कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार यांची दहीहंडी २७ ऑगस्ट रोजी कासार्डे येथे पटांगणावर भव्य स्वरूपात होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणे आणि आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी नेत्यांसह भाजपा प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार व दोन्ही जिल्ह्यातील विविध भाजपचे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते व गावचे मानकरी उपस्थितीत राहणार आहेत.
यावेळी १, ११,१११ रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या मंडळाचे हे नॉनस्टॉप १२ वे वर्ष असून यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग सह रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांना सहभागी होता येईल. याप्रसंगी आठराचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख रुपये रक्कम एक लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे. तर यावेळी चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख २ हजार २२२ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यांसाठी ३ हजार ३३३ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यांसाठी ४ हजार ४४४ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्या ५ हजार ५५५ रुपये व प्रत्येकी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी डीजे, ढोल पथकांच्या गजरासह दुपारी २.३० वाजता गावातील स्थानिक प्रतिष्ठित, मानकरी व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते दहीहंडीचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी नाव नोंदणी करिता प्रमोद जठार मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव ९४०३२८९००५ अथवा श्री रोहित महाडिक भाजप कार्यालय कासार्डे ७०६६९३१०५३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.