You are currently viewing कविता

कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम वृत्तबद्ध काव्यरचना*

 

*कविता*

 

गोड शिरशिरी मनी उमटते

श्रावणसरीत भिजून जाता

क्षणभर सारे भान हरपता

ओठांवरती येते कविता

 

अनाचार तो किती माजला

धक्के बसती येता जाता

द्रोहाचा मग जाळ पेटता

शब्दांमधुनी लढते कविता

 

गावामधले घर कौलारू

खोल मनाच्या तळात लपले

त्याच्या मागे रमता रमता

उफाळून मग येते कविता

 

बाल मनाचे हास्य निरागस

समोरती ते कधी पाहता

वात्स्यल्याने ने साद घालुनी.

खुदूखुदू मग हसते कविता

 

रूपसुंदरी कुणी अनामिक

वळणा वरती समोर येता

सौंदर्याला भुलता भुलता

धडधड धडधड करते कविता

 

अपार दुःखे जीव कळवळे

डोळा पाणी त्यांच्या करिता

उपेक्षिताना पाहून साऱ्या

खोल मनाशी रडते कविता

 

श्रीनिवास गडकरी

रोहा पेण पुणे

9130861304

केवळ नावासहितच पुढे पाठवावी

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा