*पारिजात साहित्य समूह प्रशासक ज्येष्ठ लेखक कवी प्रा. एस. यू. मुल्ला लिखित अप्रतिम लेख*
*संवेदनशील समाज स्त्री रक्षणासाठी आवश्यक*
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या संबोधनामध्ये मा. पंतप्रधानांनी महिला सुरक्षेच्या संदर्भात केलेल्या विधानाशी भारताची १४० कोटी जनता निश्चितच सहमत असेल. कोलकत्ता येथे झालेल्या एका महिला डॉक्टर भगिनी वरील अत्याचाराने देशातील जनतेचे रक्त उसळले नाही असे तर होणार नाही. परंतु प्रश्न पडतो की महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना स्वतःच्या बहिणीचे त्याक्षणी का स्मरण झाले नाही? भारतासारख्या खंडप्राय देशांमध्ये काही प्रश्न अनुत्तरीत राहतात आणि त्यापैकीच हा एक प्रश्न. त्यामुळेच दिल्लीतील निर्भया पासून कोलकत्ता येथील अभया पर्यंत हजारो बहिणी पुरुषी अत्याचारास बळी पडतात आणि अशा घटना सुसंस्कृत समाजास काळीमा फासतात . स्त्रियांवरील अत्याचाराच्या बाबतीत असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी आणि तीही वेळेत न झाल्याचे या घटना दर्शवतात.
तीच गोष्ट आहे देशाच्या आणखी एका भगिनीची.ती म्हणजे गोष्ट विनेश फोगाटची! एकाच दिवशी तीन महिला पहिलवानांना चितपट करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच फायनल च्या दिवशी फक्त 100 ग्रॅम वजन वाढले म्हणून देशाच्या या भगिनीला पॅरिस ऑलम्पिक मधून निष्काशित करण्यात आले आणि संपूर्ण भारत देश दुःखी कष्टी झाला. क्रूर कायदे आणि निष्ठूर समाज यांच्याशी देशातील भगिनींना आणखी किती दिवस लढावे लागणा? हा प्रश्न देखील अनुत्तरीतच राहणार कारण हजारो वर्षाची परंपरा असलेल्या भारत देशामध्ये बहिणीचे स्मरण फक्त रक्षाबंधन किंवा भाऊबीज या दिवशीच का व्हावे?
एक गोष्ट मात्र चांगली झाली . महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांच्या लाखो लाडक्या बहिणीच्या खात्या मध्ये दरमहा पंधराशे रुपये वर्गीकृत करण्याची स्वागतार्ह्य योजना राबवत आहे आणि उद्याच्या रक्षाबंधनापूर्वीच हजारो गोरगरीब महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा झाले आणि त्या बहिणी कृताकृत्य झाल्या आहेत. पण त्याच वेळी उरण आणि कोपरखैरणे येथे बहिणींवर झालेल्या अत्याचारामुळे मन विषन्न झाले. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये ऐरणीवर आला. असे म्हणतात की फक्त न्याय होणे महत्त्वाचे नाही , तर न्याय झालेला प्रत्यक्षात दिसणेही तितकेच महत्वपूर्ण आहे. तरच आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये भगिनींना न्याय आणि मानाचे स्थान मिळेल.
इंग्रजीमध्ये असे म्हटले आहे की
Charity should begin at home.
स्त्री संरक्षणाची आणि स्त्री सन्मानाची सुरुवात स्वतःच्या घरापासूनच व्हावी. तरच समाजामध्ये स्त्रियांना सन्मान मिळेल आणि त्यांच्या कर्तुत्वाचे खरे मोल होईल. बहिणीच्या अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारा भाऊ, तसेच आजूबाजूच्या परिसरामधील बहिणींवर होणारा अत्याचार रोखणारा भाऊ निश्चितच कौतुकास पात्र आहे. नाहीतर गुजरात मधील बिलकिस बानो आणि उत्तर प्रदेश येथील हतरस येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनांचा समाजाने एकमुखाने निषेध करावयास नको का?
प्रा. एस यु मुल्ला
एम. फार्म. एलएल.बी.