कळणे येथे २३ रोजी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा
दोडामार्ग
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या स्वयंसेवी संस्थेने कळणे (दोडामार्ग) येथे २३ ऑगस्ट रोजी देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. दोडामार्ग व सावंतवाडी तालुका मर्यादित स्पर्धा असून प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी मंगळवारी दिली.
डॉ. लळीत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, याबरोबरच त्यांना संगीताची आवड निर्माण व्हावी, सांघिक ताकद कळावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. नूतन हायस्कूल, कळणेचे मुख्याध्यापक
एम. व्ही. देसाई, संगीत शिक्षक पी. जी. गोसावी यांच्या सक्रीय सहकार्याने ही स्पर्धा कळणे हायस्कूल येथे होत आहे. चौथी ते सातवी (प्राथमिक) आणि आठवी ते दहावी (माध्यमिक) अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
दोन्ही गटात प्रथम पारितोषिक १५०० रू., प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, दुसरे पारितोषिक १२०० रू. व प्रमाणपत्र व तिसरे पारितोषिक १००० रू. व प्रमाणपत्र दिले जाईल. मुख्याध्यापकांचे पत्र पथकप्रमुखाने स्पर्धेवेळी सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी सतीश लळीत (९४२२४१३८००) येथे संपर्क साधावा.