सावंतवाडी :
ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी शोकसभेत व्यक्त केली. कै. राकेश नेवगी यांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष कै. राकेश नेवगी यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी पक्ष संघटनेकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. शोक व्यक्त करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते भावनाविवश झाले. कै. राकेश नेवगी यांच्या आठवणींनी त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी शोक मनोगतात सौ. अर्चनाताई घारे परब म्हणाल्या, मोठ्या भावासारखा पाठीशी उभा राहीन असे सांगणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला पोरके करून गेला. नेहमी चेहऱ्यावर हसू असणाऱ्या राकेशजीनी कधीही स्वतःचे दुःख आम्हाला जाणवू दिले नाही. त्यांच्यासारख्या हरहुन्नरी कार्यकर्त्यांच्या जाण्याने भरून न येणारी पोकळी संघटनेत निर्माण झाली आहे. त्यांची उणीव सतत भासत राहील. नेवगी कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखदायक प्रसंगातून बाहेर पडण्याचे बळ ईश्वर नेवगी कुटुंबीयांना देवो, अशी शोकभावना सौ.घारे यांनी व्यक्त केली.
माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांनी शोक व्यक्त करत आदरांजली वाहिली. एका प्रामाणिक, सहृदयी, निष्ठावंत कार्यकर्त्याला आम्ही मुकलो आहोत. शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारा कार्यकर्ता सोडून गेला याचे अतिव दुःख आहे. नेवगी परिवाराला या प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती देव पाटेकराने द्यावी असे श्री. भोसले यांनी सांगितले. शोकसभेला उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शोकभावना व्यक्त केल्या. कै. राकेश नेवगी यांच्या स्मृती नी उपस्थितांना अश्रू अनावर झाले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्षा अँड. सायली दुभाषी, पुजा दळवी, हिदायतुल्ला खान, काशिनाथ दुभाषी, बावतीस फर्नांडिस, ऋतिक परब आदी उपस्थित होते.