You are currently viewing प्रशासनातील देव माणूस : महेबूब कासार

प्रशासनातील देव माणूस : महेबूब कासार

1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा महसूल पंधरवाडा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात संपन्न होत आहे. त्यानिमित्त काही सनदी अधिकाऱ्यांचा परिचय करून देण्याचा हा अल्पशा प्रयत्न..

 

मुंबईच्या जीएसटी खात्यात असलेला माणूस वरिष्ठ सनदी अधिकारी दोन वर्षाची बिनपगारी सुटी काढून आपल्या मराठवाड्यातील गावात जातो आणि दोन वर्ष तिथल्या मुलांना पोलीस प्रशिक्षण सैनिकी प्रशिक्षण देतो. त्यांना तयार करतो. त्यांना नोकरीला लावून देतो आणि परत मुंबईला येऊन आपल्या जीएसटी खात्यात आपल्या कर्तव्यावर रुजू होतो. बिन पगारी सुट्टी काढून अशी समाजसेवा करणारे लोक तुम्हाला फारच दुर्मिळ दिसतील. पण हे एका जीएसटी खात्यातील उपायुक्ताने बिन पगारी सुटी काढून हे समाजकार्य केलेले आहे आणि त्या माणसाचे नाव आहे श्री मेहबूब कासार. आज साहेब मुंबईला माजगाव कार्यालयात कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी त्यांच्या रक्तात रुजली आहे आणि म्हणूनच एवढ्या प्रचंड पगाराची नोकरी असतानाही बिनपगारी सुटी काढून त्यांनी त्यांच्या भागातल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार केले आहे. त्यांचा माझा परिचय झाला तो सरदारधाममुळे. आमच्या पुढाकाराने गुजरातमध्ये सरदारधाम उभे राहिले. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मुलांसाठी भारतात कुठेही इतके अप्रतिम केंद्र अगदी दिल्लीला सुद्धा नाही. त्या सरदारधामवर मी एक लेख लिहिला. साहेबांनी तो वाचला आणि मला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. तत्कालीन शिक्षण मंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी माझे मुंबईला कार्यक्रम आयोजित केले होते. त्यानिमित्त मी मुंबईला गेलो. साहेबांना भेटलो. आणि पहिल्याच भेटीत एक जिवलग मित्र मिळाल्याची जाणीव झाली. साहेब मला निरोप घेताना मुंबईच्या माजगाव मधील अवाढव्य उंच इमारतीच्या मजल्यावरून मला टॅक्सीपर्यंत सोडायला आले. एक मोठ्या पदावरील अधिकारी मला सोडायला येतो काय ? हे सर्वच काहीतरी आगळंवेगळं होतं. साहेब मला पुढच्या भेटीत घरी घेऊन गेले. आणि म्हणाले आमच्या फ्लॅटमधील ही एक खोली आम्ही तुम्हाला दिलेली आहे. आता यानंतर मुंबईला आले तर आमच्याकडेच यायचे. आमच्याकडेच राहायचे .तुमची सेवा करायला आम्हाला आवडेल. तुम्ही मुंबईला येऊन दुसरीकडे थांबले तर आम्हाला दुःख होईल. मुंबईसारख्या महानगरात राहणारा उपायुक्त माणूस माझ्या एवढा प्रेमात पडलेला पाहून मलाही नवल वाटले. मुंबईत जागेची किती अडचण आहे हे आपल्याला माहीत आहे. असे असताना स्वतःच्या फ्लॅट मधील एक खोली माझ्यासाठी राखून ठेवणारा हा माणूस खरोखरच आगळावेगळा आहे. नुसतं हे बोलून झालं नाही तर प्रत्यक्ष कृतीत त्यांनी उतरवून दाखवलं. त्यांचा माझा परिचय होऊन आज तीन वर्षाच्या कालावधी लोटला आहे. मी जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा तेव्हा हमखास त्यांच्याकडे थांबतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साहेब त्यांची कार घेऊन मला घ्यायला येतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे माझ्याजवळ असलेल्या सर्व बॅग ते स्वतः कारपर्यंत वाहून नेतात. मला एकाही बॅगला हात लावू देत नाहीत. कासार साहेब लातूर जिल्ह्यात राहणारे. परिस्थिती अर्थातच सर्वसामान्य. त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी उपायुक्त पदापर्यंत माजल गाठली. परंतु घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. मी अधिकारी झालो. मी नोकरीला लागलो. पण माझ्या गावातील विद्यार्थीपण चांगल्या रीतीने शिकून सवरून प्रशिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागला पाहिजे ही त्यांची मनोमन इच्छा. दोन वर्ष त्यांनी हे काम तर केलेच. तरुणांना तयार केले. त्यांना नोकरी लावून दिल्या. पण त्यांच्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी ते धडपडत आहेत. त्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. परवा ते मला लातूर जिल्ह्यात घेऊन गेले. लातूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी आम्ही स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या. मुलांना जागे केलं. प्रचंड प्रतिसाद मिळाला. खरं म्हणजे आजकाल प्रत्येक जण मी माझी पत्नी व माझी मुले या चौकटीत राहतात. कासारसाहेबासारखे फार कमी लोक आहेत. जी ही चौकट मोडून समाजामध्ये वावरतात. आपल्या मुलांसाठी महाराष्ट्रातील मुलांसाठी सोयीचे व्हावे म्हणून एक चांगले स्पर्धा परीक्षा केंद्र ते सोलापूर तुळजापूर रोडवर सुमारे सहा एकराच्या परिसरामध्ये बांधण्याचा त्यांनी संकल्प सोडला आहे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालविली आहे. त्यांना जसा वेळ मिळतो तसा ते गावाकडे जातात. गावाकडील मुलांना तरुणांना नागरिकांना शिक्षकांना प्रोत्साहन देतात आणि मुलांना स्पर्धा परीक्षेचे नियमित धडे देतात. माझ्यासारखे अधिकारी माझ्या परिसरातून प्रशासनात आले पाहिजेत ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्यांचा शनिवार रविवार याच कामासाठी राखीव असतो. परवा आम्ही अमरावतीला स्पर्धा परीक्षा संस्कार शिबीर घेतले. साहेब आठवणीने मुंबईवरून आले. माझी मुंबईला व्यवस्था करणाऱ्या या माणसाने मला चक्क सांगितले तुम्ही माझी काहीही व्यवस्था करायची नाही. सर्व करण्यास मी समर्थ आहे. त्यांनी स्वतःसाठी विश्राम भवन आरक्षित केले. टॅक्सी सांगितली आणि शिबिराच्या ठिकाणावर बरोबर पोहोचले. असा हा मा एक चांगला वारकरी आहे. कासार साहेबांबरोबर ना या चांगुलपणा बरोबरच साहित्याची संगीताची आवड आहे. ते स्वतः पुढाकार घेऊन चांगले साहित्य कार्यक्रम चांगले सामाजिक कार्यक्रम आयोजित करतात. साहित्यिक चळवळीला मदत करणाऱ्या लोकांमध्ये त्यांचा वरचा क्रम आहे. परवा आम्ही त्यांच्या फ्लॅटवर होतो. बोपुलकर नावाचे साहित्यिक मित्र आले. ते म्हणाले मला पुण्याला साहित्य संमेलन घ्यावयाचे आहे. तुमची मदत पाहिजे आहे. साहेब म्हणाले सांगा काय मदत पाहिजे. बोपुलकर म्हणाले पूर्ण महाराष्ट्रातून दोनशे लोक येणार आहेत. त्यांची राहण्याची जेवणाची निवासाची सर्व व्यवस्था करावयाची आहे. साहेब म्हणाले चला माझ्याबरोबर. आम्ही कारने पुण्याला पोहोचलो. आझम कॅम्पस गाठले. तिथल्या अभिमात विद्यापीठाचे कुलगुरू श्री इनामदार साहेब हे कासार साहेबांचे जवळचे मित्र. आम्ही इनामदार साहेबांच्या कार्यालयात पोहोचलो. कासार साहेब आणि इनामदार साहेबांना बोपुलकरांचा माझा परिचय करून दिला आणि सांगितले की यांना 200 साहित्यिकांचे एक साहित्य संमेलन घ्यावयाचे आहे. तुमचे सहकार्य पाहिजे. कासार साहेबांचे आणि इनामदार साहेबांचे एवढे घनिष्ठ संबंध आहेत की इनामदार साहेब म्हणाले तुम्ही काहीच काळजी करू नका सभागृहाची राहण्याची जेवणाची सर्व व्यवस्था मी करतो. तुम्ही जास्तीत जास्त साहित्यिकांना बोलवा. कासार साहेबांच्या एका शब्दाला किती किंमत आहे हे त्यादिवशी मला कळले.पुण्याचे साहित्य संमेलन झाले. इनामदार साहेबांनी हृदयापासून मदत केली. पण त्यांच्याजवळ शब्द टाकणारे कासार साहेब हे मला खऱ्या अर्थाने साहित्य पंढरीतील एक वारकरी वाटले. अनेक वेळा आपण सामाजिक कार्य करतो. पण ते घरी पचनी पडेल याची शाश्वती नसते. कासार परिवार याला अपवाद आहे. कुटुंब रंगलय काव्यात असंच या परिवाराबद्दल म्हणावे लागेल. वहिनी परवीन सुलताना ह्या देखील साहेबा इतक्याच प्रेमळ आहेत. आलेल्या प्रत्येक माणसाचे मनापासून हृदयापासून त्या स्वागत करतात. त्यांच्याकडे असताना कोणालाही आपण परक्या घरी आहोत असे वाटणार नाही. त्यांचा चिरंजीव अहमद स्वतः चांगला लेखक व लघुपट निर्माणकर्ता आहे. कन्या शिफा प्रशांत किशोर यांच्या टीम बरोबर काम करते. आज प्रशांत किशोरांचे नाव पूर्ण भारतात आहे. साहेबांचे गुण वहिनीसाहेबांमध्ये चिरंजीवांमध्ये व कन्येमध्ये तंतोतंत उतरले आहेत. खरं म्हणजे हा एक आदर्श परिवार आहे. एका उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याला जे वाहून घेतले आहे त्यानिमित्त ते अभिनंदनास पात्र आहेत.

 

प्रा डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा