विज्ञान युगातही कृषी क्षेत्रा शिवाय पर्याय नाही – अर्चना घारे
सावरवाड येथे कृषी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन..
सावंतवाडी
भारत देश कृषीप्रधान देश असून आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांनी केले.
तालुक्यातील सावरवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस- आरोस यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सावरवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले होते. याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. घारे म्हणाल्या, आपला भारत देश कृषीप्रधान देश असून आज आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही. बहुसंख्य कुटुंब हे आज शेती या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत. आधुनिक युगातही युवकांनी शेतीची कास धरावी, असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.
यानंतर कृषी प्रदर्शनाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विविध रानभाज्यांची माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली. यावेळी सावरवाड सरपंच देवयानी पवार, उपसरपंच अनिकेत म्हाडगुत, पूजा निकम, सुप्रिया मडगावकर, श्री. कुडतरकर, शाळेचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व पालक वर्ग तसेच किर्लोस- आरोस कृषी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.