1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवाडा संपूर्ण महाराष्ट्र महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त काही आयएएस अधिकारी यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पशा प्रयत्न..
गतवर्षी दि. 18 आँगष्टची सायंकाळची गोष्ट. तुमचे मित्र डॉ. विपीन इटनकर हे नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत असा मला व्हाट्सअप वर संदेश आला. संदेश पाठविणारी व्यक्ती जबाबदार होती. माझे नातेवाईक व मित्र व सहकारी तसेच अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी.जी.सोमवंशी यांचा हा संदेश होता आणि संदेशाच्या पाठपुराव्यासाठी त्यांनी विपीन इटनकर सरांची बदलीची ऑर्डरपण पाठवली होती. बदलीच्या ऑर्डरवर अमरावतीचे सुपुत्र व सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व अपर मुख्य सचिव श्री नितीन गद्रे यांची सही होती. डॉ.विपीन इटनकर सरांची माझी पहिली भेट फोनवरच झाली .आम्ही 2000 मध्ये मिशन आयएएस सुरू केले. दरवर्षी नियमितपणे आम्ही आयएएस टॉपर झालेल्या मुलांचा सत्कार सातत्याने गेल्या बावीस वर्षापासून घेत आहोत .इटनकरसाहेब जेव्हा आयएएस झाले. नुसतेच आयएएस झाले नाही तर आयएएसच्या परीक्षेमध्ये टॉपर आले तेव्हा त्यांचा मी फोन मिळविला. तेव्हा ते चंदिगडला शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सौभाग्यवती देखील डॉ. शालिनी देखील या डॉक्टर आहेत. मी त्यांना फोन लावला आणि त्यांचा आम्ही अमरावती जिल्ह्यातील खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या मोर्शी मतदारसंघातील चार मोठ्या गावांमध्ये सत्कार ठेवत आहोत असा निरोप दिला आणि या कार्यक्रमासाठी तत्कालीन आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतला आहे. तुमचे आम्हाला मोर्शी वरुड जरूड आणि शेंदुर्जना घाट असे सत्काराचे कार्यक्रम घ्यायचे आहेत. याबाबत बोलणे झाले. डॉक्टर इटनकरसाहेबांनी ताबडतोब होकार दिला आणि सत्काराला येण्याचे मान्य केले. मी डॉ.अनिल बोंडे डॉ. वसुधाताई बोंडे यांनी बसून नियोजन केले .कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या. माझ्यावर डॉक्टर व त्यांच्या परिवाराला आणण्याची व पोहोचवून देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉक्टरसाहेबांचे घर नागपूरला सक्करदरा भागात आहे .त्यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई तिथे राहतात .डॉक्टरसाहेब तिथे येणार असा त्यांनी मला निरोप दिला .त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे सत्काराच्या दिवशी मी सकाळी नागपूरला सक्करदरा भागात पोहोचलो. इटनकरसाहेब व डॉक्टर सौ शालिनीताई एक दिवस आधीच चंदीगडवरून नागपूरला विमानाने आलेल्या होत्या .आणि आपल्या दादांचा सत्कार पाहायला त्यांच्या घाकट्या ताई विशाखाताई देखील पुण्यावरून आलेल्या होत्या. आम्हाला सक्करदरा भागात इटनकरसाहेबांचे घर शोधायला फारसा वेळ लागला नाही. कारण आयएएस आपल्या नगरातला माणूस आपल्या कॉलनी मधला माणूस झाला आहे ही बातमी वर्तमानपत्रांनी व प्रसार माध्यमांनी सर्व दूर पसरविली होती .माझ्याबरोबर माझे सहकारी श्री प्रवीण राऊत होते. आम्ही त्यांचे त्या ठिकाणी पुस्तक देऊन स्वागत केले . डॉक्टरसाहेब शालिनीताई शारदाताई आणि विशाखाताई यांना घेऊन आम्ही अमरावती जिल्ह्यातील वरुडकडे निघालो. कार्यक्रमाचे आयोजक तत्कालीन आमदार डॉ.अनिल बोंडे व डाँ. सौ वसुधाताई बोंडे यांनी दोन दोन तासाच्या अंतराने शेंदुर्जना घाट वरुड जरूड व मोर्शी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम हाऊसफुल्ल झाले .डॉ. अनिल बोंडे यांचे उत्कृष्ट नियोजन व आयएएस टॉपर आपल्या गावात येतो आहे हा आनंद हे सर्वच पाहण्यासारखे होते. कार्यक्रमाला असणारी गर्दी लक्षणीय होती. पूर्ण दिवसभर सत्कार समारंभ सुरू होते. विशेष म्हणजे विपिनसरांच्या ताई विशाखा ताई ह्या उंचीला लहान आहेत. पण तेव्हा त्या एका मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत होत्या आणि आजही कार्यरत आहेत. डॉक्टर साहेबाबरोबर त्यांनी देखील आपली यशोगाथा सादर केली.विशेष म्हणजे एका दिवसात चार कार्यक्रम आणि तेही भव्य स्वरूपाचे. पण डॉक्टरसाहेब थकल्याचे जाणवत नव्हते. उलट मोर्शी मतदारसंघातील लोकांनी केलेले आदरतिथ्य व स्वागत पाहून ते भारावून गेले. आणि तत्कालीन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी त्यांच्या मतदारसंघात स्पर्धा परीक्षेचे जे वातावरण तयार केले त्याबद्दल आपल्या भाषणामध्ये बोंडेसाहेबांचे आभार पण त्यांनी मानले आणि अभिनंदनही केले .डाँ.विपीन इटनकरांचा आणि माझा ऋणानुबंध जुळला तो असा. आणि तो ऋणानुबंध आजही कायम आहे .आमचे दरवर्षी दहा मे ते सोळा मे असे सात दिवसांचे स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिर राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमामध्ये होते . या शिबिरामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संस्कार देतो .ही बातमी जेव्हा डॉक्टरसाहेबांच्या आईसाहेबांना म्हणजे शारदाताईंना माहित पडली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला .आम्ही त्यांना शिबिरासाठी निमंत्रित केले .आणि शारदाताई यांना इतका आनंद झाला की त्या सातही दिवस आमच्या शिबिरामध्ये थांबल्या. मुलांबरोबर जेवल्या. मुलांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांच्या हस्ते आम्ही आयएएस अधिकारी श्री स्वप्निल वानखडे यांचे आई वडील श्री गोपाळराव वानखडे व सुप्रसिद्ध आय आर एस अधिकारी श्री अभय देवरे यांचे आई वडील श्री सिद्धार्थ देवरे यांचा सत्कार केला. एका जिल्हाधिकाऱ्याची आई स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरामध्ये भाग घेते व सात दिवस राहते ही अतिशय प्रेरणादायी बाब शिबिरातील जवळपास 300 मुलं आपापल्या सोबत घेऊन गेले. या शिबिरात माझी अर्धांगिनी सौ विद्या व शारदाताईंची चांगली मैत्री झाली. विशेष म्हणजे आमची काही चांगली बातमी वाचली की शारदाताई मला किंवा विद्याला फोन करून आमचे अभिनंदन करतात .मध्यंतरी डॉ.विपीन सरांची नेमणूक लातूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली.आमदार डॉ. अनिल बोंडे देखील कृषी मंत्री झाले होते .डॉक्टर विपीन इटनकरांना बोंडे साहेबांशी बोलायचे होते .परंतु योग येत नव्हता. आणि मग तो योग एक दिवस मी घडवून आणला. बोंडे साहेब निवांत असताना मी लातूरला डॉ. विपीन इटनकरांना फोन लावला आणि दोघांचे बोलणे करून दिले. नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर साहेबांनी जिल्हाधिकारी हा लोकाभिमुख राहून कसे काम करू शकते याचा एक आदर्श लोकांसमोर घालून दिला .कोविडच्या दोन वर्षात कोविडला न घाबरता त्यांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. आज नागपूरला ते जिल्हाधिकारी म्हणून येत आहेत .ही आमच्या विदर्भातील लोकांसाठी आनंदाची बाब आहे. सर मूळचे चंद्रपूरचे आणि सरांच्या आईसाहेब शारदाताई नागपूरलाच राहतात. मी साहेबांची नागपूरची बातमी वाचल्यानंतर शारदाताईंना फोन केला. सरांचा फोन तर सतत व्यस्त येईल याची जाणीव होतीच. मी शारदा ताईंचे मनापासून अभिनंदन केले आणि माझा निरोप सरांपर्यंत पोहोचण्याचा संदेशही त्यांना दिला. एक समाजाभिमुख जिल्हाधिकारी नागपूरला रुजू झाले आहेत. ते विदर्भाचे सुपुत्र आहेत. आणि या विदर्भासाठी या विदर्भातील युवकांसाठी नागरिकांसाठी हे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवतील अशी आमची सर्वांची अपेक्षाही आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी.
अमरावती
98 90 96 7003