बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी केली सुरु…
बांदा
बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खबरदारी घेण्यासाठी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली आहे. शहराचा विस्तार मोठा असल्याने सावंतवाडी नगरपालिकेची धुर फवारणी मशीन माजी नागराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.
बांदा शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासन देखिल सतर्क झाले होते. ग्रामपंचायतकडे धुर फवारणी मशीन उपलब्ध आहे. मात्र डेंग्यू रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शहरात तातडीने धूर फवारणी करणे आवश्यक होते. त्यामुळे सावंतवाडी पालिकेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना मशीन देण्यासंदर्भात सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळु सावंत व माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत बांदा ग्रामपंचायतळा मशीन उपलब्ध करून दिली.
आज सकाळपासून शहरात धूर फवारणी सुरु करण्यात आली असून येत्या दोन दिवसात संपूर्ण शहरात फवारणी करणार असल्याचे उपसरपंच बाळु सावंत व माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी सांगितले.