कुडाळ –
कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात २० ऑगस्ट रोजी कुडाळ तालुका पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने “माझा लोकराजा” महोत्सव पर्व २ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला सायंकाळी ४ वाजता सुरुवात होणार आहे. यानिमित्त कुडाळ तालुका दशावतार कलाकार संघटनेतील निवडक कलाकारांच्या संयुक्त दशावतार संचात याज्ञिकपुत्र भुरीश्रवा नाटक होणार आहे. या संघाने गेल्या वर्षीपासून जेष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिगण यांच्या नावाने माझा लोकराजा महोत्सव सुरू केला आहे. या वर्षीच्या महोत्सवातील संयुक्त नाटकातील भूमिका आणि कलाकार पुढीलप्रमाणे आहेत.
गणपती – प्रतीक कलिंगण, रिद्धी सिद्धी – दिनेश मांजरेकर, राजा शिनी – यशवंत तेंडोलकर, राजा सोमदत्त – संजय पाटील, भुरीश्रवा – विलास तेंडोलकर, कृष्ण – मोरेश्वर सावंत, अर्जुन – आनंद कोरगावकर, सात्यकी – संजय वालावलकर, नारद – योगेश कोंडुरकर, शंकर – सदाशिव मोडक, गंगा – यश जळवी, राणी – संतोष सामंत, मुली – दिप निर्गुण, राक्षस – अमित परब आदी कलाकार असून हार्मोनियम – आशिष तवटे व अमोल आकेरकर, पखवाज – निखिल निकम व संजय नाईक, तालरक्षक – विनायक सावंत व हरेश नेमळेकर यांची संगीतसाथ आहे.
लोकराजा सुधीर कलींगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ (नेरुर, सिध्देश कलींगण), लाजरी क्रिकेट ग्रुप (कुडाळ) अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश महाडेश्वर यांचे विशेष सहाय्य लाभणार आहे. या महोत्सवाला उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघाच्यावतीने करण्यात आले आहे.