You are currently viewing स्वातंत्र्यदिनी आदर्श गावची संकल्पना मनाला भावली – दीपाली वारुळे

स्वातंत्र्यदिनी आदर्श गावची संकल्पना मनाला भावली – दीपाली वारुळे

नांदेड :

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७८वा महोत्सव साजरा करत असताना. फादर फाउंडेशनने हाती घेतलेली मानवतावादाची ही सामाजिक कार्ये म्हणजेच स्वतःची प्रगती करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सर्व सोयींयुक्त माहेरघर, तरुणांना दिशा देणारे व्यसनमुक्ती केंद्र आणि परिश्रम करून मोबदला मिळवू शकणाऱ्या कष्टकरी वर्गांसाठी परिश्रमालय होय आणि एवढेच नाही तर पापळवाडी ग्रामस्थ, सरपंच, फाउंडेशनचे पदाधिकारी आणि अध्यक्ष ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण यांनी पापळवाडी हे आदर्श गाव करण्याचा घेतलेला निर्णय हा मनाला भावणारा आहे. असे मत तरुण समाजसेविका आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा दीपाली वारुळे यांनी यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेला मदतीचा धनादेश देताना व्यक्त केले.

यावेळी प्रथम वारुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि बापूजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवरांसह वंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्षा दिपाली वारुळे, पापळवाडी गावचे सरपंच राजू शिंदे, माजी सरपंच रंगनाथ चव्हाण, दत्तात्रय शिनगारे गुरुजी, संस्थेचे विश्वस्त किशोर टिळेकर आणि उद्योजक संदीप कामठे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. नंतर मान्यवरांनी स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य या विषयावर निर्भीडपणे मनोगते व्यक्त केली.

यानंतर नेहमीप्रमाणे संयुक्तपणे फादर फाउंडेशन आणि साहित्य सम्राट पुणे संस्थेचे १८९ वे कवी संमेलन घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने म. भा. चव्हाण, किशोर टिळेकर, सूर्यकांत नामूगडे, संतोष गाढवे, प्रल्हाद शिंदे, अनार्या मारकड आणि साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ या सर्व कवींच्या बहारदार प्रबोधनात्मक काव्यरचनांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमांमध्ये दिलीप नाना चव्हाण, भगवान नाना चव्हाण आणि इतर ग्रामस्थासह अनुश्री सावंत, अलका जोगदंड तसेच यमुना चव्हाण अशा अनेक महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर आभार किशोर टिळेकर यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा