*सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी…??*
सावंतवाडी हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला हळूहळू काँग्रेसकडे गेला, पुढे राष्ट्रवादीने त्यावर पकड मजबूत केली होती. मध्यंतरी शिवसेना पक्षाने जोरदार मुसंडी मारत सावंतवाडी मतदारसंघावर एक दशक राज्य केलं. परंतु, त्यानंतर मात्र केसरकरांनी पुन्हा राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ खेचून आणला. राष्ट्रवादीला रामराम करून केसरकर शिवसेना पक्षात दाखल झाले आणि गेले दीड दशक हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. बाळासाहेबांवर निष्ठा असणारी शिवसेनेची या मतदारसंघात पारंपरिक मते आहेत हे नाकारून चालणार नाही, पण…
याच पारंपरिक मतांवर केसरकर तीन वेळा आमदार झालेत का?
याचं उत्तर कोणीही नाहीच असे देईल. कारण केसरकरांची स्वतःची देखील मते आहेत, त्या दोन्ही मतांची बेरीज करून केसरकर आमदार झालेत हे नक्की.. मग केसरकर शिंदेंच्या शिवसेनेतून निवडणुकीत उभे राहिले तर उबाठा शिवसेनेला विजय मिळविण्या एवढी मते मिळतील का? बरं शिवसेनेकडून उभा राहील व दीपक केसरकरांना शिकस्त देईल असा कोण उमेदवार आहे? परंतु, उबाठा कडे उमेदवार नसताना देखील केवळ शिवसेनेची मते आहेत या एकाच हेक्यावर म्हणा किंवा पोकळ विश्वासावर मतदारसंघ पदरात पाडून घेऊन महाविकास आघाडीला फायदा होणार का? नाहीच, तर नुकसान होणार हे नक्की..!
२०१९ विधानसभा निवडणुकीत सावंतवाडीच्या कन्या असलेल्या अर्चना घारे परब यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु ऐनवेळी बबन साळगावकर यांना उमेदवारी दिल्याने अर्चना घारे परब यांनी माघार घेतली होती. खरं पाहिलं तर दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी नामशेष होतो की काय अशी परिस्थिती असताना अर्चना घारे परब यांनी पक्षाला संजीवनी दिली. राष्ट्रवादीची पुन्हा एकदा सावंतवाडी मतदारसंघात उभारणी केली. स्वतः गावागावात पोहोचल्या, मदत कार्यात अग्रेसर राहिल्या. त्यामुळे राष्ट्रवादीला सावंतवाडी मतदारसंघात सुगीचे दिवस आले. परंतु दीड दशक ज्या केसरकरांच्या शिवसेनेसोबत झगडून राष्ट्रवादी उभी केली त्या शिवसेना पक्षाची विभागणी झाली आणि राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना(उबाठा) अशी महाविकास आघाडी अस्तित्वात आली. लोकसभेला शरद पवारांच्या जोरावर महाविकास आघाडीने राज्यात भाजपा पक्षासह महायुतीला कात्रजचे पाणी पाजले त्यामुळे विधानसभेला कित्येकांच्या अपेक्षांना कोंब फुटलेत आणि शिवसेना पक्षाचे तिसऱ्या चौथ्या फळीतील सावंतवाडी मधील नेते आमदार होण्याची स्वप्ने पाहू लागले. गेली पाच वर्षे अर्चना घारे परब यांनी राष्ट्रवादीची मतदारसंघात संघटनात्मक बांधणी केली आणि खऱ्या अर्थाने पक्षाला उभारी दिली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले तर ते चुकीचे नक्कीच नाही. कारण उबाठा सेनेपेक्षा राष्ट्रवादीची सावंतवाडी मतदारसंघात संघटनात्मक बांधणी आहे. तळागाळात अर्चना घारे परब यांनी काम करून त्या घराघरात पोचल्या आहेत. जाणीव जागर यात्रेच्या माध्यमातून गावागावात संवाद साधणार असे अर्चना घारे परब यांनी जाहीर करताच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ऊबाठाचे विधनासभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मतदारसंघात संपर्क यात्रेला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर केवळ शिवसेनेची पारंपरिक मते आहेत असे गृहीत धरून आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल असा आशावाद व्यक्त करून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन ऊबाठा शिवसेनेच्या तिसऱ्या चौथ्या फळीतील नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागणे म्हणजेच हास्यास्पद आहे.
महाराष्ट्रात शरद पवारांच्या आधारावर शिवसेना(उबाठा) पक्षाला उभारी घेता आली हे सत्य नाकारून चालणार नाही. परंतु त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सावंतवाडी मतदारसंघात पुनरागमन करण्याची संधी मिळत असताना, राज्यात सत्ता स्थापन करणे हा विचार बाजूला सारून केवळ पक्षहित डोळ्यासमोर ठेवत असल्याचा खोटा आव आणून सावंतवाडी मतदारसंघावर शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांनी दावा करणे म्हणजे “आयजीच्या जीवावर बायजी फौजदार” होण्यासारखे आहे. महाविकास आघाडी मध्ये होणारी ही बिघाडी म्हणा किंवा सुंदोपसुंदी “माका नाय तुका घाल तिसऱ्याक” अशाप्रकारे दीपक केसरकर यांच्या पथ्थ्यावर पडल्यास आश्चर्य वाटू नये.