोष्टी
आठवतात, नशिब माझे.
दांड्या बिंड्या गाडून सुंदर साजरा असा मांडव
तयार झाला. गाद्या गिर्द्या टाकून झाल्या. व शेजारच्या देवडी मध्ये लाऊड स्पिकरवर मोठ्याने गाणी वाजू लागली.
“सबकुछ सिखा हमने ना सिखी होशियारी
सच है दुनियावालो के हम है अनाडी”
“डम डम डिगा डिगा डमडम डिगा डिगा
. … . हाय अल्ला सुरत आपकी”…
“ ओ बसंती पवन पागल…”
गल्लीत एकच धुमाकूळ झाला. जिकडे तिकडे
आनंदी आनंद उसळला…
आमचा मुक्काम तर मांडवातच दिवसभर..
एक सांगायचं राहिलंच बघा. अहो, ५९ साली बस्ता होता २७००/- रूपयांचा. विचार करा तेव्हा सोन्याचे भाव काय होते? मंडळी, सात तोळे सोने घेतले तेव्हा, जे कुणीही घेत नसे.( नंतर मी वडीलांना म्हणत असे, मला नाही घेतले म्हणून.)इतका बाजार आला त्या पैशात की आमचे घरच भरून गेले. हंडे, गुंडे, पातेले मोठे मोठे, पराती, बंब अबबबबबब…
आणि नवरदेवाच्या करवल्यांना त्यावेळी २५/ –
रूपये(प्रत्येकी)किंमतीच्या साड्या मागवल्या
होत्या.नवरदेवाच्या आईला अंगठी व आणायला स्पेशल टॅक्सी पाठवली होती.
आणि माईच्या लग्नाच्या साड्या एवढ्या सुंदर होत्या की विचारू नका. दिवसभर बस्ता बघणाऱ्या बायकांची झुंबड लागे. माई त्या तलम रेशमी जरतारी साड्या कागदातून बाहेर हळूवारपणे पदर उलगडून दाखवता दाखवता दमून जाई.
फार सुंदर रंग होते त्यांचे. नंतर बायका सगळी
भांडी बघायच्या हात लावून लावून.”माय वं,
कितलं जड से बैन हाई बघोनं?” हातात घेऊन
घेऊन बघायच्या. बंब काय पिंप काय, सारीच
नवलाई होती त्यांच्या दृष्टीने.सगळ्या गावात
आनंद चर्चा उल्हास पसरला होता.
“आनंदी आनंद गडे । जिकडे तिकडे चोहिकडे॥” अशी परिस्थिती गावात होती.गावातल्या प्रत्येक घरात लग्न होते जणू.
चार मांडी हळद होती. करवल्यांनी घर गच्च
भरले होते. घरात हीऽऽऽऽऽऽ गर्दी होती.पाय ठेवायला जागा मिळेना. मी कुठे कशी झोपत
होते, जेवत होते काही आठवत नाही. नवरदेवाच्या वऱ्हाडाची सोय शाळेत होती.ट्रक
भरभरून गाद्या, तक्के, उशा, चादरी, बेडशिट
पाण्यासाठी नवे कोरे माठ, त्यात बर्फाच्या लाद्या, पेट्रोमॅक्सच्या बत्या, वाजंत्री, बॅंड, वऱ्हाड्यांना पायघड्या… राम राम …
पहिले लग्न होते ना घरातले?
एक माणूस किती काम करू शकतो याचे आश्चर्य वाटते आहे ना तुम्हाल? मंडळी आजच्या सारखे हॅाल केटर्रर्स तेव्हा मिळत नव्हते.
डाळ तांदूळ पासून तेला पर्यंत सारे गोळा करायचे.किती दमछाक झाली असेल हो त्यांची.त्यात भर उन्हाळ्याचे दिवस.
आणि इकडे वाजंत्री लावून माईची केळवणे सुरू झाली. घरोघर शेवया. बोलवणी यायला लागली. वाजंत्री चौघडा पुढे व माई बरोबर
आमची गॅंग.. चालली गल्लितून मिरवत मिरवत. पाट मांडले जाई. हळद लावलेली माई, शेवयांचा एक घास खाई, मग ताटली
आमच्या पुढे येई( आता ही मी दृश्य बघते आहे.) इतक्या घरी शेवया खाऊन आमच्यावरही संकट येऊ लागले.रोज रोज किती शेवया खाणार? लाडू चिवडा कुणी देत
नव्हते. शिवाय घरोघर नारळ मिळे. ते मोठ्या गोणपाटात टाकून आम्ही धरायचे. माई आपली
नवी साडी, नवी चप्पल घालून जोरात व आम्ही
बिन चपलांचे नारळ पोते पकडत चालायचे.
तेव्हा,आता हे सांगते आहे, असे वाटले नव्हते,
कारण लहान होते नां? बघा लहानपण किती
निरागस होते. मजा येत होती. आता मी विश्लेषण करते आहे पण तेव्हा काही असे वाटत नव्हते. वाजंत्री मागे फिरायला हौस वाटायची.मजा वाटायची, गर्व वाटायचा.मंडळी
माईला दोन मोठी पोती गच्च भरून नारळं मिळाली होती इतक्या घरी केळवणं झाली.
घरात आनंदी आनंद होता. सगळेच काम करत होते.पीठी आधीच तयार झाली होती, र वा होता. मग काय? पेटल्या ना चुली रवा पीठी
भाजायला.काही गुळाचे सोजिचे तिळाचे
शेंगदाण्याचे, साखरेच्या पाकातले,रूखवताचे लाडू हे भले मोठे मोठे,तयार होऊ लागले.
सांजोऱ्याकरंज्या लाटायला अख्खी गल्ली येऊ
लागली नि सुगरण बायका सांजोऱ्या भरायला व तळायला बसू लागल्या. तळणाचा घमघमाट
गल्लीभर पसरला.”माय वं, माईन्या सांजऱ्या लाडू हुई रायनात बरं,”अशी चर्चा सुरू होई.
दारा समोरही मांडव होताच. दिवसभर आतबाहेर गर्दी चालू असे. गाणे वाजत असत.
तळण होऊन मोठ मोठ्या पत्र्याच्या पेट्या भरल्या जाऊ लागल्या. चारी बाजुंनी कामाची
नुसती टिप्परघाई उडाली होती. मी साक्षात आताही बघताबघताच लिहिते आहे.
जोडीला गांवकरी असले तरी आप्पांचा एकखांबी तंबू होता. त्यांचा झपाटाच वेगळा होता.त्यांच्या इतकी समज कुणालाच नव्हती.ते पटापट ॲार्डर्स सोडत कामे मार्गी लावत असत.लग्न अगदी तोंडावर आले होते.
पूर्ण गावाच्या जेवणाची तयारी आप्पांना करावयाची होती.धुळ्याहून खास मारवाडी आचारी बोलावले होते.
लग्नाच्या आधी मुलीचे फुनके निघते व लग्नानंतर वधुवरांचे (बीज) की (बीद)?
मिरवणूक निघते. माईचे फुनके निघाले होते.
मंडळी,कापडण्यात पहिल्यांदा मोटरकार आली ती माईच्या मिरवणुकीसाठी.संध्याकाळी फुफाटा उडवत
गाडी गावात येताच मुले गाडीमागे धावत घरापर्यंत आले. १९५९ साल होते.लोकांना नवलाई, “हाई गाडी
का बरं उनी हुई बरं?”लोक चिंतेत पडले.गाडी
दाराशी थांबली. ड्रायव्हर खाली उतरला व जोतऱ्यावर उडी मारून बसला. अक्का बाहेर आली. चौकशी केली. चहापाणी दिले. जोडीला बॅंड होताच. लगेच बॅंडवाल्यांनी त्यांचे
सामान काढले. गोल रिंगण केले नि बॅंडने लग्नाची जोरदार सलामी दिली. धडाडधूम ड्रम
वाजत तुफान सिनेमाची गाणी वाजू लागली.
अक्खी गल्ली बॅंडभोवती गोल रिंगण धरून उभी रहात व बायका आपापल्या घराच्या ओट्यावर डोकावत तोंडाला पदर लावून हसत
गाणे ऐकू लागल्या.”माय वं, कितला न्यामी वाजाडी ऱ्हायनात व माय”! मी सगळं पुन्हा पहाते आहे मंडळी..
चैतन्य चैतन्य काय असते गावात ते तुम्हाला
आता नाही कळणार?
मंडळी, मी नव्याने पुन्हा बालपण जगते आहे हो..
बाकीचे आता पुढच्या रविवारी..
राम राम…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)