You are currently viewing जीवन दुःखमय झाले आहे का?

जीवन दुःखमय झाले आहे का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम लेख*

 

*जीवन दुःखमय झाले आहे का?*

 

खरोखर आपले जीवन दुःखमय झाले आहे का हा चर्चेचा विषय वाचून सुखमय जीवन की दुःखमय जीवन हे ठरविण्याचे काही गणित आहे का? असा प्रश्न माझ्या मनात

तात्काळ उभा राहिला. हे कोणी, कसे ठरवायचे हो? हा तर प्रत्येकाचा व्यक्तिगत दृष्टिकोन आहे असे माझे ठाम मत आहे.

 

परवा परवाच माझ्या वाचनात एक गझल आली,त्यातील एक शेर मला फार आवडला…..

*गुलमोहरास जमते ग्रीष्मात रंगणे जर*

*पाहून त्याकडे मग दुःखात हासते मी*

यात गझलकाराने गुलमोहराच्या झाडाचा फार छान दृष्टांत दिला आहे. ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हात, उष्णतेचा दाह असताना गुलमोहर कसा अगदी लाल केशरी फुलांनी रंगून गेला आहे.थोडक्यात जीवनातील कठीण प्रसंग जे दुःखदायी असतात ते कसे झेलायचे?

त्या दुःखाला कवटाळून

दुःखच करीत बसायचे की जीवनातील जमेची बाजू आठवून त्या दुःखावर मात करून पुढे जायचे

हे ज्याच्या त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.

 

आज पर्यंतच्या या दीर्घ आयुष्यात अनेक माणसे जवळून पाहिली,कुटुंबातील,नात्यातील माणसे तर अनुभवली.त्यातील काही सतत हसत राहणारी,खिलाडू वृत्तीची

तर काही कोणताही दिवस असो, रात्र असो, सणवार असो की काहीही असो,सदैव त्यांचा चेहरा दुर्मुखलेला, दुःखी कष्टीच!” काय वहिनी कशा आहात? काय चाललंय?” असा सहज प्रश्न विचारला तरी केव्हाही त्यांचं उत्तर एकच. ” Kassय सांगायचं, चाललंय. तब्येत नसते हो बरी.” त्या कायम आजारीच. कसला उत्साह नाही की चेहऱ्यावर कधी आनंद नाही. आता अशा व्यक्तीचं जीणं हे दुःखमयच म्हणायचं का?

त्यांच्याच घरात बाकी सर्व आनंदी आणि या वहिनीच तेवढ्या दुःखी!

 

मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेन,” जगावं कसं तर फुलपाखरासारखं. हसत, खेळत, बागडत, या फुलावरून त्या फुलावर…..”

 

शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांचा जर आपण विचार केला तर ट्रेन गाठण्यासाठी करावी लागणारी पळापळ, माणसांची अलोट गर्दी,( मी हे मुंबई नगरी डोळ्यासमोर ठेवून लिहीत आहे)त्या गर्दीतून कर्जत ते मुंबई, किंवा विरार ते चर्चगेट असा लांब पल्याचा उभ्या चा प्रवास, दहा मिनिटे उशीर झाला तर मस्टर जाण्याची चिंता, तीन लेट मार्ग झाले तर एक कॅज्युअल कमी होईल याचा सतत असलेला तणाव, या व अशा गोष्टींचा विचार करता हे सर्व दुःखमय आहे,परंतु तो रोजच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक आहे असे मानून त्यातूनही आनंद मिळविणारे किती लोक आहेतच की.

अहो महिलांच्या डब्यात तर महिला अंताक्षरी खेळतात, चैत्रगौर, मंगळागौर,संक्रांत वगैरे हळदीकुंकू ही

त्या गाडीच्या डब्यातच करतात. एकमेकींना वाण देतात, त्या दिवशी चांगल्या नटून थटून दागदागिने घालून येतात,

मस्त मजा करत, दिवसभराचा शीण घालवत संध्याकाळी घरी परततात.

मी सुद्धा ट्रेनमध्ये किती भरतकाम आणि विणकाम केलं आहे, आणि त्यातून नवनिर्मितीचा आनंद उपभोगला आहे.

 

तीस चाळीस वर्षांपूर्वींचा हा काळ खूप वेगळा होता हे मला मान्यच आहे. माणसातली माणुसकी ओसरत जाऊन जो तो स्वार्थ-साधू बनतो आहे,स्वतः खेरीज त्याला दुसऱ्याचा विचार करण्यास मुळीच वेळ नसतो. समाजात विकृतीही जरा जास्त प्रमाणातच दिसू लागली आहे. या गोष्टींमुळे सामान्य मध्यमवर्गीय समाजाचे जीवन दुःखमय झाले आहे हे अगदीच खोटे आहे असे मी म्हणणार नाही,परंतु माणुसकी पूर्ण तया लयास गेली आहे का? अजूनही मदतीचा हात देणारे आहेतच की!

बाबा आमटे, प्रकाश, विकास आमटे

या कुटुंबास काय म्हणावे? ही तर देव माणसेच हो! कोन बनेगा करोडपती हा टीव्ही शो जर पाहिला तर आपल्याला अशी कितीतरी नावे कळतात की जे समाजातील पीडितांसाठी,एकेकदा पदरमोड करूनही कार्य करत असतात.

 

बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे

जीवन दुःखमय होते. अवकाळी पावसामुळे पीक पाण्याचे नुकसान होणे, किंवा वेळेवर पाऊस न पडल्यामुळे दुष्काळाला सामोरे जाणे

या घटना अत्यंत दुःखमय आहेत. हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जळजळीत दुःखाचा प्रसंग आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. होते नव्हते ते सर्व हरवून बसलेला माणूस

हतबुद्ध होऊन शेवटी आत्महत्या करतो. असे जरी असले तरी यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी यंत्रणा

कार्यरत आहेच ना?अशा प्रसंगी मला कुसुमाग्रजांच्या कणा या कवितेची आठवण येते.पावसाच्या पुरात सर्वस्व हरवून बसलेला माणूस,फक्त त्याची पत्नी त्याच्यासोबत आहे या एका सकारात्मक गोष्टीमुळे त्याच्यातील मनोबल अद्यापही शाबित आहे. त्याला कुणाकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षाही नाही,

तो फक्त त्याच्या सरांना म्हणतो,

* पाठीवर हात ठेवून सर*

* तू फक्त लढ म्हणा.*

केवढी ही सकारात्मकता!

केवढा हा आत्मविश्वास!

दुःखातून सुखाकडे जाण्याचा निर्धार!

 

हा विषय तसा खूपच मोठा आहे. यावर लिहावे तितके थोडेच, परंतु एक गोष्ट नक्की सांगेन की सुख कशाला म्हणायचे आणि दुःख कोणते समजायचे हाच एक मोठा प्रश्न आहे.

 

कोणालाही त्याच्या प्रिय व्यक्तीचे निधन झाले की दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण कितीही जरी म्हणालो, की देह हा नश्वर आहे, आत्मा अमर आहे. अगदी गीतेतील तत्त्वाप्रमाणे* वासांसि जीर्णानी

यथा विहाय नवानि गृण्हाति नरोsप राणी* हे तत्व आपण मान्य केले तरी पडल्यावर जखम होतेच आणि जखमेवर खपली धरण्यास काही काळही जावा लागतो. म्हणूनच तर भा.रा.तांबे लिहितात,

* जन पळभर म्हणतील हाय हाय*

* मी जाता राहील कार्य काय*

 

जे संत आहेत त्यांचा देहाभिमान गळून गेल्यामुळे प्रिय व्यक्ती गमाविण्याचे दुःख त्यांना होत नसेल कदाचित!

 

मग अशा परिस्थितीत पूर्ण जीवनच दुःखी असे म्हणायचे का?

अहो जीवन म्हणजे श्रावण मास.

तेव्हा बालकवींनी म्हटल्याप्रमाणे,

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

असेच आहे नाही का?

फुलांच्या पखरणीवरून चालत असताना मधूनच एखाद दोन काटे बोचले तर पायातला काटा काढून पुढे जाण्यास काय हरकत आहे?

 

अरुणा मुल्हेरकर

मिशिगन

प्रतिक्रिया व्यक्त करा