You are currently viewing दिपक केसरकर उमेदवार असले तरी माझे सहकार्य नाही; वेळ आली की भूमिका जाहीर करेन

दिपक केसरकर उमेदवार असले तरी माझे सहकार्य नाही; वेळ आली की भूमिका जाहीर करेन

*दिपक केसरकर उमेदवार असले तरी माझे सहकार्य नाही; वेळ आली की भूमिका जाहीर करेन*

*संवादच्या थेट प्रश्नावर मा.आम.राजन तेलींची प्रतिक्रिया*

निवडणुका आल्या की जनतेला इच्छुक उमेदवारांमध्ये रंगलेला कलगीतुरा पहायला मिळतो किंवा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या महत्त्वाकांक्षा उघड होताना दिसून येतात. सावंतवाडी मतदारसंघात देखील याचा प्रत्यय येत असून कणकवली येथून थेट सावंतवाडीत बस्तान बसविलेले आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या मागील दोन टर्ममध्ये नाम. दीपक केसरकर यांच्या विरोधात लढलेले माजी आम.राजन तेली यांनी शिल्पग्राम येथे पत्रकार परिषद घेत संवादच्या प्रतिनिधीच्या थेट प्रश्नावर उत्तर देताना “दीपक केसरकर यांना सहकार्य नाही; वेळ आल्यावर भूमिका जाहीर करेन” असे सांगत येत्या विधानसभा निवडणुकीत नाम.दिपक केसरकर यांना कडवी लढत देण्याचा ठाम निर्धार केला आहे.
मागील इतिहास पाहिला असता, २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत नाम. दिपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी होत राजन तेली यांचा सपशेल पराभव केला होता. राजन तेली केसरकरांच्या आसपास देखील फिरकू शकले नव्हते. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजन तेलींनी जोरदार मुसंडी मारत दिपक केसरकर यांना आव्हान दिले होते. तरीही केसरकरांनी १० हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेत बाजी मारली होती. त्यावेळी केसरकरांचे खंदे समर्थक बबन साळगावकर देखील केसरकरांच्या विरोधात उभे राहिले होते. त्याचा फायदा देखील तेलींना झाला होता. यावेळी नाम.दिपक केसरकर सत्ताधारी शिवसेना(शिंदेगट) मधून मंत्री असून मतदारसंघात विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबवित आहेत, अनेकांना मदतीचा हात देत आहेत, त्यांना खास.नारायण राणे यांची भक्कम साथ आहे पण महायुतीचे सावंतवाडीतील नेते संजू परब आणि सावंतवाडीतून नशीब आजमावणारे राजन तेली मात्र त्यांच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. या एकंदर घडामोडीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.
आंबोली चोकुळ गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्न कित्येक वर्षे अडकून पडला असून तो सोडविल्याचा दावा सर्व पक्ष आणि नेते करतात परंतु अजूनही प्रश्न न सुटल्याने सर्वांनाच जिकरीचे होणार आहे. नाम.रवींद्र चव्हाण पालकमंत्री असताना त्यांचे निकटवर्तीय असलेले संदीप गावडे कबुलायतदार प्रश्नावर उपोषण करतात हा विरोधाभास देखील जनतेने पाहिला. त्यामुळे लोकप्रतिनिधी “तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो” अशी नौटंकी करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकतात की जनतेला मूर्ख समजतात असे प्रश्न उभे राहत आहेत. त्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाच वर्षात कधीही जनता दरबार घेतला नव्हता परंतु निवडणुका जवळ येताच जनता दरबार सुरू करून प्रश्नांची त्वरित उकल करत असल्याने सावंतवाडी मतदारसंघात नक्की भाजपा पक्षाची भूमिका काय असेल असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
महायुतीचे घटक असले आणि स्वतःच्या मतदारसंघात पालकमंत्र्यांचा जनता दरबार असताना देखील नाम. दिपक केसरकर मुंबई येथे जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन कबुलायतदार प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतात हे सर्व पाहिले असता पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि केसरकर यांचे सूर जुळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघात येत्या विधानसभेत महायुती केसरकरांसोबत असेल की केवळ कागदावरच युती दिसेल..? असा प्रश्न उभा राहत आहे.
माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांना सहकार्य नसल्याचे आजच नव्हे तर पूर्वीपासून सांगत आहेत. त्यामुळे वेळ आल्यावर म्हणा किंवा महायुतीने सावंतवाडीची जागा शिवसेनेला सोडल्यास राजन तेली बंडखोरी करतील का? बंडखोरी केल्यास केसरकर हे शिंदे, फडणवीस यांच्या जवळचे असल्याने पक्षाकडून तेलींवर कारवाई होईल का? किंवा तेली स्वतः पक्षत्याग करून उबाठा शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढविणार..? असे जर तर चे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. “आज नहीं तो कभी नहीं ” अशीच परिस्थिती राजन तेलींची झाल्याने ते कोणताही धोका पत्करून निवडणूक लढविणार हे अटळ आहे…
पण,
गेम पलटविण्यात माहीर असलेले रवींद्र चव्हाण पडद्यासमोर राहून महायुतीचे काम करणार की पडद्या मागून हालचाल करणार..? यावर बरेच समीकरण अवलंबून असेल. त्यामुळे राजन तेली मांडत असलेल्या भूमिकेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पाठिंबा आहे का..? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा