You are currently viewing माझे गांव कापडणे….(३०)

माझे गांव कापडणे….(३०)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*माझे गांव कापडणे….(३०)*

 

आठ दहा वर्षांची असेन मी.आमच्या घरा समोरच भाऊबंदांपैकी चुलत भावाचं लग्न होतं.

आता लहान मुलांची तर फारच मज्जा बघण्याची.कळत काहीच नाही पण जिथे तिथे

पुढे जाऊन गुडघ्यांवर हात ठेवून कमरेत वाकून

ओणवं उभं रहायचं नि गंमत बघायची. मला आठवतं, आपल्या लग्नातील जे जे विधी आहेत ते किती सुंदर व अर्थपूर्ण आहेत हो, खरंच नवल वाटतं मला, फक्त त्यातला अर्थ

मात्र समजून घेता आला पाहिजे.त्याचं काय, गल्लीतल्या सगळ्या लग्नात आमची हजेरी असे. मला आता डोळ्यांसमोर दिसतो आहे तो घंघाळातून अंगठी शोधण्याचा प्रसंग. मी साक्षात आताही तो पाहते आहे. चौरंगावर नवरदेव नवरी बसले आहेत. समोर घंघाळात धुसर गुलाबपाणी व पाकळ्या आहेत. वरून अंगठी पडताच वधुवरांनी चपळाइने मुठीत ती मिळवायची. आजुबाजूला बघ्यांची गर्दी आहे. सारे कसे आनंदी चेहरे आहेत. हसताहेत.तेवढ्यात खण्णकन् अंगठी घंघाळात पडते नि दोघांचे हात निकराने अंगठी मिळवण्याची धडपड करतात. क्षणभर पाण्यात धुमश्चक्री होते नि दोघांपैकी एकाला अंगठी मिळते. हसण्याचा कल्लोळ उडतो.जो जिंकतो त्याचे वर्चस्व असते म्हणतात संसारात.किती छान सुंदर प्रसंग आहे हो. आपले पूर्वज फार हुशार होते. तेव्हा काही मुलामुलींना विचारून, सिनेमाला पाठवून लग्न होत नव्हती. वधूवर एकमेकांना अंतर्पाट दूर झाल्यावरच बघत असत. अशा अनोळखी दोन व्यक्तिंच्या मनोमिलनासाठी अशा प्रथा त्यांनी निर्माण केल्या.हळद लावणे, दामेंडा पाडणे, गुळण्या टाकणे, एकमेकांच्या कानात केसात तेल टाकणे इ. सगळ्यात कहर व रोमॅंटिक प्रसंग म्हणजे अंगठी शोधायच्या वेळी वराच्या मुखातील पानाचा विडा वधुने आपल्या दातांनी तोडणे. वाह वा! क्या बात है! नंतर खोबऱ्याचा तुकडा तोडणे. गालाला हात लावल्या शिवाय तो तोडताच येत नाही. भावी दांपत्याच्या मनात हृदयात प्रेम निर्माण करणारे हे सारे रोमॅंटिक प्रसंग आहेत हे सांगायची गरज नाही.गुळण्या व या साऱ्या प्रसंगात वधू लाजून चूर होत असे, ते बघणे सुद्धा फार मनोरम असे.अगदी मुलगी

बघण्यापासून ते लग्न होई पर्यंत सारेच विधी सुंदर आहेत.(पण तेव्हा मला हे कुठे कळत होते?.)आता पाहिलेले सारे आठवते व अन्वयार्थ लावता येतो.सर्वात आवडता प्रसंग

म्हणजे झोपाळ्यावर उभे राहून गुळण्या टाकणे.

आम्हाला बघायला फार मजा यायची. एका हाताने साखळी पकडत कसरत करत गुळण्या

फेकायच्या.कधी कधी नवरदेव चिडून ग्लासातले पाणीच तोंडावर फेकायचा. मग ग्लासात दुध टाकून गुळण्या, रंगीत गुळण्या

असे ही प्रकार व्हायचे. तासंतास हे प्रकार

चालत असत. वाजंत्री वाजत असे.

 

सुरूवातीला लग्न ठरायच्या आधी,

पाहुणे बघायला आल्यानंतर त्या मुलीचे

लाजणे, तो डोक्यावरून पदर, त्यात तिचे ते

कोमल फुलासारखे मुग्ध सौंदर्य, लाजून आरक्त झालेले लाल गाल, मोठ्यांसमोर मान

वर करायची नसली तरी नवऱ्या मुलाला बघायचे कुतुहल, त्यातून मग चोरटी तिरपी

टाकलेली नजर,चुकून नजरानजर होताच खाली घातलेली मान, घरातील ताईला बघायला आले म्हणून आनंदी वातावरण,

पाहुण्यांचा केलेला सत्कार व घरात सुटलेले

पदार्थांचे खमंग वास … वा वा आताही मी सारे

दृश्य डोळ्यांनी बघते आहे.मग बघणे झाल्यावर पसंती ना पसंती ठरताच घरात उसणारा आनंद व उल्हास.. वा वा ! काय चेहरे हसतात घरातल्यांचे! जसे काही प्रत्येकाला वाटते आपलेच लग्न ठरले आहे.

 

मग सुरू होते पैशांची जमवाजमव.परिस्थिती

चांगली असेल तर लगेच पुढचे प्लनिंग सुरू होते.नाहीतर चिंतेचे ढग गोळा होऊ लागतात.

पुढच्या पद्धती मात्र मुलीच्या आईवडीलांची कसोटी पाहणाऱ्या आहेत.हो, हुंडा.. अत्यंत जीवघेणा असा प्रकार.हो म्हणा नाहीतर नाही

म्हणा तो द्यावाच लागतो. टेबला खालून द्या,

टेबलावरून द्या, कार द्या, फ्रीज द्या, सोने द्या,

कितीतरी प्रकारे देताघेता येतो. आज स्वरूप

इतके बदलले आहे की हुंडा हायफाय झाला

आहे.खर्च कमी होण्या ऐवजी देखावा व उधळपट्टी वाढली आहे.मी किती खर्च जास्त

करू शकतो याची चढाओढ लागली आहे.

एकप्रकारे बाजारू स्वरूप येऊन सवंगता वाढली आहे.आजकाल कशाचाच ताळमेळ

राहिला नसला तरी पूर्वी मात्र तसे नव्हते.

 

लग्न आठ दिवस, चार दिवस(चार मांडी हळद)

मस्त आरामात चालत असत. मला आठवते मी

लहान असतांनाचे १९५९ साली झालेले माझ्या

मोठ्या बहिणीचे लग्न. वाह वा! मी दहा वर्षांची

होते. घरातले पहिलेच लग्न. ते ही विष्णुभाऊंच्या मुलीचे, जे क्रांतिवीर म्हणून ख्यातकीर्त होते. जवळ जवळ एक महिना आधी तयारी सुरू झाली अक्काची म्हणजे माझ्या आईची. तेव्हा काही केटरर्स नव्हते. पुर्ण

गाव जेवणार, तुम्ही बोलवा अथवा नका बोलवू.गावकुसाबाहेरच्यां पासून सारे आडवा

हात मारणार मिष्टांन्नावर. त्यांना तरी कधी मिळणार हो असे तृप्त करणारे भोजन? आणि

भाऊंवर तर साऱ्या गावाचाच हक्क आणि अधिकार होता. त्या मुळे निमंत्रण असो वा नसो, सारे जेवणार म्हणजे जेवणार.

 

एक महिना आधीच आमच्या घरी करवल्या

यायला सुरूवात झाली. निवडणंटीपणं कोण

करणार? गहू, तांदूळ,डाळी, कडधान्यापासून

ते मसाले तिखटापर्यंत सारे घरी करायचे? साधी का गोष्ट होती? मग हळू हळू करवल्यांनी घर भरू लागले.गहू भिजू लागले.

किंचित ओलसर असतांनाच जाती सुरू झाली.

घरचे बाहेरचे काक्या चुलत्या भाऊबंदातल्या

बायका येऊन जात्याला हात लावू लागल्या व

एकमेकींचे श्रम वाटून घेऊ लागल्या, आणि आनंदाच्या भरात मुखातून मुक्त ओव्या पाझरू लागल्या…

 

माय माय करू

माय सोनानी परात

मनी मायना बिगर

चित लागेना घरात…

 

मनी मायनं लुगडं

त्याना काठ जरतारी

चला चला व बहिनोसन्

भरा लगीन घागरी…

 

पडे दारम्हानं मांडो

देखा घोडा बी नाचसं

कानाकोपराम्हा माय

देखा आसूसले गायसं..

 

वाजे चौघडा दारम्हा

पाने आंबाना उनात

त्यासले वाजतगाजत

सगासोयरा लयनात..

 

धरा चांदनी डोकावर

देव लया सोनारना

वाढी लिधात देव हो

देढपट त्या चांदीना…

 

भरा बांगड्या हातमा

कोपरले भिडन्यात

मना घरम्हा करोल्या

गुनगुनत उन्यात…

 

नही मायले उसंत

घट्या वाजे घुरूघुरू

मना जीवननी पिठी

घट्यावाटे भुरूभुरू…

 

वरवर ती हाससं

माय मनम्हा झुरसं

लेक जाई सासरले

घर झुरनी पडस…

 

असे जीवनाचे कढ मुखातून बरसत, तो घट्या

केव्हाच ऐकत ऐकत हलका होऊन जात असे.

गाण्याच्या तालात जातं ओढतांना घामाघूम

झाल्यातरी हसत हसत” माय वं, इतलाम्हा सरी

गे दयनं? काई कयनंज नही वो माय..” आणि घाम पुसत थोडी विश्रांती घेऊन तिसऱ्या प्रहरी

पुन्हा घट्या घुरूघुरू सुरू राही तो दिवे लागणी

पर्यंत.हसत खेळत चेष्टामस्करी करत जात्या

खालच्या पिठीने पाट्या भरल्या जात व लगेच

वस्रगाळ होण्यासाठी तगारीला साड्या बांधून त्यावरून गरगरा हात फिरू लागत की एका तासात पिठी व र वा अलग होऊन सुग्रण बायका र वा वैचायला बसत. बघता बघता र वा व पांढऱ्याशुभ्र पिठीने पाट्या भरून जात व

लगेच त्या डब्यात पडत असत.

 

मंडळी, मी लहान होते तरी सारे मनावर कोरले

गेले आहे व साक्षात बघता बघता मी लिहिते आहे. जणू कापडण्याच्या घरात लहान होऊन मी सारे आत्ताच घडले असे मी बघते आहे.मला

नऊवारीतली भिरीभिरी इकडून तिकडे फिरणारी

आई दिसते, माम्या दिसतात व घरभर कामे दिसतात.त्यांची लहान लहान लेकरे होती.ती

सांभाळून बिचाऱ्या कामे करत होत्या.आईला

सारे वहिनी वहिनी करून भंडावत होते.सतरंजी

द्या, चवाये द्या, टोपल्या द्या …

 

तुम्हाला खोटे वाटेल, ८ दिवस आधी चौठ्यात

मांडव बांधायला सुरूवात झाली.आमच्या घरासमोर मोठा चौठा आहे. चार ते पाच गल्या त्याला येऊन मिळतात तिथे. या चौठ्यातच ओट्यावर बसून वडील गावाचा न्यायनिवाडा करत असत.तर, आठ दिवस आधीच कामगार

आले. तत्पूर्वी धुळ्याहून ट्रक भरून भरून गाद्या,

तक्के, दांड्या, कनाती, पडदे, रंगीत फिती, पेट्रो

मॅक्सच्या बत्या… काय नि किती सांगू असे सामान येऊन पडले होते. एखाद्या माणसाचा कामाचा आवाका व झपाटा किती असावा याचे मुर्तिमंत उदा. म्हणजे माझे वडील होते. १० माणसांचे काम ते एकटे करत असत.मग

आमची बच्चे कंपनीची तर मजाच होती. त्यांचे

खोदकाम, दांड्या उभ्या करणे, आम्ही त्यांच्या

अवती भवतीच फिरत असू. दांडी ठोकली की

रंगीत फित गुंडाळायचे. मांडवभर नुसती रंगपंचमी होती. निळा पिवळा जांभळा हिरवा

लाल गुलाबी साऱ्या रंगांचे जणू संमेलन भरले

होते. झालरी नि कनातीने मांडव एवढा सुंदर दिसत होता की विचारू नका. मी तर दिवसभर

खांबाला धरून गरगर फिरत असे.आणि हो, या सगळ्या कामगारांच्या न्यहारीलाच एक “मापभर”(किती क्विंटल माहित नाही.)बाजरी

लागली असे म्हणत होते, ते मी ऐकले आहे.

मग, आता बाकी पुढच्या भागात सांगते,

चालेल ना?

 

राम राम मंडळी…

 

जयहिंद जय महाराष्ट्र..

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा