You are currently viewing पॅरिस ऑलिम्पिक : नीरजला रौप्यपदक तर हॉकी संघाला कांस्य पदक

पॅरिस ऑलिम्पिक : नीरजला रौप्यपदक तर हॉकी संघाला कांस्य पदक

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

पॅरिस ऑलिम्पिकच्या १३व्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. त्याने ८९.४५ मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा यशस्वी बचाव करू शकला नसला तरी ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजच्या आधी केवळ कुस्तीपटू सुशील कुमार, बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू आणि नेमबाज मनू भाकर यांनाच ही कामगिरी करता आली. तथापि, ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये म्हणजे ट्रॅक आणि फील्डमध्ये दोन पदके जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय देखील आहे.

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनचा २-१ असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. यापूर्वी २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले होते.

कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या बळावर भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पराभूत होऊन सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या भारतीय संघाने गुरुवारी स्पेनविरुद्ध चमकदार कामगिरी करत २-१ अशा फरकाने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक पटकावले. भारताच्या विजयाचा हिरो ठरला हरमनप्रीत. संघ ०-१ असा पिछाडीवर असतानाही दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करत त्याने संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने अशाप्रकारे आपला अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशला भव्य निरोप दिला, ज्याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

‘भारताची भिंत’ म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. अशा प्रकारे भारताने ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत १३ वे पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये हॉकी हा भारतासाठी सर्वात यशस्वी खेळ ठरला आहे. या संघाने आतापर्यंत हॉकीमध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकली आहेत. अशा प्रकारे भारताने ५२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली. यापूर्वी या संघाने १९६८ आणि १९७२ मध्ये सलग पदके जिंकली होती, तर त्यानंतर १९८० मध्ये संघाने सुवर्णपदक जिंकले होते. १९८० नंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने कांस्यपदक जिंकून पदकाचा दुष्काळ संपवला. यावेळीही भारतीय संघ सुवर्णपदकापासून वंचित राहिला, पण कांस्यपदकासह मोहिमेचा शेवट करण्यात यशस्वी ठरला.

चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला स्पेनने पेनल्टी कॉर्नर जिंकला, मात्र पीआर श्रीजेशने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत स्पेनचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर स्पॅनिश संघाने आक्रमक खेळ करत सतत गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या, पण भारतीय बचावफळी भेदता आली नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये श्रीजेशने पुन्हा एकदा भिंतीप्रमाणे उभे राहून स्पेनचे प्रयत्न दोनदा हाणून पाडले. अखेरच्या मिनिटाला स्पेनला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर त्यांना करता आले नाही आणि अंतिम शिटी वाजत असताना भारतीय तिरंगा फडकला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन केले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत भारताने स्पेनचा २-१ असा पराभव केला. अभिनंदन करताना पंतप्रधानांनी लिहिले – एक अशी कामगिरी जी येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील! भारतीय हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये चमकला, कांस्यपदक जिंकले! हे आणखी विशेष आहे कारण ऑलिम्पिकमधले हे त्याचे सलग दुसरे पदक आहे. त्यांचे यश कौशल्य, चिकाटी आणि सांघिक भावनेचा विजय आहे. त्यांनी प्रचंड संयम आणि लवचिकता दाखवली. खेळाडूंचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयांचा हॉकीशी भावनिक संबंध आहे आणि या कामगिरीमुळे हा खेळ आपल्या देशातील तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होईल.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमच्या हॉकी संघाचे हार्दिक अभिनंदन. पाच दशकांहून अधिक काळानंतर, भारताने सलग दोन ऑलिम्पिक खेळांमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. भारतीय हॉकीच्या पुनरुज्जीवनासाठी हा संघ कौतुकास पात्र आहे. त्यांनी भारताचा गौरव केला आहे. या संघाने दाखवलेले सातत्य, कौशल्य, एकजूट आणि लढण्याची भावना आपल्या तरुणांना प्रेरणा देईल. शाब्बास भारतीय हॉकी संघ. गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले, ‘किती अप्रतिम कामगिरी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल आमच्या पुरुष हॉकी संघाचे खूप खूप अभिनंदन. तुमची दमदार कामगिरी खेळासाठी एक नवा उत्साह प्रज्वलित करेल. तुमच्या कामगिरीने देशाचा अभिमान वाढला आहे.

हॉकी इंडियाने समाज माध्यमांमधून जाहीर केले की, ‘हॉकी इंडिया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला १५ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला ७.५ लाख रुपयांचे रोख पुरस्कार जाहीर करते.’

भारताच्या अमन सेहरावतला ५७ किलो फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याला जपानच्या अव्वल मानांकित हिगुची रे याने तांत्रिक श्रेष्ठतेवर पराभूत केले. पहिल्या फेरीत म्हणजे तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत, जपानी कुस्तीपटूने अमनचा पराभव केला आणि १० गुण मिळवले आणि तांत्रिक श्रेष्ठतेवर विजय मिळवला. आता हिगुची अंतिम फेरीत पोहोचल्याने अमनला कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. तो कांस्यपदकासाठी स्पर्धा करेल. त्याची कांस्यपदकाची लढत ९ ऑगस्ट रोजी पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझ विरुद्ध होणार आहे.

पॅरिसला गेलेल्या भारतीय संघातील एका सूत्राने पीटीआयला माहिती देताना सांगितले की, कुस्तीपटू अंतिम पंघालवर अनुशासनहीनतेबद्दल आयओएने तीन वर्षांची बंदी घातली आहे. खरे तर अंतिमने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५३ किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. हा तोच वजन वर्ग आहे ज्यात विनेश पूर्वी भाग घेत असे. आश्चर्यकारक बाब म्हणजे अंतिमही वादात अडकली आहे. तरुण कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीला पॅरिसमधून हद्दपारीचा सामना करावा लागला. कारण अंतिमने तिचे अधिकृत ओळखपत्र तिच्या लहान बहिणीला खेळग्राममधून तिचे वैयक्तिक सामान आणण्यासाठी दिले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला पकडले. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्याची दखल घेतली आहे. अखेर भारतीय कुस्तीपटू, तिची बहीण आणि तिच्या सपोर्ट स्टाफला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंशू मलिकला महिलांच्या ५७ किलो वजनी गटात १६व्या फेरीत अमेरिकेच्या हेलन लुईसकडून पराभव पत्करावा लागला. आता ती रिपेचेजसाठी पात्र ठरते की नाही हे पाहावे लागेल.

ज्योती याराजीने महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या रिपेचेज फेरीत १३.१७ सेकंद वेळेसह चौथे स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. प्रत्येक हीटमधील अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचतात.

दीक्षा डागर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. तिने टी७ वरून टी४ वर तीन स्थानांनी झेप घेतली आहे. तर, अदिती अशोक टी१३ वर घसरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा