रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे १५ रोजी उपोषण
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दहाही रेल्वे स्टेशनवरील अडीअडचणीवर लक्ष वेधण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी सर्व रेल्वे प्रवासी संघटनांनी एकत्रित १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी उपोषण करणार असल्याची माहिती रेल्वे प्रवासी संघर्ष समिती व समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हयातील अनेक रेल्वेस्टेशनच्या विविध प्रश्न रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रलंबित असून रेल्वे प्रवाशाच्या सोयी सुविधा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा आणि पी.आर.ओ. तिकीट बुकिंग सिस्टीम यासह प्रश्नावर आतापर्यंत दुर्लक्षच झाले. सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या चार स्टेशनचे सुशोभिकरण झाले. परंतु, कोकण रेल्वे अधिकारी व बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यामुळे सांडपाणी, विद्युतीकरण अंतर्गत प्लॅटफॉर्म यांच्यासह अनेक सुविधांपासून ही सर्वच स्टेशन वंचित आहेत. यावर लक्ष वेधण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष व समन्वय समितीच्या माध्यमातून लक्षवेधी उपोषण करणार आहे. या उपोषणाला सहकार्य करावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर यांनी केले आहे.