सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करण्यालाही प्राधान्य; नारायण राणेंचे प्रतिपादन
कणकवली :
सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सिंगापूर येथील अभियंत्यांना इथे आमंत्रित केले आहे. त्यांना किनारपट्टीलगतची जी जागा पसंत पडेल, तेथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणाबरोबरच प्लॅटफॉर्मवर शेड होणे देखील अत्यावश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडून पाठवल्यास त्या प्रस्तावाला दिल्लीतून परवानगी दिली जाईल, असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले.
कणकवली रेल्वे स्थानकातील सुशोभिकरण कामाचे लोकार्पण आज खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. यावेळी श्री. राणे यांनी रेल्वे स्थानके सुशोभिकरण कामाचे श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व जनतेला दिले. तसेच श्री. चव्हाण यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंजूर करून आणण्याची जबाबदारी माझी आहे असे श्री. राणे म्हणाले. सिंगापूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग किनारपट्टीचाही विकास करण्याला माझे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सिंगापूर येथील अभियंत्यांना इथे आमंत्रित केले आहे. त्यांना किनारपट्टीलगतची जी जागा पसंत पडेल, तेथे पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या जातील. अशा विकास कामांसाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आणि कोकणच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहनही श्री. राणे यांनी यावेळी केले.
कणकवली रेल्वेस्थानक लोकार्पण कार्यक्रमावेळी आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोकण रेल्वेचे सहसंचालक आर के हेगडे, सार्वजनिक बांधकामच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, माजी आमदार राजन तेली, ॲड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, वाघदत्त राव, प्रादेशिक रेल्वे प्रबंधक श्री कांबळे, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.